कला अकादमीत २७ पासून ‘प्रवाह’ नृत्यमहोत्सव

0
83
कथक नृत्य सादर करताना मधुमिता मिश्रा व साथी कलाकार.

पणजी
कला अकादमी गोवा व इंडिया इंटरनॅशनल रूरल कल्चरल सेंटर नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ रोजी सायं. ६ वा. ‘प्रवाह’ या नृत्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात होणार्‍या या महोत्सवाचे उद्घाटन गोव्याचे कला व संस्कृतीमंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्या हस्ते होणार असून सदर महोत्सवात कथ्थक, ओडिसी तसेच छाऊ नृत्यप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवातील दोन्ही नृत्य कार्यक्रम रसिकांसाठी खुले आहेत.
उद्घाटन समारंभाला जोडून दि. २७ रोजी सायंकाळी ६.१० वा. कोलकाता येथील कथ्थक नृत्यांगना मधुमिता मिश्रा व साथी कलाकारांतर्फे कथ्थक नृत्य सादर करण्यात येणार आहे. तसेच दि. २८ रोजी सायं. ६ वा. नवी दिल्ली येथील प्रसिद्ध नृत्यकलाकार सुशांत महाराणा व साथी कलाकार यांची ओडिसी व छाऊ नृत्य प्रस्तुती रसिकांना अनुभवता येणार आहे.
प्रमुख कलाकारांचा संक्षिप्त परिचय
मधुमित मिश्रा : मधुमिता मिश्रा या कथ्थक नृत्यातील एक प्रसिद्ध कलाकार आहेत. संगीताची पार्श्‍वभूमी असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून जयपूर घराण्याचे पं. रामगोपाल मिश्रा यांच्याकडून संगीताची तालीम घेतली व त्यानंतर पं. विजय शंकर यांच्याकडून लखनौ घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांच्याकडून कथ्थक नृत्याचे मार्गदर्शन घेतले. त्या दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
सुशांत महाराणा : सुशांत महाराणा हे ओडिसी व छाऊ नृत्यातील एक प्रसिद्ध कलाकार असून वडिल गुरू त्रिनाथ महाराणा यांच्याकडून त्यांनी ओडिसी नृत्याचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या मंजरी, ओडिसी नृत्यालयामध्ये ते सध्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. ‘नृत्य मंजरी’ या प्रसिद्ध अशा पथकाचे नृत्य संयोजक म्हणून त्यांना नावलौकिक मिळालेला आहे.