कर्नाटकने जिंकला विजय हजारे करंडक

0
117

कर्नाटकने पावसाने बाधित विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तमिळनाडूचा ६० धावांनी पराभव करत झळाळत्या करंडकावर नाव कोरले. यष्टिरक्षक फलंदाज लोेकेश राहुलची शानदार फलंदाजी तसेच अभिमन्यू मिथुन याने आपल्या वाढदिनी केलेली भेदक गोलंदाजी कर्नाटकच्या विजयाची खासियत ठरली. राहुलने यष्टिमागे शानदार कामगिरी करताना तमिळनाडूच्या चार बळींमध्ये योगदान दिले. मिथुनने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये प्रथमच डावात पाच बळी घेतले. यात हॅट्‌ट्रिकचादेखील समावेश आहे. त्याने एम शाहरुख खान, एम मोहम्मद व मुरुगन अश्‍विन यांचा बळी घेत तमिळनाडूचा डाव ४९.५ षटकांत २५२ धावांत संपवला. तमिळनाडूकडून अभिनव मुकुंद (८५) व बाबा अपराजित (६६) यांनी चांगला खेळ दाखवला. विजय शंकर (३८) व शाहरुख (२७) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही.

गुरुवारी एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने राहुलला भारताच्या टी-ट्वेंटी संघात स्थान दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी राहुलने आपला फॉर्म दाखवून दिला. कर्नाटकने २३ षटकांत १ बाद १४६ धावा केल्या. राहुलने ७२ चेंडूंत नाबाद ५२ धावा करून आपले योगदान दिले. दुसरा सलामीवीर देवदत्त पडिकल (११) लवकर बाद झाल्यानंतर राहुलने मयंक अगरवालच्या साथीने दुसर्‍या गड्यासाठी ११२ धावांची अविभक्त भागीदारी रचली. पावसामुळे पुढे खेळ होऊ न शकल्याने कर्नाटकला व्हीजेडी पद्धतीचा वापर करून ६० धावांनी विजयी घोषित करण्यात आले. ही स्पर्धा जिंकण्याची कर्नाटकची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी २०१३-१४, २०१४-१५ व २०१७-१८ मध्ये ही स्पर्धा आपल्या नावे केली होती.