कवळेकरांनी ‘एसीबी’समोर येण्याचे टाळले

0
93

>> बेहिशेबी मालमत्ता प्रकरण

>> विधानसभा अधिवेशनाच्या कामात व्यस्तचे कारण

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पोलिसांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी काल टाळले. येत्या विधानसभा अधिवेशनामुळे आपण व्यस्त असल्याने हजर राहू शकणार नसल्याचे कारण त्यांनी एसीबीला दिले आहे. एसीबीने त्यांना चौकशीसाठी हजर राण्यासाठी रविवारी समन्स बजावले होते.

कवळेकर यांना काल सकाळी ११ वाजता आपल्यासमोर हजर राहण्यासाठीचे समन्स भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पोलिसांनी काढले होते. मात्र, येत्या विधानसभा अधिवेशनामुळे आपण व्यस्त असून हजर राहण्यास आपणाला थोडा अवधी देण्यात यावा, अशी मागणी काल कवळेकर यांनी केली. सुमारे ४ कोटी रु. च्या अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने कवळेकर यांच्याविरुद्ध गेल्या सप्टेंबर महिन्यात एफआयआर नोंद केले होते.

गोवा पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली २०१२ साली कवळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. वृत्तपत्रांत आलेल्या वृत्ताचा आधार घेत पोलिसांनी सुमोटो पद्धतीने हा गुन्हा नोंदवला होता. भूखंड वितरीत करताना गैरप्रकार झाल्यासंबंधीचे ते वृत्त होते. तद्नंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत कवळेकर यांची केरळ राज्यासह गोव्यात अवैध मालमत्ता असल्याचे पोलिसांना चौकशीत आढळून आले होते. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी २०१३ साली त्यासंबंधीचा चौकशी अहवाल सरकारला सादर केला होता.

पोलिसांनी कवळेकर यांच्या बेतूल येथील घरासह विविध आस्थापनांवर छापेही मारले होते. त्यावेळी पोलिसांना मटक्याच्या स्लिप्सही मोठ्या प्रमाणात सापडल्या होत्या. त्यामुळे जुगार प्रतिबंधक कायद्याखालीही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.