काणकोणात पर्यटकांची वर्दळ!

0
205
निसर्गरम्य पाटणे समुद्रकिनारा.

पैंगीण (न. प्र.)
काणकोण तालुक्यातील समुद्रकिनारे जगप्रसिध्द आहेत. या तालुक्याला २६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. पाटणे, पाळोळे, आगोंद हे किनारे देशी तसेच विदेशी पर्यटक जास्त पसंत करतात. राज्यातील पर्यटन हंगामाला सुरूवात झाली असून देशी, विदेशी पर्यटक काणकोणातील समुद्र किनार्‍यांवर यायला सुरुवात झाली आहे.
काणकोण तालुक्यातील बहुसंख्य किनार्‍यांवर वर्षाचे बाराही महिने पर्यटक असतातच. पण पावसाळ्यात त्यांची संख्या खूप कमी असते. आता पावसाळा संपत आल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक काणकोणातील समुद्रकिनार्‍यांवर येत आहेत. काणकोणात येणार्‍या पयटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील मनमोहक समुद्रकिनारे. तसेच येथे असलेली प्राचीन देवस्थाने. खोतीगाव अभयारण्यातही देशी – विदेशी पर्यटक भेटी देतात. काब दि रामा हा प्राचीन किल्ला पर्यटकांना आकर्षक वाटतो. पर्यटकांची जास्त पसंती येथील समुद्र किनार्‍यांना असते. त्यामुळे पाटणे, ओवरे, पाळोळे, आगोंद यासारखे समुद्रकिनारे पर्यटकांनी भरलेले असतात. स्थानिकांनी आता किनार्‍याला लागून असलेल्या जागेत शॅक्स तसेच निवासी तंबू उभारण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक कामगारांना त्यामुळे रोजगार मिळत आहे. प्रतिदिनी सातशे ते आठशे रूपये हे कामगार पगार घेत आहेत.