कर्करोगासंबंधी जागृत कसे व्हावे?

0
1621
  •  डॉ. स्वाती हे. अणवेकर (म्हापसा)

सध्या हा फॅमिली-डॉक्टर नावाचा प्रकार कालबाह्य झाला आणि त्याची जागा गूगल-डॉक्टरने घेतली आहे. तर आपल्याला आपल्या शरीरात काही लक्षणे दिसली की आपण ह्या गुगलवर शोधतोे आणि हा गूगल डॉक्टर जी लक्षणे दाखवेल ती वाचतो आणि एखादा भयंकर आजार आपल्याला झाला आहे हे समजून आधीच आपला धीर खचून जातो.

बर्‍याच जणांचे असे म्हणणे असते की कर्करोगाची अशी कोणतीच लक्षणे शरीरात दिसत नाहीत आणि एकदम त्याचे निदान कर्करोग असे शेवटी होते. पण प्रत्यक्षात जरी कर्करोग होण्यापूर्वी त्याची लक्षणे दिसली नाहीत तरी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात त्याचे निदान होण्यापूर्वी काही कुरबुरी सुरू असतात ज्यावर आपण फारसे लक्ष देत नाही. तर ह्या लेखात आपण त्याची सविस्तर माहिती पाहूयात.
सरसकट लक्षणांमध्ये मध्ये रात्री ताप येणे, वजन कमी होणे, झोप न लागणे, भूक कमी होणे, पोटात दुखणे, अशक्तपण वाटणे, हात पाय दुखणे, हातापायात वात येणे, वारंवार सर्दीखोकला होणे, परत परत अम्लपित्त होणे, जुलाब होणे, उलट्या येणे, डोके भयंकर दुखणे अशी लक्षणे बर्‍याच व्यक्तींमध्ये कर्करोगाचे निदान होण्याआधी बरीच वर्षे सुरू असतात, ज्यावर आपण फार लक्ष देत नाही.

आता प्रत्येक अवयवाचा कर्करोग आणि त्याचे निदान होण्यापूर्वी शरीर कोणकोणत्या कुरबुरी सुरू करते ते आपण पाहूयात :
१) मेंदूचा कर्करोग :
दृष्टीमध्ये फरक होणे, डोकेदुखी, वारंवार चक्कर येणे, फीट येणे, गोष्टी विसरणे, बोलताना शब्द उच्चारात फरक होणे, चालण्याची पद्धत बदलून तोल गेल्यासारखे वाटणे इ.
२) तोंडाचा कर्करोग :
तोंडात सारखे उष्णतेचे फोड येणे, काही खाल्ले तरी जास्त तिखट लागणे, जळजळ होणे, तोंडाची आतील त्वचा जाडसर वाटणे, तोंडात वारंवार जखमा होणे, जीभ दुखणे, शब्दोच्चार स्पष्ट नसणे, एखाद्या पदार्थाची चव आहे त्यापेक्षा वेगळी लागणे, तोंड सुकून येणे इ.
३) घशाचा कर्करोग :
आवाज बसणे, स्वर बदलणे, घसा सारखा कोरडा पडणे, घशात काही अडकल्याप्रमाणे वाटणे, गिळताना त्रास होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, घसा वारंवार दुखणे किंवा परत परत घशाला संसर्ग होणे इ.
४) फुफ्फुसाचा कर्करोग :
छातीमध्ये वेदना होणे, थुंकीमधून रक्त पडणे, श्वास घेताना त्रास होणे, काही काम केल्यावर धाप लागणे, खोकला येणे, वारंवार सर्दी होणे, इ.
५) यकृत व आमाशय ह्यांचा कर्करोग :
वारंवार सरी होणे, सतत अपचन होणे, पोट गच्च होणे, खाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी होणे, वजन कमी होणे, उलट्या होणे, अम्लपित्त होणे इ.
६) प्लीहा कर्करोग :
रक्तातील पेशी प्रमाणापेक्षा जास्त वाढणे, हिमोग्लोबिन कमी होणे, वारंवार संसर्ग होणे, अशक्तपणा वाटणे इ.
७) अग्न्याशयाचा कर्करोग :
रक्तातील साखर पुष्कळ वाढणे, अथवा झपाट्याने कमी होणे, वजन भराभर कमी होणे, लघवीचे प्रमाण वाढणे, सतत भूक लागणे, अपचन होणे इ.
८) आतड्याचा कर्करोग :
परत परत संडासला होणे किंवा मलबद्धता होणे, संडासच्या सवयीमध्ये बदल होणे, संडास आटपायला वेळ लागणे, संडासमधून रक्त पडणे, आव पडणे इ.
९) वृक्क अथवा मूत्राशयाचा कर्करोग :
लघवीचा संसर्ग वारंवार होणे, लघवी धरून ठेवण्याची क्षमता कमी होणे, लघवीमधून क्वचित रक्त पडणे, लघवी करताना वेदना होणे, लघवीच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा वाढ होणे अथवा लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवीचा रंग बदलणे इ.
१०) गर्भाशय कर्करोग :
अंगावर पांढरे जाणे, पाळी कमी अंतराने येणे, मासिक स्राव नेहमीपेक्षा जास्त होणे, ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे, शरीरात रक्ताची कमतरता होणे, अशक्तपणा वाटणे इ.
११) ओव्हरीचा कर्करोग :
वारंवार लघवीचा संसर्ग होणे, ओटीपोटात जड वाटणे, पाठ, कंबर दुखणे, पायामध्ये गोळे येणे, थकवा जाणवणे इ.
१२) रक्ताचा कर्करोग :
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, वारंवार आजारी पडणे, नकळत कुठल्याही भागातून रक्तस्राव होणे, वारंवार रक्तातील पांढर्‍या पेशी वाढलेल्या मिळणे, शरीरात रक्ताची कमतरता होणे, अशक्तपणा वाढणे इ.
१३) अस्थिमज्जा कर्करोग :
दातांच्या किरकोळ तक्रारी वारंवार होणे- जसे दात दुखणे, हिरड्यात पू होणे, दात किडणे, हिरड्यातून रक्तस्राव होणे, हाडांमध्ये वेदना होणे, वारंवार ताप येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, वजन कमी होत जाणे, अशक्तपणा जाणवणे इ.
१४) त्वचा कर्करोग :
अचानक त्वचेचा वर्ण बदलणे, विचित्र दिसणारे तीळ शरीरावर दिसणे, त्वचेवर वारंवार ऍलर्जी उत्पन्न होणे, त्वचेला अचानक ऊन सहन न होणे इ.
१५) स्तनाचा कर्करोग :
छातीमध्ये वेदना होणे, निप्पल अथवा स्तनाच्या आकारात फरक होणे, तसेच स्तनाचा रंग बदलणे, छोटीशी गाठ काखेत अथवा स्तनात लागणे, स्तनामध्ये कारण नसताना वेदना होणे, स्तनामध्ये पू होत राहणे, निप्पल मधून स्राव येणे इ.
१६) पौरुष ग्रंथीचा कर्करोग :
वारंवार लघवीचा संसर्ग होणे, सारखी लघवी झाल्यासारखे वाटणे, संभोगाच्या वेळी लगेच शुक्र स्खलन होणे, शिश्न व स्क्रोटममध्ये वेदना होणे, त्या भागात वारंवार सूज येणे इ.
ह्या लक्षणांपैकी जर एखादे लक्षण आपल्याला वारंवार होत असेल आणि योग्य उपचार घेऊनदेखील ते आटोक्यात येत नसतील अथवा बरे होत नसेल तर आपण आपल्या डॉक्टरांना तसे सांगावे. पण परत परत डॉक्टर बदलत राहू नये. त्याने पुढील उपचारात उशीर होऊ शकतो व तब्येत जास्त बिघडू शकते. तसेच काही काही रुग्णांमध्ये असे देखील पाहायला मिळते की त्यांना कर्करोगाचे निदान एका अवयवाचे होते पण कर्करोग पूर्वलक्षणे मात्र दुसर्‍याच अवयवाची दिसू लागतात. जसे काही रुग्णांना गुदभागी गाठ सापडते व संडासमधून रक्त पडते पण कर्करोग मात्र फुफ्फुसाचा होतो. असेदेखील होऊ शकते. त्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराची एकंदरीत रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि त्या लक्षणांवर अथवा व्याधीवर नीट उपचार केले जात नाहीत. हल्ली अर्वाचीन वैद्यक शास्त्रात विशेषज्ज्ञांची सेवा सुरू झाली आहे. तसेच बरेच अन्य डॉक्टरसुद्धा रुग्णाला झटपट बरे वाटावे म्हणून अगदी महागडी औषधे- ज्यात उच्च प्रतीची अँटीबायोटिक्स तसेच स्टिरॉइड्‌स अशी अथवा अँटी इन्फ्लेमेटरी औषधे जसे वेदनाशामक गोळ्या वगैरे ह्यांचा भरमसाठ मारा रुग्णाच्या शरीरावर केला जातो. ह्यात झालेले दुखणे पूर्ण बरे तर होत नाहीच पण ते काही काळ शरीरात सुप्त अवस्थेत राहते आणि अचानक काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी पुन्हा उद्भवते. असे आणि पुन्हा अशा वर सांगितलेल्याच औषधांचा मारा जर शरीरावर केला गेला तर शरीराच्या पेशी पुढे बंड पुकारतात. कारण आता त्यांची असे धक्के सहन करायची शक्ती संपलेली असते आणि पुढे शरीरात ह्या पेशी विकृत स्वरूपात वाढून कर्करोगाची उत्पत्ती करू शकतात. म्हणूनच आपण प्रत्येकाने डॉक्टरकडे जाताना आपल्यावर केल्या जाणार्‍या उपचारांची, औषधांची नीट माहिती त्यांच्याकडून करून घ्यावी.

पूर्वी फॅमिली-डॉक्टर नावाचा प्रकार अस्तित्वात होता ज्यात एका कुटुंबाचा एक डॉक्टर असायचा जो त्या कुटुंबाचा डॉक्टर तसेच मित्र आणि मार्गदर्शकदेखील असायचा. त्याला त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नाव, वय, स्वभाव तसेच त्याच्या आरोग्याची इत्थंभूत माहिती असायची. त्यामुळे व्हायचे असे की कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत नेहमीपेक्षा वेगळी वाटली अथवा जरा वेगळ्या प्रकारे बिघडलेली वाटली की ते ह्या फॅमिली डॉक्टरच्या लगेच लक्षात यायचे आणि त्यावर त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळायचे.
सध्या हा फॅमिली-डॉक्टर नावाचा प्रकार कालबाह्य झाला आणि त्याची जागा गूगल-डॉक्टरने घेतली आहे. तर आपल्याला आपल्या शरीरात काही लक्षणे दिसली की आपण ह्या गुगलवर शोधतोे आणि हा गूगल डॉक्टर जी लक्षणे दाखवेल ती वाचतो आणि एखादा भयंकर आजार आपल्याला झाला आहे हे समजून आधीच आपला धीर खचून जातो. तर गुगल डॉक्टर हा फक्त तुम्हाला लक्षणे दाखवतो पण तुमचा फॅमिली डॉक्टर मात्र तुम्हाला प्रत्यक्ष तपासतो, तुमची लक्षणे पाहतो, आवश्यक त्या चाचण्या करून घेतो आणि तुमची लक्षणे आणि चाचण्या ह्यांची सांगड घालून तुम्हाला तुमच्या आजाराचे निदान तो सांगतो. गरज वाटल्यास तो तुम्हाला विशेषज्ज्ञ डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देखील देतो.

त्यामुळे आपल्या प्रत्येकाने आपल्या गावातील अथवा शहरातील असा एखादा चांगला डॉक्टर निवडावा जो तुमच्या फॅमिली-डॉक्टरची जागा घेऊ शकेल आणि तुम्हाला काही त्रास झाला की तुम्ही त्याच्याकडे जाऊन त्याचा सल्ला घेऊन पुढील पावले उचलू शकाल. असे केल्याने तुमच्या एखाद्या मोठ्या आजाराचे निदानसुद्धा योग्य वेळेत होऊन तुम्ही त्यातून उपचार घेऊन लवकर बरे होऊ शकता. म्हणून एकाच डॉक्टरवर विश्वास ठेवा आणि आपल्या तब्येतीची व आरोग्याची धुरा त्याच्या खांद्यावर सोपवा व निश्चिंत व्हा. प्रत्येक वेळी डॉक्टर बदलत राहणे हे आपल्या तब्येतीच्या दृष्टीने हानिकारक आहे. कारण प्रत्येक नवीन डॉक्टरला तुमच्या तब्येतीचा पूर्ण इतिहास माहीत नसतो जो तुमच्या फॅमिली डॉक्टरला माहीत असतो. त्यामुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुन्हा अस्तित्वात येणे ही आता काळाची गरज झालेली आहे, तसे झाल्यास लोकांच्या आरोग्याची योग्य काळजी पुन्हा राखली जाऊन त्यांना योग्य सल्ला मिळू शकेल ह्यात शंका नाही.