कला अकादमीत चतुरंग नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन

0
109
कला अकादमीत चतुरंग नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करताना महापौर विठ्ठल चोपडेकर. सोबत मान्यवर. नाट्यमहोत्सवात हिंदी स्टँडअप कॉमेडी शो सादर करताना राजू श्रीवास्तव.

पणजी (सां. प्र.)
पणजी येथील कला अकादमीत काल शुक्रवार दि. १२ रोजी चतुरंगच्या बहुभाषिक नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनाचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्या हस्ते चतुरंग नाट्यमहोत्सवाचे पारंपरिक समई प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यंदाचा महोत्सव रंगकर्मी स्व. तातोबा वेलिंगकर यांना अर्पण करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर सेझा गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन सिंघल, एचडीएफसी बँकेचे विक्री व्यवस्थापक मोहित गुप्ता, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख सुयश आस्थाना, तातोबा वेलिंगकर यांच्या स्नुषा दुर्गा वेलिंगकर, उद्योजक विलास देसाई, स्वस्तिकचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर, कार्यकारी सदस्य विनयकुमार मंत्रवादी, हे उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे हेतल गंगानी यांनी सूत्रसंचालन केले.
यानंतर कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात राजू श्रीवास्तव यांचा हिंदी स्टँडअप कॉमेडी हा विनोदी प्रयोग झाला. त्यांनी रसिकांचे भरपूर मनोरंजन केले.
आज शनिवार दि. १३ रोजी या महोत्सवात दुपारी ३.३० वा. चॅलेंज हे स्वा. सावकर व मदनलाल धिंग्रा यांच्या मैत्रीवर आधारित नाटक होईल. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वा. इंग्लिश स्टँडअप कॉमेडी शो होईल. रविवार दि. १४ रोजी सकाळी ११ वा. वस्त्रहरण हे मालवणी नाटक होईल. दुपारी ३.३० वा. संगीत देवबाभळी हे नाटक होईल. महोत्सवाची सांगता दॅट्‌स माय गर्ल या इंग्रजी नाटकाने होणार आहे. नाट्यमहोत्सवाची तिकिटे बुक माय शो या संकेतस्थळावर ऑन लाई तसेच कांपाल येथील पेस्ट्री कॉटेज येथे उपलब्ध आहेत.