काणकोणात बस उलटून १४ जखमी

0
122

माटवेमळ, खोला येथील पारयेकट्टा-उणस वळणावरील उतरणीवर मिनी बस उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यांपैकी ९ जण गंभीर आहेत. त्यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर मडगाव इस्पितळात हलवण्यात आले आहे.

सदर मिनीबस टेम्पो ट्रेव्हलर (जीए ०८ – यू – ९७०५) ही बस असोळणा येथून आगोंद वाल येथील कपेलमध्ये प्रार्थनेसाठी निघाली होती. पारयेकट्टा येथील धोकादायक वळणावर उतरणीवर असताना अचानक बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसचा विजेच्या खांबाला धक्का बसून दोन कोलांट्या घेत कोसळली. अपघातावेळी बाजूला काही कामगार काजू बागायतीत सफाई कामात गुंतले होते. अपघातात जबर जखमी झालेल्यांत अफिना कार्दोज (४९), रूमानियो फर्नांडिस (७८), प्रिती डिसोझा (३८), प्रेसीला कार्दोज (३६), सुनीता बार्रेटो (४२), फॅड्रीक फर्नांडीस (४६), सेवेरिना कार्दोज (७१), पेरपेत फर्नांडिस (३१), रोस्टन फर्नांडिस (४०) यांना अत्यवस्त स्थितीत मडगाव हॉस्पिसिओत हलविण्यात आले.

किरकोळ मार लागलेल्या दाऊद नदाफ (गाडी चालक), एलीजाबेथ फर्नांडिस (८३), आश्‍विना फर्नांडिस (३२) व रोनन फर्नांडिस यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खोला तसेच आगोंद परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. काहींना खाजगी गाडीत तर काहींना रुग्णवाहिकेने काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. पारयेकट्टा, खोला येथील धोकादायक वळणावर संरक्षक भिंत उभारून धोक्याची सूचना देणारे फलक लावण्याची कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, शासनातर्फे वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचे अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या वळणावर दोन वर्षांपूर्वी एका हायस्कूलची सहलीची बस उलटली होती. अपघाताची माहिती मिळताच आगोंदाचे उपसरपंच आबेल बेर्जीस तसेच खोला जि. पं. सदस्य शाणू वेळीप व खोला पंच सदस्यांनी धाव घेतली. काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात आमदार इजिदोर फर्नांडिस, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी जखमींची विचारपूस केली.