कवळेकर प्रकरणी सुनावणी ४ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

0
106

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या घरात मटक्याचे साहित्य मिळाल्याप्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात केलेल्या अर्जावर काल सुनावणी झाल्यानंतर कामकाज दि. ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. कवळेकर यांच्यासह त्यांचे भाऊ बाबल कवळेकर यांना तोपर्यंत अटक करू नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयात याप्रकरणी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यासाठी त्यांनी आणखी वेळ मागून घेतला. दि. १६ रोजी गुन्हा अन्वेषण विभागाने धाड घालून कागदपत्र सील केले होते. पण ते उघडण्यात आणखी तीन दिवस त्यांना लाभले. आता हे साहित्य सील मारलेले असल्याने ते कोणी ठेवले असा प्रश्‍न उपस्थित होतो असा युक्तीवाद बाबल कवळेकर यांचे वकील राजीव गोम्स यांनी केला. आपले अशील फातोर्डा येथे राहतात, असे गोम्स यांनी न्यायालयाला सांगितले.
आता कवळेकर यांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनाही गुन्हा अन्वेषण विभाग चौकशीसाठी बोलावणार आहे. पुढील आठवड्यात त्यांना बोलावण्याची शक्यता आहे.