कर्नाटकमधील १४ बंडखोर आमदार अपात्र

0
140

>> सभापती रमेशकुमार यांची पत्रकार परिषदेत घोषणा : आधी केले होते तिघांना अपात्र

कर्नाटक राज्य विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी काल घाईघाईत बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत पक्षांतरविरोधी कायद्याखाली आणखी १४ बंडखोर आमदारांना विधानसभेच्या २०२३ च्या मुदतीपर्यंत अपात्र केल्याची घोषणा केली. तीन बंडखोर आमदारांना याआधीच त्यांनी अपात्र जाहीर केले होते. त्यामुळे २२४ आमदारांच्या या विधानसभेतील अपात्र आमदारांची एकूण संख्या १७ झाली आहे. कॉंग्रेसचे १३ व जेडीएसचे ४ असे हे आमदार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील कॉंग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर भाजपचे नेते बी. एस. येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आजच विधानसभेच्या पटलावर बहुमत अजमावणार आहेत.

सभापती रमेशकुमार यांनी २२४ पैकी १७ आमदारांना अपात्र ठरविल्याने आता कर्नाटक विधानसभेचे संख्याबळ २०७ वर घसरले आहे. त्यामुळे बहुमतासाठी येडीयुरप्पा यांना १०४ आमदारांची गरज आहे. एका अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यासह भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ आहे. कॉंग्रेसकडे एका नियुक्त आमदारासह ६६ जण आहेत. जेडीएसचे ३४ आमदार असून बसपाच्या एकमेव आमदाराला त्यांच्या पक्षाने कुमारस्वामी यांच्या बाजूने विश्‍वासदर्शक ठरावावेळी मतदान न केल्याबद्दल पक्षातून बडतर्फ केले आहे.

आज (सोमवारी) होणार्‍या खास अधिवेशनावेळी सभापती रमेशकुमार यांच्याविरुध्द भाजप अविश्‍वास आणण्याची कुणकुण लागल्याने त्याआधीच रमेशकुमार यांनी १४ आमदारांच्या अपात्रतेची घोषणा केल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे. रमेशकुमार यांनी स्वत:हून पदाचा राजिनामा न दिल्यसास त्यांच्यावर अविश्‍वास ठराव भाजप मांडणार अशी चर्चा होती.

घटनेनुसार कारवाईचा
केला दावा
कॉंग्रेस व जेडीएस या पक्षांनी बंडखोर आमदारांविरुध्द दाखल केलेल्या याचिकांना अनुसरून आपण घटनेच्या कलम १९१ (२) खालील नियमांनुसार आमदारांवर कारवाई केल्याचे रमेश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. या सर्व बंडखोरांनी आमदारकीचे राजिनामे दिले होते व कुमारस्वामी यांच्यावरील विश्‍वासदर्शक ठरावावेळी ते अनुपस्थित राहिले होते.
बंडखोर आमदारांनी सभापतींसमोर उपस्थित राहण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र आपण ती मागणी फेटाळली असे कुमार यांनी सांगितले. याआधी आपण जेव्हा तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले त्यावेळी आपण स्पष्ट केले होते की पक्षांतर विरोधी कायद्याखाली आमदाराला एकदा अपात्र ठरविल्यानंतर त्या आमदाराला त्या विधानसभेची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढविता येत नाही.

आमदार म्हणून तातडीने अपात्र
रमेशकुमार यांनी काल अपात्र ठरवलेल्या सर्व आमदारांची नावे वाचून दाखवली. हे सर्वजण आमदार म्हणून तातडीने अपात्र ठरले असल्याचे त्यांनी जाहीर केले. आपण जबाबदारीपूर्वक हा निर्णय घेतला आहे. भावूक बनलेले रमेश कुमार म्हणाले, ‘या सर्व प्रकरणी निर्णय घेण्याबाबत माझ्यावर जो मानसिक दबाव आला आहे त्यामुळे मी नैराश्याच्या समुद्रात ढकलले गेल्यासारखे मला वाटत आहे’.

भाजपकडून टीका
सभापती रमेश कुमार यांच्या या निर्णयावर भाजपने कठोर टीका केली आहे. अयोग्य व कायद्यांचे उल्लंघन करणारा हा निर्णय असल्याचे भाजपने म्हटले आहे. एका पक्षाच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा भाजपने दावा केला आहे.

बंडखोर सुप्रीम कोर्टात
आव्हान देणार
या निवाड्याला बंडखोर आमदारांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याची माहिती भाजप नेते गोविंद कार्जोल यांनी दिली. सभापतींचा निर्णय हेतुपूर्वक व चुकीचा असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात आमदारांना न्याय मिळेल असा दावा त्यांनी केला. कॉंग्रेस, जेडीएसच्या त्या आमदारांनी स्वेच्छेने राजिनामे दिले होते व ते स्वीकारले जायला हवे होते असे ते म्हणाले.

कर्नाटक कॉंग्रेसकडून स्वागत
सभापतींच्या निर्णयाचे कर्नाटक कॉंग्रेसने स्वागत केले आहे. जनतेच्या न्यायालयातही या आमदारांना योग्य शिक्षा मिळेल. कॉंगे्रसच्या चिन्हावर निवडून येऊन मतदारांचा विश्‍वासघात करून हे आमदार भाजपशी हातमिळवी करू पाहत होते. त्यांना जनताही धडा शिकवील असे कॉंगे्रसने म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा विजय अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांनी व्यक्त केली.
जनादेशाला न जुमानता पैशांसाठी स्वत:ची विक्री करण्याच्या विकृत संस्कृतीवर या निर्णयामुळे जोरदार थप्पड बसली असून यापुढे तसे करण्यास कोणी धजावणार नाही असा विश्‍वास सिद्दरामैय्या यांनी व्यक्त केला. जेडीएसच्या नेत्यांनीही सभापतींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अविश्‍वासाबाबत आज
सभागृहात पाहूया : सभापती
आज विधानसभेत भाजपच्या संभाव्य अविश्‍वासाच्या रणनीतीविषयी रमेशकुमार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ तसा ठराव येऊ द्या. त्यानंतर माझी भूमिका तुम्हाला दिसेल. मी सभापतींच्या आसनावर राहून माझे काम करणार… पाहूया काय होतेय.’

अपात्र ठरलेले कर्नाटकचे
एकूण १७ आमदार
कॉंग्रेस आमदार : १) प्रताप गौडा पाटील, २) बी. सी. पाटील, ३) शिवराम हेब्बर, ४) एस. टी. सोमशेखर, ५) बायरती बसवेश्‍वर, ६) आनंद सिंग, ७) रोशन बेग, ८) मुनीरत्ना, ९) के. सुधाकर, १०) एम. टी. बी नागराज, ११) श्रीमंत पाटील
(रमेश जारकीहोली व महेश कुमथल्ली गुरुवारी अपात्र झाले होते)
जेडीएस आमदार : १) गोपालय्या,२) एच. विश्‍वनाथ, ३) शंकर, ४) नारायण गौडा.