कलशाध्याय

0
147

>> प्रा. रमेश सप्रे

जागतिक सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंदांची कामगिरी सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशीच होती. सर्व जगातून, सर्व धर्मपंथातून अनेक ज्ञानी मंडळीही त्यांच्या विचारांनी प्रभावित झाली. संपूर्ण परिषदेत स्वामीजींची बारा लहानमोठी व्याख्यानं झाली. त्यांना भव्य निवासस्थानात घुसमटल्यागत होत असे जेव्हा त्यांना त्यांचे कोट्यवधी भारतीय बांधव जे उपाशी, उघडेवागडे, राहायला घर किंवा डोक्यावर साधं छप्परही नसलेले असे होते, त्यांची आठवण यायची…

सर्वधर्मपरिषदेसमोरील पहिलं व्याख्यान हा स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्यातील सर्वोच्च असा कलशाध्याय होता. असा अध्याय की ज्याच्यामुळे इतर अनेकांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला. स्वामीजींच्या कार्याचा कळस होतं त्यांचं ते भाषण. त्यात गुरूदेव रामकृष्णांचं ‘वचनामृत’ जसं होतं तसंच अमेरिकेला येण्यापूर्वी केलेल्या परिक्रमेतून झालेल्या भारताचं – भारतीयांचं जीवनदर्शन होतं. शिवाय स्वामीजींचा प्रचंड व्यासंग, चिंतन हेही होतं. याच्या जोडीला होतं त्यांचं कृष्णासारखं सर्वांना आकर्षून घेणारं व्यक्तिमत्त्व.
आर्ट पॅलेस नावाच्या भव्य सभागृहात सात हजार देशविदेशातून आलेल्या, जगातील सर्व धर्मपंथांचं प्रतिनिधित्व करणार्‍या उत्सुक श्रोत्यांसमोर स्वामीजी बोलण्यासाठी उभे राहिले त्याच्यापूर्वी तीस बुजुर्ग वक्त्यांनी आपली विद्वत्तापूर्ण, गंभीर भाषणं आपण जणू सर्वांच्या उद्धारासाठी इथं आलो आहोत या भूमिकेतून केली होती. श्रोतृवर्ग काहीसा दबून-उबून म्हणजे कंटाळून गेला होता.
ज्यावेळी एक विशिष्ट वेषभूषा केलेला राजबिंडा तरुण व्याख्यान देण्यासाठी उभा राहिला तेव्हा सर्वांच्या मनात असतानाच जणू आकाशवाणी व्हावी अशा स्वरात शब्द आले – ‘माझ्या अमेरिकेतील भगिनींनो नि बंधूंनो!’ हा हे काय बोलतोय हे न समजताच सारं सभागृह उभं राहिलं नि टाळ्यांच्या कान बधीर करणार्‍या कडकडाटानं दुमदुमून गेलं. टाळ्या काही केल्या थांबेचनात. अखेर जेव्हा टाळ्यांचा गजर मंदावून श्रोते आसनस्थ झाले तेव्हा त्या युवकानं – स्वामीजींनी – पुढं बोलायला सुरवात केली.
विद्येची देवता असणार्‍या देवी शारदेला (सारदामातांना!) मनोमन प्रणाम करून केलेली ही सुरवात सर्वांना जिंकून गेली.
पुढचा मुद्दा होता- जगातील सर्वांत प्राचीन धर्मपरंपरेचा सर्वांत तरुण प्रतिनिधी म्हणून हे भाषण करतोय. अमेरिका या जगातील सर्वाधिक तरुण अशा राष्ट्राला अभिवादन करायला स्वामीजी विसरले नाहीत. सर्वधर्मसमभावच नव्हे तर सर्व धर्मपंथाचं स्वागत हे या धर्मपरंपरेचं वैशिष्ट्य आहे. उदाहरण म्हणून आश्रयासाठी आलेल्या यहूदी (ज्यू) नि पारशी लोकांना हिनं आपल्या पंखाखाली घेतलं. त्यांना आश्रय – आधार दिलाच. पण आक्रमक अशा परधर्म – संस्कृतीच्या लोकांच्या प्रथापरंपराही आत्मसात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. असा परधर्मसहिष्णुतेचा म्हणजे सर्वांच्या धर्मांचा स्वीकार करणार्‍या वृत्तीचा उल्लेख करताना स्वामीजींनी शिवमहिम्न स्तोत्रातील एका श्‍लोकाला उद्धृत केलं.
रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषाम् |
नृणां एको गम्यः त्वमसि पयसां अर्णव इव ॥
म्हणजे भिन्न भिन्न उगमातून निघालेले जलप्रवाह ज्याप्रमाणे सरळ किंवा वाकड्या (ऋजुकुटिल) मार्गांनी वाहत येऊन जसे एकाच महासागराला येऊन मिळतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांवरून चालत जाणारे पथिक (प्रवासी) अंती एकाच मुक्कामाला जाऊन पोचतात ही वस्तुस्थिती आहे. असा दुसर्‍याच्या मतांचा – श्रद्धांचा आदरपूर्वक स्वीकार करण्याचा संस्कार आमच्या मनावर अगदी लहानपणापासून अशा स्तोत्रांच्या माध्यमातून केला गेला.
आजच्या आपल्या देशातील – समाजातील परिस्थितीचा विचार केला तर हा मौलिक संस्कार लुप्त (नाहीसा) तर झाला नाही ना असा संशय मनात येतो.
यापुढे स्वामीजींनी गीतेतील एक श्‍लोकही श्रोत्यांना ऐकवला-
ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथैव भजाम्यहम् |
मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥
म्हणजे ज्या भावाचा (संबंधाचा) आश्रय घेऊन तुम्ही माझ्याकडे येता त्याच भावनेनं नि संबंधानं मी तुमच्याकडे पाहतो नि वागतो. जो माझा भक्त बनतो त्याचा मीही भक्त होतो, जो सखा बनतो त्याचा मी सखा, जो दास बनतो त्याचा मी दास नि जो शत्रूचा संबंध जोडून येतो त्याचा मी शत्रू बनून संहार करतो. उदा. कंस, रावण इ. लोक चालत असलेले सारे मार्ग मलाच येऊन मिळतात, हे सत्य आहे.
पुढे स्वामीजींना आपल्या विहीरीतील बेडकांची गोष्ट सांगून सर्वांच्या संकुचित कूपमंडूक (म्हणजे विहिरीतील बेडूक) वृत्तीचा निषेध केला. ‘माझाच धर्म एकमेव, सर्वश्रेष्ठ’ असं मानणार्‍यांकडून मानवजातीला, मानवतेला धोका आहे हे सांगायलाही स्वामीजी विसरले नाहीत.
आपल्या छोट्याशा (स्वागताला उत्तर देण्यासाठी केलेल्या) भाषणाचा समारोप करताना स्वामीजी उद्गारले – प्रत्येक जण आपापला ध्वज उंचावतोय. पण लवकरच या धर्माधर्मांच्या ध्वजावर लिहिलं जाईल – ‘संघर्ष नको, परस्परांना साह्य करा.’ ‘विनाश नको, आत्मसात करा.’ नि ‘कलह नको, मैत्री हवी. शांती हवी.’
अगदी कळसाचं वाक्य होतं – ‘या सर्वधर्मपरिषदेचा आरंभ चर्चमधील घंटानादानं झाला. पण हा घंटा (बेल्) नाद येणार्‍या काळात सर्व धर्म पंथ भेदांसाठी मृत्युघंटानाद (डेथ नेल् – ‘केएन्‌इएल्‌एल्’) ठरेल.’
‘तसा तो ठरो’ हीच भावना स्वामीजींच्या मनात होती. तशी त्यांची प्रार्थनाही होती नि तसं घडणारच हा आत्मविश्‍वासही होता. या विश्‍वासाच्या प्रकाशात नि प्रसारार्थ स्वामीजींचं पुढचं (उरलेलं फक्त नऊ वर्षांचं) आयुष्य सरणार होतं. त्यांचं ते रामकृष्णांनी सांगितलेलं कालीमातेच्या मनातलं अवतारकार्य असणार होतं.
पण हा प्रवास संकटं नि आव्हानं यांनी भरलेला होता. वाईट म्हणजे याच्या जोडीला स्वामीजींची अनेक व्याधिग्रस्त ढासळणारी प्रकृती असणार होती. पण नक्षत्रांचं देणं नि गुरुकृपांकित शिष्य असलेल्या यापैकी कशाचीच तमा (पर्वा) नसणार होती.
‘जागतिक सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंदांची कामगिरी सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशीच होती. सर्व जगातून, सर्व धर्मपंथातून अनेक ज्ञानी मंडळीही त्यांच्या विचारांनी प्रभावित झाली. संपूर्ण परिषदेत स्वामीजींची बारा लहानमोठी व्याख्यानं झाली. बर्‍याच वेळा समोरच्या वक्त्याचे विचार खूप नीरस व कंटाळवाणे झाले तर श्रोत्यांच्यातून (विशेषतः महिलावर्गातून) जोरदार मागणी व्हायची- ‘वुई वॉंट विवेकानंद .. वुई वॉंट विवेकानंद’ अन् मग श्रोत्यांच्या आग्रहापुढे आयोजकांना मान तुकवावी लागायची. मग स्वामीजींना छोटंसं भाषण, एखाददुसरी गोष्ट सांगण्याची सूचना होई, तेही त्या सूचनेचा सस्मित, सहज, उत्स्फूर्त स्वीकार करत. छानसं हितगूज केल्यासारखं भाषण करत.
स्वामीजींना या काळात वृत्तपत्रांनी खूप प्रसिद्धी दिली. याला दृष्ट लागू नये म्हणून कडक कडव्या विचारांच्या ख्रिस्ती वृत्तपत्रांनी व धर्मोपदेशकांनी निंदाही केली. स्वामीजींच्या चारित्र्यहननाचाही पद्धतशीर प्रयत्न केला गेला. त्याला भारतातील काही धर्मप्रतिनिधींची साथही होती. दुर्दैव म्हणजे यातले काही प्रतापचंद्र मुजुमदारांसारखे एरवी मित्र असणारे लोकही होते.
स्त्रियांच्या संबंधातही स्वामीजींवर चिखलफेक केली गेली पण काही स्त्रियांनीच या आरोपांना परस्पर उत्तरं दिली. एकू्‌ण काय यापुढचा म्हणजे सन१८९३ ते १९०२ पर्यंतचा कालखंड स्वामीजींच्या दृष्टीनं खूप कष्टांचा, महान कार्याचा तसंच मानसिक यातनांचा – मनस्तापाचा गेला. पश्चात्ताप मात्र कधीही, कशाबद्दलही स्वामीजींना झाला नाही.
‘सर्वधर्मपरिषद’ हा जसा कलशाध्याय होता तसाच त्यांच्या जीवनातला क्रांतिकालही (टर्निंग पॉइंट) होता. अमेरिका-युरोपातील राष्ट्रं यातून स्वामीजींच्या व्याख्यानांचा तुफानी दौरा आयोजित गेला गेला. निरनिराळ्या विषयांवर – जिज्ञासापूर्तीसाठी किंवा नवीन ज्ञान – मिळवण्यासाठी अशी व्याख्यानं आयोजित केली जात. प्रत्येक व्याख्यानानंतर वा व्याख्यानमालेनंतर स्वामीजींना खूप प्रेम करणारे लोक – मुख्य म्हणजे कार्यकर्ते – मिळत गेले. त्यांना पोटापाण्याच्या व्यवस्थेची चिंता करावीच लागली नाही. या सगळ्या जल्लोशात स्वामीजीही फुलून जायचे. पण अनेकवेळा त्यांचा घास घशात अडकत असे, त्यांना नवे कपडे घालण्याची लाज वाटत असे; त्यांना मऊ मऊ गाद्यांवर झोप लागत नसे; त्यांना भव्य निवासस्थानात घुसमटल्यागत होत असे जेव्हा त्यांना त्यांचे कोट्यवधी भारतीय बांधव जे उपाशी, उघडेवागडे, राहायला घर किंवा डोक्यावर साधं छप्परही नसलेले असे होते, त्यांची आठवण यायची. ते उदास, अंतर्मुख होऊन विचारात बुडून जायचे .. अशावेळी त्यांना गुरुदेवांचे थरथरत्या आवाजातील शब्द ऐकू यायचे. ‘नोरेन, तुला वटवृक्ष व्हायचंय. खूप मोठं कार्य तुझ्याकडून घडायचंय. इथं तुला मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये., ही सारी कालीमातेची इच्छा आहे. जोय कालीमॉं!’