कांगारू प्रबळ दावेदार

0
109

– सुधाकर नाईक
विश्‍व चषकाचा महासंग्राम आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये सुरू होत असून मार्चअखेरपर्यंत सुमारे दीडेक महिना चालणार्‍या या क्रिकेटच्या कुंभमेळ्यात जगभरातील १४ अव्वल संघ जेतेपदासाठी झुंजतील. प्रतिष्ठेचा अकरावा आयसीसी चषक जिंकण्यासाठी प्रत्येक देश-संघ सर्व शक्ती सामर्थ्यांनिशी महासंग्रामात उतरणार असून अनिश्‍चितेने नटलेल्या या पन्नास षट्‌कांच्या खेळात परिस्थितीनुरुप खेळणारा संघ २९ मार्च रोजी होणार्‍या मुकाबल्यात जगज्जेता ठरेल.विजेता भारत, उपविजेता श्रीलंका, सहयजमान ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, द. आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड या तूल्यबळ संघाकडे संभाव्य जेते म्हणून पाहिले जात आहे. पण स्वगृह, स्वमैदान आणि संघरचना पाहता यजमान ऑस्ट्रेलियाचे पारडे सरस वाटते.
१९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाने ‘ट्रान्स तास्मान’ प्रतिस्पर्धी न्युझीलंडच्यासाथीत प्रथम विश्‍व चषक यजमानपद भूषविले होते. पण त्यावेळी ऑसिस संघ जेतेपद राखण्यात असफल ठरला होता. तथापि २३ वर्षानंतर पुन्हा एकदा कांगारू यजमानपद भूषवित आहे आणि एकंदर परिस्थिती तथा संघाचा विद्यमान बहार पाहता पाचव्यांदा विश्‍व चषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार वाटतो.
भारताविरुध्दच्या कसोटी मालिकेनंतर (२-०), इंग्लंड तिसरा संघ असलेली कार्लटन मीड तिरंगी मालिका निर्विवाद वर्चस्वात जिंकलेल्या ऑसिसने २००९ पासून स्वगृही एकही मालिका गमावलेली नसून या अनुकूलतेत कांगारू पाचव्यांदा विश्‍व चषकावर नाव कोरण्यास सज्ज असेल.
प्रेरणादायी कर्णधार मायकल क्लार्कने अखेरच्यरा सराव सामन्यात संयुक्त अरब अमिरातविरुध्द ६४ धावा ठोकीत आपल्याबाबतचे अनिश्‍चिततेचे सावट दूर कलेले असून ऑसिस संघ सर्व आघाड्यावर समोतल आणि संतुलित आहे. डॅरन लेहमानच्या मार्गदर्शनाखाली कांगारूनी इंग्लंडकडून ऍशेश जिंकल्यापासून भरीव प्रगती साधलेली असून स्वमैदान आणि स्वशौकिनांचा उत्स्फूर्त पाठिंबा ही जमेची बाब असेल.
तथापि, १९८७, १९९, २००३ आणि २००७ मधील विजेत्यांवर पाचव्यांदा विश्‍व चषक जिंकण्याच्या स्वशौकिनांच्या अपेक्षांचे दडपण मात्र निश्‍चित असेल. ऑसिसने या मोसमाची दमदार सुरुवात करताना द. आफ्रिकेविरुध्दची मालिका ४-१ तसेच नुकतीच झालेली तिरंगी मालिकाही निर्विवाद वर्चस्वात जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाचा पंधरा सदस्यीय संघ समतोल आणि संतुलीत आहे. डेव्हिड वॉर्नर आणि ऍरोन फिन्च ही बेधडक सलामीवीर जोडी स्वभूमीवर कुठल्याही गोलंदाजीसाठी खतरनाकच ठरावी. भारताविरुध्दच्या कसोटी मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारीही यशस्वीरीत्या पेललेला स्टीवन स्मिथ, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर, मिशेल मार्श आदी मधल्या फळीतील सर्वच फलंदाज बहरात आहेत. मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, जोश हॅझलवूड, पॅट कमिन्स हे तुफानी गोलंदाज येथील उसळत्या खेळपट्ट्यावर प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी निश्‍चितच भयावह स्वप्न ठरतील.
भारताच्या १९८३ आणि २०११ मधील विश्‍व चषक अजिंक्यपदात कपिल देव आणि युवराज सिंह यांनी शानदार अष्टपैलूत्वाचे दर्शन घडविले. १९९९, २००३ आणि २००७ मधील ऑस्ट्रेलियाच्या सलग तीन विश्‍व विजेतेपदात यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट तळपला होता. एकंदरीत विश्‍व चषक जिंकण्यासाठी संघ सर्वांग संपूर्ण तथा अष्टपैलू खेळाडूनी परिपूर्ण असणे महत्वपूर्ण होय आणि विद्यमान ऑसिस संघ पाहता आघाडीतील वॉर्नर, फिंच, स्मिथ, वॉर्नर, मार्श या संघा फलंदाजांबरोबरच एकहाती सामना फिरविण्याची कुवत असलेले ग्लेन मॅक्सवेल आणि जेम्स फॉल्कनर असे विलक्षण गुणवत्ता असलेले अष्टपैलू ऑसिस संघात आहेत. एकेकाळी भावी वासिम अक्रम म्हणून ओळखला जाणारा तेज गोलंदाज मिशेल जॉन्सनही वेळप्रसंगी दांडपट्टा घुमविण्यात माहीर आहे. प्रेरणादायी कर्णधार मायकल क्लार्क तंदुरुस्त बनलेला असल्याने यजमानांचा उत्साह अधिक दुणावेल.
एकंदरीत परिस्थिती पाहिल्यास ऑस्ट्रेलियाला पाचव्यांदा विश्‍व चषक अजिंक्यपदाबरोबरच श्रीलंका (१९९६) आणि भारत (२०११) यांच्यानंतर स्वभूमीवर जगज्जेतेपद मिळविणारा तिसरा देश बनण्याचा बहुमानही पटकावण्याची नामी- सुवर्ण संधी आहे.
ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक चार वेळा विश्‍व चषक जिंकला असून त्यानी सर्वाधिक ५५ सामने जिंकले तर केवळ १९ सामन्यात त्याना हार पत्करावी लागली. ऑसिस फलंदाजानी विश्‍व चषकात १६,१६५ धावा नोंदल्या आणि गोलंदाजानी सर्वाधिक ५५६ बळी घेतले. १९९३ ते २००७ या बारा वर्षांच्या विश्‍व चषकातील निर्विवाद श्रेष्ठत्वासह कांगारूंनी चार विश्‍व चषकात ३४ सामन्यात अपराजीत दौड राखली होती आणि त्यांची ही एकंदर कामगिरी आणि विद्यमान वाटचाल पाहता विश्‍व चषक इतिहासातील सर्वोत्तम संघाचा मानही त्यांच्याकडेच जातो.
शुभारंभी विश्‍व चषकातच ऑसिसने चुणूक दर्शविताना अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी केलेल्या विंडीजची ३ बाद ५० अशी घसरगुंडी घडली होती. तथापि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला कर्णधार क्लाइव्ह लॉयडचे शतक आणि त्याने रोहन कन्हायच्या साथीत केलेल्या चौथ्या यष्टीसाठीच्या १४९ धावांच्या भागीवर कॅरोबियन्सनी ऑसिसला ६० षट्‌कात विजयासाठी २९२ धावांचे आव्हान दिले. ऍलन टर्नरच्या ५४ चेंडूवरील ४० आणि कर्णधार इयान चॅपलच्या ९३ चेंडूवरील ६२ धावानंतरही ऑसिसला १७ धावांनी हार पत्करावी लागली.
१९८७ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्या संयुक्त यजमानपदाखाली झालेल्या चौथ्या विश्‍व चषकात ऑस्ट्रेलियाने आपले विश्‍व पहिले अजिंक्यपद प्राप्त केले. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ७० हजार क्रिकेट शौकिनांच्या उपस्थितीत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या या ‘ऍशेश’ प्रतिस्पर्ध्यातील अंतिम मुकाबल्यात डेव्हिड बूनच्या ७५ धावांवर कांगारूनी ५ बाद २५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात बिल ऍथे, मायक गेटिंग आणि ऍलन लॅम्बच्या प्रतिकारानंतरही इंग्लंडला ७ धावांनी हार पत्करावी लागली आणि दुसर्‍यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
१९९६ मध्ये भारत-श्रीलंका पाकिस्तानच्या सहयजमानपदाखाली झालेल्या विश्‍व चषकात ऑसिसने तिसर्‍यांदा अंतिम फेरी. लाहोर (पाकिस्तान) येथील गडाफी स्टेडियमवरील अंतिम मुकाबल्यात कर्णधार मार्क टेलर आणि रिकी पॉटिंगने दुसर्‍या यष्टीसाठी केलेल्या १०१ धावांच्या भागीवर ऑसिसने ५० षट्‌कात ७ बाद २४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात सामनावीर अरविंद डिसिल्वाचे शतक आणि असंका गुरुसिंहा आणि अर्जुना रणतुंगाच्या सहयोगाने श्रीलंकेने २२ चेंडू आणि ७ गडी राखीत आरामात उद्दिष्ट गाठले. यजमानांनी जेतेपद मिळविण्याची ही पहिलीच घटना तथा उद्दिष्टांचा पाठलाग करीत जेतेपदाला गवसणी घालण्याचीही पहिलीच घटना होय.
१९९९ ते २००७ या बारा वर्षांच्या काळात ऑस्ट्रेलियाने विश्‍व चषकात निर्विवाद श्रेष्ठत्व गाजविले. यष्टीरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्टची बॅट या तिन्ही प्रतियोगितात विलक्षण तेजाने तळपली.
१९९९ मध्ये इंग्लंडने चौथ्यांदा यजमानपद भूषविलेल्या या प्रतियोगितेच्या एकतर्फी अंतिम लढतीत फिरकीचा जादुगार शेन वॉर्नने ४ बळी घेत पाकिस्तानला अवघ्या १३२ धावा उखडले आणि ऍडम गिलख्रिस्टचे जलद अर्धशतक तसेच मार्क वॉ, डॅरेन लेहमान आणि रिकी पॉंटिंग यांनी दिलेल्या योगदानानंतर ऑसिसने अवघ्या २० षट्‌कात ८ गडी राखीत जेतेपद पटकावले.
२००३ मध्ये द. आफ्रिका, केनया आणि झिम्बाब्वे यांच्या सहयजमानपदाखाली प्रथमच झालेल्या विश्‍व चषकात जोहान्सबर्गमधील वॉंडरर्स स्टेडियमवर भारत-ऑसिसमध्ये अंतिम मुकाबला झाला. गिलख्रिस्ट आणि हेडनच्या धडाकेबाज शतकी सलामीनंतर रिकी पॉटिंग अणि डॅमियन मार्टिनने नोंदलेल्या विश्‍व चषकातील नाबाद २३४ धावांच्या सर्वोच्च भागीवर कांगारूनी २ बाद ३५९ धावांची विक्रमी धावसंख्या नोंदली. प्रत्युत्तरात सचिन तेंडुलकर पहिल्या षट्‌कात बाद झाल्यावर वीरेंद्र सेहवाग व राहुल द्रविड यांच्या अल्प प्रतिकारानंतर भारताचा डाव जवळ जवळ अकरा षट्‌के बाकी असताना २३४ धावांवर आटोपला.
२००७ मध्ये वेस्ट इंडीजच्या यजमानपदाखाली झालेल्या विश्‍व चषकात ऑस्ट्रेलियाने जेतेपदाची हॅट्‌ट्रिक साधली. बार्बाडोस येथील केनसिंग्टन ओव्हलवरील ही अंतिम लढत पावसामुळे २ तास एशीरा सुरू झाल्याने ३८ षट्‌कावर घटविण्यात आली. धडाकेबाज सलामीवीर ऍडम गिलख्रिस्टचे विश्‍व चषक अंतिम लढतीतील जलद शतक आणि त्याने डॅमियन मार्टिनच्या साथीत केलेल्या शतकी सलामीवीर ऑसिसने प्रथम फलंदाजीत ४ बाद २८१ धावांचे तगडे आव्हान खडे केले. परत पडलेल्या पावसामुळे धावउद्दिष्ट घटविण्यात आले. पण सनथ जयसूर्या व कुमार संगकाराच्या ११६ धावांच्या भागीनंतरही श्रीलंकेला ८ बाद २१५ पर्यंतच मजल गाठता आली आणि ऑसिसने ५३ धावांच्या विजयासह आपले सलग तिसरे तथा एकूण चौथे विश्‍व चषक अजिंक्यपद पटकावले.