कला अकादमी परिसरात १२ जानेवारीपासून लोकोत्सव

0
78

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाचा भारतीय हस्तकला, लोकगीते, लोकसंगीत आणि विविधांगी लोककलांचा समावेश असलेला १९ वा ‘लोकोत्सव २०१८’ महोत्सव १२ ते २१ जानेवारी पर्यंत कांपाल, पणजी येथील कला अकादमीच्या संकुल परिसरात घेण्यात येणार आहे. यंदाचा लोकोत्सव प्लॅस्टिकमुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

१२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते दहा दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सकाळी ९.३० ते रात्री ९.३० या वेळेत होणार आहे. लोककला कार्यक्रम दर्यासंगमावर संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून सुरू होतील. या महोत्सवात १६ राज्यांतील सुमारे पाचशे ते सहाशे लोककलाकार व देशाच्या विविध भागातील पाचशेच्यावर हस्तकलाकार सहभागी होणार आहेत, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
या महोत्सवात साधारण दोन कोटी रुपयांची उलाढाल होते. महोत्सवात देशभरातील ३०० हस्तकला कारागिरांना गाळे दिले जाणार आहेत. खाद्य विक्री करणार्‍यांसाठी ५० गाळे दिले जातील. तसेच स्थानिक स्वयं साहाय्य गटांना सामान विक्रीसाठी गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. लोकोत्सवासाठी गाळ्यांसाठी स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. परंतु, जागेच्या अभावी काही जणांना जागा उपलब्ध करण्यास अडचण निर्माण होत आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
या महोत्सवामुळे वाहन पार्किंगची समस्या निर्माण होऊ नये म्हणून खास सोय उपलब्ध करण्यात आली आहे. लोकोत्सवासाठी येणार्‍यांनी बांदोडकर मैदान, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मैदानावर वाहन पार्किंग सोय उपलब्ध करण्यात येईल, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

महोत्सव काळात कला अकादमीच्या आवारात स्वच्छता व साफसफाई राखण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. आठ मोबाइल टॉयलेट उपलब्ध केले जाणार आहेत. स्वच्छता राखण्यासाठी खास हाउस किपिंग एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. दर दिवशी संध्याकाळी ६.३० ते ९.३० यावेळेत दर्या संगमावरील मंचावर कार्यक्रम होतील. या महोत्सवात गोव्यातील विविध लोकनृत्ये सादर होतील. त्याच बरोबर सिक्कीम, राजस्थान, आसाम, गुजरात, ओरीसा, पश्‍चिम बंगाल, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, त्रिपुरा, उत्तराखंड आदी राज्यातील चाळींसच्यावर लोकनृत्य प्रकारांचे सादरीकरण केले जाणार आहे. खुल्या नाट्यगृहात पाश्‍चात्त्य सांगीतिक कार्यक्रम, शालेय मुलांकडून गोमंतकीय पारंपरिक लोकनाट्यांचे सादरीकरण केले जाणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.