कर्नाटकचे आमदार सैल यांना अंतरीम जामीन

0
105

>> खाण घोटाळाप्रकरणी एसआयटीसमोर लावली उपस्थिती

येथील जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर कारवारचे अपक्ष आमदार संतीश (सतीश) सैल यांनी खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीसमोर काल उपस्थिती लावली. सैल यांनी येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन मंजूर केला.

एसआयटीने मुख्य खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी कारवारचे आमदार सैल यांना ९ एप्रिल रोजी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला होता. परंतु, आमदार सैल यांनी पूर्व नियोजित कामकाजामुळे चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले होते. त्यामुळे १३ एप्रिल रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी दुसरा समन्स बजावला होता.

आमदार सैल यांनी एसआयटीसमोर चौकशीसाठी उपस्थिती लावण्यापूर्वी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. राजकीय हेव्यादाव्यातून खाण प्रकरणात आपणाला गुंतविण्याचा प्रयत्न केला जात आहे. खाण प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी आहे असा युक्तिवाद सैल यांच्यावतीने करण्यात आला. एसआयटीने या जामीन अर्जावर बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतला. न्यायालयाने सैल यांना अंतरिम जामीन मंजूर करून दिलासा दिला. या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे.

राज्यातील २००७ ते २०१२ या काळातील कोट्यवधी रुपयांच्या प्रमुख खाण घोटाळा प्रकरणाच्या तपासात कारवारचे अपक्ष आमदार सैल यांचा सहभाग असल्याची माहिती परराज्यातील खनिज व्यावसायिकाकडून मिळाली आहे.
अपक्ष आमदार सैल हे मल्लिकार्जुन शिपिंग कंपनीचे संचालक आहेत. सीबीआयने कर्नाटक राज्यातील खाण घोटाळा प्रकरणात २०१२ मध्ये सैल यांना अटक करून जामिनावर सुटका केली आहे.