कला अकादमीच्या सभागृहांबाबत काही सूचना

0
100

– डॉ. राजीव कामत, खोर्ली-म्हापसा
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या द्रष्टेपणामुळे आपल्या गोव्याला काही वरदाने लाभली. शिक्षणाच्या स्तरावर त्यांनी उभे केलेले अनेक ंउपक्रम निश्‍चितच स्तुत्य आहेत. यात गावागावांतून प्राथमिक शाळांचे जाळे, विविध विद्यालये व महाविद्यालये, ज्यात गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय व गोवा वैद्यकीय महाविद्यालय ही उठून दिसतात. अन्य पूरक असे उपक्रम राबविण्यातही त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. संगीताच्या प्रसार व शिक्षणासाठी गोव्यात ‘कॉलेज ऑफ म्यूझिक’ हे महाविद्यालय उभे करताना त्यांनी जगद्विख्यात गोमंतकीय वास्तुस्थापत्यविशारद चार्लस कुरैय्या यांच्या सहकार्याने ‘कला अकादमी’ या गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातली एक भूषण ठरलेल्या वास्तूची उभारणी करण्याची कल्पकता दाखवली. यामुळे वास्तूत सर्व प्रकारचे संगीत, नृत्य, नाटक व अन्य कलाप्रकार शिकण्याची सोय झाली. हे सर्व प्रकार शिकण्याची सोय करतानाच त्यांनी विविध कलाप्रकार सादर करण्यासाठी लोकांची सोय व्हावी म्हणून मोठ्या कल्पकतेने विविध सभागृहांची निर्मिती केली. यात सुसज्ज असे ‘दीनानाथ मंगेशकर सभागृह’, लहान कार्यक्रम अगदी भारतीय बैठक पद्धतीने साकार करण्यासाठी ‘ब्लॅक बॉक्स’, लहानसहान चर्चासत्रांसाठी एक छोटे खुले ‘मिनी थिएटर’ व खुल्या जागेवर भरणारे कार्यक्रम होण्यासाठी एक मोठे असे ‘खुले सभागृह’ या सर्व सोयींमुळे व येथे सतत भरणार्‍या काही ना काही उपक्रमांमुळे या वास्तूंमध्ये पाय ठेवताक्षणीच मनाला एक प्रकारची उभारी येते.
‘ब्लॅक बॉक्स’ बद्दल अगदी थोडक्यात लिहायचे झाल्यास इतकेच म्हणावेसे वाटते की, या ब्लॅकबॉक्सची पूर्वीची रयाच गेलेली आहे. पूर्वीचे म्हणजे जे मूळ आराखड्यानुसार बांधले गेलले ब्लॅकबॉक्स होते, त्यात शिरल्याक्षणीच एक प्रकारचा आपलेपणा यायचा. खाली पसरलेल्या गालिचावर भारतीय पद्धतीने बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेताना मन प्रसन्न व्हायचे. वडीलधार्‍या माणसांसाठी बाजूला असलेल्या मोठ्या पायर्‍यांवर बसण्याची सोय होती, त्यामुळे सगळीकडे घरगुती वातावरण असायचे. पण कोणाच्या तरी सुपिक डोक्यातून चार्ल्स कुरैय्यांची ही बांधणी पूर्णपणे बदलण्याची कल्पना आली व त्याला मूर्त स्वरुप देताना त्यांनी या ब्लॅक बॉक्सचे आधुनिकतेच्या नावाखाली विद्रूपीकरण करून टाकले. आता यात फक्त काळ्या भिंतीच दिसतात. बैठकीसाठी इतर हॉलप्रमाणे खुर्च्यांचाच वापर केला जातो.
आता प्रस्तुत लेख लिहिण्याचे प्रायोजन. पंधरा दिवसांपूर्वी माझ्या दवाखान्यात ‘वॉकर’ घेऊन लंगडत चालणारी माझी एक महिला रुग्ण अवतरली. साहजिकच मी तिच्याकडे याबाबतीत सहज चौकशी केल्यावर समजले की ती या खुल्या सभागृहात एका कोकणी तियात्रासाठी गेली असता, तियात्र संपल्यानंतर बाहेर येताना पडून तिच्या पायाचे हाड मोडले. हे ऐकून माझ्या बाबतीत सात – आठ वर्षांपूर्वी घडलेली एक तशीच घटना आठवली. एक महानाट्य बघण्यास मी तेथे गेलो होतो. थिएटर हाऊसफुल्ल होते. नाटक संपले व बाहेर जाण्यासाठी प्रत्येकजण धडपडू लागला. तोपर्यंत सभागृहाचे आतील दिवे लावले गेले नव्हते. अंधारात चाचपडत असताना अचानक जवळच एका बाईची किंकाळी ऐकू आली. तोपर्यंत कोणीतरी दिवे लावण्याची सूचना केल्यामुळे थिएटरमध्ये प्रकाश पडला होता आणि माझ्या समोरच्या पायरीवर एक बाई खाली पडलेल्या अवस्थेत वेदनेने किंचाळत होती. एका डॉक्टरच्या नात्याने वेळ न दवडता मी तिच्याजवळ पोचून काय झाले याची चौकशी केली. तिने मला ती वरच्या पायरीवरून उतरताना खाली पडल्यामुळे तिच्या पायात प्रचंड वेदना होत असल्याची तक्रार केली. मी जेव्हा तिचा पाय हातात घेतला, तेव्हा मला तिच्या पायाची दोन्ही हाडे मोडल्याचे दिसून आले. लगेच मी तिथेच बाजूला पडलेली एक लाकडी कांब व बाईचा दुपट्टा घेऊन तिचा मोडलेला पाय व्यवस्थितपणे बांधून स्थिर केला. हॉस्पिटलमध्ये माझ्या एका अस्थिरोगतज्ज्ञाला फोन करून रुग्णवाहिकेची व्यवस्था करून तिला त्या हॉस्पिटलमध्ये हलवले. जिथे तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आता माझ्या दवाखान्यात जी महिला आली होती. तिच्याकडून समजले की या खुल्या सभागृहात आणखी चार पाच अशाच तर्‍हेच्या केसेस घडल्या आहेत. आता अशा घटना का घडतात. त्या घडूनसुद्धा व्यवस्थापानाकडून त्याची योग्य ती दखल घेऊन त्यावर उपाययोजना का केली जात नाही आणि अशा घटना घडू नयेत यावर प्रतिबंधक उपाय का केले जात नाहीत, यावर थोडा उहापोह होणे गरजेचे वाटते.
कारण क्र. १ :
या सभागृहाच्या पायर्‍या या लोकांना त्यावर बसून कार्यक्रम बघता यावा यासाठी बनवल्या गेल्या आहेत. पण काही अनाकलनीय कारणांमुळे तिथे खुर्च्या घातल्या जातात, ज्यामुळे त्यावरून उठताना पुष्कळ वेळा पायरीच्या कडेचा व उंचीचा नीट अंदाज न आल्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे या सभागृहात खुर्च्या घालण्यासंदर्भात फेरविचार व्हावा.
कारण क्र. २ :
कार्यक्रम चालू असताना सभागृहात जवळजवळ संपूर्ण अंधार असतो. त्यामुळे जेव्हा कार्यक्रम संपतो, तेव्हा लगेचच सभागृहाचे दिवे लावले न गेल्यामुळे व प्रत्येकाला बाहेर जायची घाई असल्यामुळे असे अपघात घडतात. त्यामुळे मध्यंतरात लोकांना याबाबतीत सूचना देणे आवश्यक वाटते. तसेच कार्यक्रम संपताक्षणीच सभागृहाचे दिवे उजळवणे तितकेच जरूरीचे आहे. त्यामुळे अशा घटना रोखल्या जाऊ शकतात.
कारण क्र. ३ः
या पायर्‍याची उंची जरा जास्त असल्यामुळे पुष्कळ वेळा हातात एखादे मूल किंवा बॅग असल्यास त्या उतरताना पायावर तोडा ताण येऊन खाली पडून हाडे मोडण्याची शक्यता असते. त्यामुळे पायर्‍यांच्या या उंचीवर काही उपाययोजना करता येईल का याचा विचार व्हावा.
कारण क्र. ४ :
कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर जाण्यासाठी एक दोन दरवाजेच उघडले जातात. या सभागृहाला असलेले सर्व दरवाजे जर खुले केले गेले असते तर काही प्रमाणात अशा गोष्टी टाळता येतील.
माझी कला अकादमीच्या व्यवस्थापनाला अशी विनंती आहे की सर्वप्रथम त्यांनी अशा किती घटना घडल्या आहेत याचा आढावा घ्यावा. किती जण नुसतेच पडून मुका मार लागूनच बचावले आहेत, पण किती जणांची हाडे मोडली आहेत. व त्यावर व्यवस्थापनातर्फे काय उपाययोजना झाली आहे, याचा खुलासा व्हावा. आणि लोकांनाही माझी अशी विनंती आहे, की त्यांनी या सभागृहातून कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर जाण्याची घाई न करता थोडा संयम बाळगून काळजी घेतली, तर अशा घटना नक्की टाळता येऊ शकतील. कला अकादमीच्या व्यवस्थापक वर्गाने यावर जरूर विचार करावा.