कशासाठी, यशासाठी ?

0
307

– प्रा. रामदास केळकर

पिकासोने तिला सांगितले, ‘‘हे प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मला आयुष्याची तीस वर्षे खर्च करावी लागली त्याचे काय?’’ नुसता संकल्प सोडून चालत नाही पूर्णत्वासाठी म्हणजेच यशासाठी अखंड सेवा जिद्दीने केली पाहिजे. येणार्‍या अडथळ्याना दूर करत, सामोरे जात ध्येय गाठता आले पाहिजे. तेव्हा वेळ न दवडता आगे बढो!!

नवीन शैक्षणिक पर्व ह्या महिन्यापासून सुरु झाले. जो तो विद्यार्थी नव्या वर्गाशी समरस होऊ लागला आहे. या सर्वांना न्याहाळताना मनात एक प्रश्न नेहमी पडतो, हे सर्वजण यश मिळावे ह्यासाठीच तर प्रयत्न करत नाहीत का? भले मग ते यश त्यांच्या दृष्टीने लघु स्वरूपाचे असेना. इतरांनी त्यांच्या यशाची दखल घेवो न घेवो, मिळालेल्या यशाने त्यांना समाधान मिळते. या यशाची व्याप्ती मोठी होण्यासाठी जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले.. तेही योग्य वेळी.. तर नक्कीच त्या यशाची व्याप्ती वाढेल. अनेकांना योग्य मार्ग मिळेपर्यंत त्यांची दमछाक होते. काहीना मार्ग मिळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. योग्य मार्ग मिळालेले सुदैवी फार थोडे निघतात. ज्यांना मिळत नाही ते मग नशिबाला बोल लावत आयुष्य कसेबसे रेटतात.
यश अल्प असो की दीर्घकालीन त्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न हे करावेच लागणार ह्यात शंका नाही. अनेकदा मनात प्रश्न येतो. नापास होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात का? त्यासाठी एखाद्या वर्गाला, शिकवणीसाठी जावे लागते का? कोणाचा सल्ला घ्यावा लागतो का? तर अजिबात नाही. कोणीही नापास व्हायचे ठरविले तर ते सहज शक्य आहे. पण यशवंत होण्यासाठी मात्र विशेष प्रयत्न करावे लागतात. डोळ्यात तेल घालून सातत्याने प्रयत्नशील रहावे लागते. प्रसंगी सल्ला घ्यावा लागतो, मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यासाठी ध्येय ठरविण्यापासून सुरवात करावी लागते. याशिवाय यशासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. मनावर नियंत्रण ठेवावे लागते. पूरक गोष्टी ठरवून जवळ कराव्या लागतात आणि यात सातत्य हवे हे विसरता कामा नये. आजच्या इंटरनेटच्या मोहक युगात मनाला योग्य खुराक मिळावी ह्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतील. राग सहन होत नाही, नकार पचवत नाही ह्यामुळे घडणार्‍या आपत्ती पाहिल्या की हा मार्ग किती अडचणींनी भरलेला आहे ह्याची कल्पना यावी. पूर्वी मुले मोठ्यांचे ऐकत असत… असे नेहमीच म्हटले जाते. त्यामागचे एक कारण- त्या पिढीला अनेक गोष्टी माहीत नव्हत्या हे तर नव्हे ना? आजकाल माहिती मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत. पूर्वी शाळेतून मर्यादित प्रमाणात माहिती मिळत जायची. वृतपत्रे, रेडिओ हेही मार्ग होते पण त्याचा लाभ सर्वांनाच मिळे असे नाही. माहितीच्या युगात योग्य माहिती मिळविणे आणि स्वत:च्या उत्कर्षासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी त्याचा उपयोग करून घेणे आणि हे करताना समाजाचा विचार करत तिथेही ते अंमलात आणायला हवे. ह्यासाठी आपणाला योजना करावी लागेल व त्यानुसार पुढची पावले टाकावी लागतील. ‘मानवाचा दानव होणे’ ही त्याची ‘हार’ तर ‘मानवाचा महामानव होणे’ हा ‘चमत्कार’. या दोन्ही गोष्टी आपल्या हाती असतात.

– आपले ध्येय निश्चित करा –

आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे?.. हे नक्की करा. अर्थात लहान वयात याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. हे वय स्वप्नरंजनासारखे असल्याने ध्येय नेमके कोणते असावे… ह्याची कल्पना नसते. इथे पालकांनी, प्रशिक्षकांनी त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. ज्यांचे कळते वय आहे त्यांना आपल्या ध्येयाची कल्पना असते. आपण खेळाडू होणार की कलाकार, उच्च शिक्षण घेऊन नोकरी करणार की उद्योजक होणार? वडिलोपार्जित व्यवसाय करणार की एखाद्या नव्या व्यवसायाला सुरवात करणार? हे आपापल्या कुवतीनुसार, आवडीनुसार ज्याचे त्याने ठरवावे. एखादे प्रेरणा देणारे पुस्तक, चरित्र, आत्मचरित्र आपल्याला या कामी पूरक ठरू शकते. दीपा मलिक हे नाव क्रीडारसिकांना नवीन नाही. सायकल चालविणे, बास्केटबॉल खेळणे, राज्य स्तरीय क्रिकेट चमूत स्थान पटकाविणे त्यानंतर कॉलोनल विक्रम सिंह ह्यांच्याशी विवाह झाला. त्यानंतरही तिच्या खेळण्यात खंड पडला नाही. हा प्रवास समाधानकारकरित्या चाललेला असताना अचानक तिला अर्धांगवायूच्या झटक्याने गर्भगळीत केले. मृत्यू किंवा ऑपरेशनचा मार्ग तिच्यासमोर होता. तिने दुसरा मार्ग निवडला तोही तिच्या नवर्‍याच्या गैरहजेरीत. ते तेव्हा कारगिल युद्धात मग्न होते. तिच्यावरची शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे डॉक्टरनी केली. काही दिवसांनी तिला बरे वाटू लागताच तिने पुन्हा खेळाला जवळ केले आणि देशासाठी पदकही मिळविले. अशा जिद्दीच्या कहाणीतून आपणाला प्रेरणा मिळते. जगण्याची, प्रतिकूलतेशी दोन हात करण्याची. ध्येय निश्चित करायला ह्या गोष्टी पूरक ठरतात.

– यशस्वी व्यक्तींचा आदर्श ठेवा –

आपले मित्र परिवार कोण आहेत… ह्यावरून आपले व्यक्तिमत्व ठरू शकते. ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ याप्रमाणे संगतीचा आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणून आपण नेहमी चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात रहावे. अलीकडच्या दिवसात शिकवणी घेणे हे जणू अपरिहार्य आहे… अशा पद्धतीने विद्यार्थी-पालक भरमसाट फी देऊन अशा वर्गाना पसंती देतात पण शिकवण्या न घेताही चांगले यश मिळविणारे विद्यार्थी पाहिले की समाधान वाटते. अशांशी संपर्क असल्यास आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होईल. प्रतिकूल परिस्थितीत कशी वाटचाल करावी? हेच ते आपल्या कृतीतून सांगत असतात, निरनिराळ्या विषयावर संशोधन करून मानवी जीवन सुसह्य करणारे शास्त्रज्ञ घ्या, समाजसुधारक घ्या.. ही मंडळी प्रचंड आशावादी असतात. त्यांच्या या दुर्दम्य आशावादामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची मनःशक्ती त्यांची ते निर्माण करतात. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बेकार असलेल्या विद्यार्थ्यांत नेमकी या मनःशक्तीची उणीव जाणवते. यातून हाती दगड घेणे, शस्त्र घेणे, नाहीतर आत्महत्या करणे असा विनाशक मार्ग ते अवलंबितात. परदेशांप्रमाणे आता भारतातही स्वेच्छा सेवा देण्यासाठी स्वयंसेवकांच्या तुकड्या बाहेर पडत आहेत. निम सरकारी संस्था स्थापन करत आहेत. आपला अमुल्य वेळ समाजकार्यासाठी वेचत आहेत. बेकारीत दिवस काढणारे क्वचितच अशा कामात स्वत:ला गुंतवून घेताना दिसतात. अशा विधायक कामात त्यांनी स्वत:ला जोडून घेतले तर त्यांना जगण्याचा अर्थ समजेल अशी दृष्टी मिळू शकते. कृती करण्यार्‍या व्यक्तींचा आपल्यावर प्रभाव जास्त पडतो. ह्यासाठी अशा व्यक्तींच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा.

– एखादा छंद जोपासा –

आपल्याला नोकरी मिळाली की आपल्याला थोडेफार स्थेर्य प्राप्त होते. त्यापूर्वी आपल्याजवळ भरपूर वेळ असतो. त्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी एखादा छंद निवडाल तर त्याचा तुम्हाला आयुष्यभर उपयोग होईल. निवृत्त झाल्यानंतर आपल्याजवळ भरपूर वेळ असेल तेव्हा तुम्ही हा वेळ कसा कारणी लावाल?.. अशा वेळी हे छंद तुमच्या मदतीला येऊ शकतात. माझ्या परिचयाचे एक गृहस्थ निवृत्त झाल्यानंतर सप्ताहातून एकदा जवळच्या हॉस्पिटलमध्ये फेरी मारून यायचे. अशा ठिकाणी नेहमीच मनुष्यबळाची गरज लागते. औषध आणण्यासाठी, रुग्णाला किंवा त्याच्या सोबत असलेल्याला खाणेपिणे देण्यासाठी, किंवा सोबत करण्यासाठी. आपण दुसर्‍याच्या उपयोगी पडलो ही भावना आपल्याला किती समाधान देऊन जाईल? आपणही अशा गरजा हुडकून त्याचे परिवर्तन छंदात करू शकता.

– प्रत्येक दिवसाला संधी समजा –

आपण बरेचदा गतकालाबद्दल खंत करीत, कुढत दिवस ढकलतो. ते दिवस किती चांगले होते?… ह्याबद्दल हळहळ व्यक्त करतो. पण हे सर्व उगाळताना येणार्‍या दिवसाचा तुम्ही अपमान करता. प्रत्येक दिवस कुठली संधी घेऊन उगवेल हे कोणीच सांगू शक्त नाही. भूतकाळात रमण्यात काहीही शहाणपणा नाही. वर्तमान तुम्हाला प्रत्यक्ष संधी देण्यासाठी असतो. सिंगापूरसारख्या देशाने नेत्रदीपक प्रगती केली त्यावेळी त्यांच्या नेत्यांनी वर्तमानाचा विचार केला आणि देशाला प्रगतीपथावर नेले. त्यासाठी कडव्या शिस्तीला झुकते माप दिले. आज आपल्या देशातील काही अपवादात्मक शहरे सोडली तर त्या शहरात प्रवेश करतानाच तुमचे स्वागत कचर्‍याने होते, रहदारीविषयी तर न बोललेले बरे. या वर्तमानकालीन समस्या सोडविणे सहज शक्य आहे कारण त्या समस्या मानवनिर्मित आहे. आपणाला जर संधी मिळाली तर ह्यावर तुम्ही उपाय काढू शकता आणि कौतुकाला पात्र होऊ शकता. महायुद्धातील बेचिराख झालेले जपान फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत जगातील अव्वल राष्ट्रात जाऊन बसले. जपानप्रमाणे जर्मनीचेही उदाहरण घेण्यासारखे आहे. रशिया, फ्रांस, इंग्लंड, अमेरिका या दोस्त राष्ट्रांनी हिटलर, मुसोलिनीच्या नाक्षीवादाचा पाडाव केला. जर्मनीला पुनर्बांधणीसाठी कर्ज दिले. त्याचा व्यवस्थित उपयोग करून पंचवीस वर्षातच बलाढ्य राष्ट्र म्हणून नावलौकिक मिळविला. याउलट आमच्याकडे एअर इंडिया ह्या ख्यातनाम विमान कंपनीचे धिंडवडे उडत आहेत. १९४८ साली सुरु झालेली ही सेवा शेवटचे आचके घेत आहे. कोट्यवधींचे नुकसान दरवर्षी सोसणार्‍या या सेवेला सरकारी आर्थिक सहाय्य बंद होऊ शकते. अशा नुकसानीची अनेक दारे आपल्या देशाचे वर्तमान बिघडवत आहेत. हे रोखण्यासाठी नव्या दमाचे, विचारांचे नेतृत्व गरजेचे आहे. असे नेतृत्व जे वर्तमानाचा विचार करणारे असेल. इथे युवकांना जास्त संधी आहे.

– विचार वैश्विक, कृती स्थानिक –

आज माहिती युगामुळे जग एक खेडे झालेले आहे. जगात कुठेही खुट्ट झाले तर त्याची माहिती घरबसल्या समजणे सहज सोपे झाले आहे. ह्याचा फायदा आपण जिथे ज्याची कमतरता आहे ते भरून काढण्यासाठी करू शकतो. साधा रहदारीचा विषय. विषय साधाच पण त्याला आपण जटीलतेचे स्वरूप दिले आहे. रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा ताफा अपुरा पडतो तेव्हा स्वेच्छा सेवेसाठी नागरिकांनी पुढाकार घेणे शक्य नाही का? मोटरसायकल चालविताना शिरस्त्राण घालण्याचे आवाहन मंत्र्यांना करावे लागते? हे नागरिकांना सुचू नये? पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. गावातील प्रमुख रहदारीच्या ठिकाणी या स्तरावर होम गार्डच्या धर्तीवर युवक नेमता येणार नाही का? शिरस्त्राण घालण्याचे आवाहन ग्रामीण पातळीवरच जर होऊ लागले तर रहदारीचा प्रश्न थोडा तरी कमी होणार नाही का? नूतन पंच मंडळींनी वैश्विक विचारांना स्थानिक कृतीचे रूप द्यायला जरूर पुढाकार घ्यावा. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे. समाजसेवेत सामावून घेण्याचे अनेक उपक्रम देशभरात होत असतात. त्या तत्वावर असे उपक्रम राबविले जावेत. ह्यासाठी युवक-युवती पुढाकार घेऊ शकतात.

– सुरवात तर करा –

बरेचदा आपल्या मनात कल्पना येतात पण त्याला आपण कृतीची जोड न दिल्याने ते मनातच गोठून जातात. तुम्हाला एखादी कल्पना सुचली असेल ना तर ती अंमलात आणण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची वाट पाहू नका. जे कोणी मदतीला येत असतील त्यांना घेऊन कामाला लागा. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ लागताच लोक आपोआप तुमच्या कामाशी जोडली जातील.
‘तू चलकर देख, तेरे साथ पुरा कारवॉं होगा|’… ह्याला साहस लागते. विचारांना आकार देणारे फार थोडे असतात. ही किंमत देण्याची तयारी अनेकांची नसते.. त्यासाठी आत्मविश्वास हवा. यश-अपयश ह्याचा विचार न करता मनातल्या कामाची सुरवात करावी. साधा रोजचा व्यायाम पहा. अनेकदा आळसामुळे आपण चालढकल करतो. त्याचा अनिष्ट परिणाम अखेरीला आपल्या आरोग्यावरच होतो नाही का? जीवनात विजेता व्हायचे असेल, यशश्वी व्हायचे असेल तर चांगल्या उद्याची वाट न बघता आज नव्हे तर आताच जे करायचे ठरवलेत त्याचा आरंभ करा. अभ्यासाचे उदाहरणही घेता येईल. बरेच विद्यार्थी सांगितलेला अभ्यास करतील पण यशस्वी होण्यासाठी अभ्यासापलीकडे जाण्याची आवश्यकता असते.
असे म्हणतात की
‘‘जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा
पळता येत नसेल तर चाला
चालताही येत नसेल तर रांगा
……. पण सतत हालचाल करा.!
शुभारंभ नेई यशाकडे…’’ हे विसरू नये.

एका अंधार्‍या रात्री एक शेतकरी हातात कंदील घेऊन उभा होता. आपल्याच विचारात काळजीने एकाच ठिकाणी उभा होता. तेथूनच जाणार्‍या एका फकिराने त्याला हटकले. त्याची चौकशी केली. त्यावेळी शेतकर्‍याला दुसर्‍या गावात जायचे होते असे समजले. ‘‘जर तुला दुसर्‍या गावात जायचे आहे तर असा उभा का राहिला आहेस? तुला अंधाराची भीती वाटते की तुला कष्ट झेपणार नाहीत?’’ त्यावर शेतकरी म्हणाला, ‘‘तुम्ही समजता तसे काही नाही. मला भीतीही वाटत नाही की कष्टही न झेपण्याचा प्रश्न नाही. माझ्या कंदिलाचा उजेड फक्त दहा पावलांवर पडतो, मग मी एवढा पल्ला गाठणार तरी कसा?’’ यावर फकीर हसून म्हणाला, ‘‘अरे एवढेच ना. तू पहिले पाऊन टाकशील तेव्हा प्रकाश दहा पावलापर्यंत पडलेला असेल. तुझा सगळा प्रवास प्रकाशातच होईल आणि पावलागणिक तू ज्या गावात जायचे ठरविले आहेस तिथे पोचशील’’. शेतकर्‍याला फकिराचे म्हणणे पटले आणि तो गावाच्या प्रवासाला निघाला.
यशासाठी प्रयत्न, परिश्रम घ्यायला हवेतच पण ह्या सर्वामध्ये सातत्य हवे तरच त्याची फलश्रुती मिळेल. नेपोलियन हिल ह्यांनी म्हटलेले आहे की संयम, जिद्द आणि शरम या त्रयींचा संयोग हे सुयशप्राप्तीचे अजिंक्य रसायन आहे. जगात कितीतरी लोक आहेत की ते मोठ्या आशेने, उत्साहाने नवनवे संकल्प करतात. नववर्षाच्या सुरवातीला तर याला उधाण येते. कोण लवकर उठण्याचा, कोण लवकर झोपण्याचा तर कोण डायरी लिहिण्याचा संकल्प करतो. पण त्यांचे हे संकल्प औट घटकेचे ठरतात. अंमलबजावणीत ढिलाई येते. एकदा पिकासो ह्या जगविख्यात चित्रकाराला एका सुंदर दिसणार्‍या महिलेने भर बाजारात गाठले व तिने आपल्या हातातला कागद पुढे करत आपले चित्र काढण्याची विनंती केली. पिकासोने तिने दिलेल्या कागदावर तिचे सुंदर, हुबेहूब चित्र रेखाटून तो कागद तिला परत दिला. तिचे ते सुंदर चित्र पाहून ती महिला हरखून गेली. त्या चित्राची किंमत तिने विचारली. त्यावर पिकासोने सांगितले- तीन हजार डॉलर. एवढी किंमत ऐकून त्या महिलेला धक्काच बसला. म्हणाली, ‘‘हे चित्र काढायला तुम्हाला अवघे काही मिनिटे लागली आणि त्यासाठी एवढी किंमत?’’ त्यावर पिकासोने तिला सांगितले, ‘‘हे प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मला आयुष्याची तीस वर्षे खर्च करावी लागली त्याचे काय?’’ नुसता संकल्प सोडून चालत नाही पूर्णत्वासाठी म्हणजेच यशासाठी अखंड सेवा जिद्दीने केली पाहिजे. येणार्‍या अडथळ्याना दूर करत, सामोरे जात ध्येय गाठता आले पाहिजे. तेव्हा वेळ न दवडता आगे बढो!