करिअर मार्गदर्शन शिक्षणावर पुढील वर्षापासून भर ः मुख्यमंत्री

0
126
????????????????????????????????????

राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणली जाणार आहे. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाबरोबरच करिअर मार्गदर्शन शिक्षणावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे काल केले.

शिक्षण खात्याने आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात सावंत बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव नीला मोहनन, शिक्षण संचालिका वंदना राव उपस्थित होते.
शिक्षकांनी मुलांचे भविष्य घडविण्याचे कार्य केले पाहिजे. दहावी, बारावी किंवा पदवीचे शिक्षण घेतलेली मुले आपल्या करिअरबाबत योग्य निर्णय घेऊन शकत नाहीत. त्यामुळे शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

शिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

शिक्षक पुरस्कारासाठी
वशिलेबाजी नको
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही. वशिलेबाजीतून आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार नाही. या पुरस्कारासाठी निकष निश्‍चित करण्यात आलेले आहेत. या निकषाच्या आधारे शिक्षकांना पुरस्कार दिला जातो. राज्यातील काही शिक्षक इतर व्यवसाय करीत असतात. अशा शिक्षकांचा आपल्या विद्यादानाकडे जास्त लक्ष नसते, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
प्रकाश नारायण गावकर (शिक्षक – सरकारी प्राथमिक विद्यालय – भुईपाल सत्तरी), सुरेखा दामोदर पागी (शिक्षिका – सरकारी प्राथमिक विद्यालय कट्टा आमोणा केपे), शिवदास वामन कवठणकर (साहाय्यक शिक्षक – सरकारी विद्यालय शिरोडवाडी मुळगाव डिचोली), मिना डायस (खास शिक्षिका – सेंट झेवियर अकादमी ओल्ड गोवा), विजयकुमार कोर्पे देसाई (साहाय्यक शिक्षक – पॉप जॉन हायस्कूल केपे), सुदन फटी नाईक गावकर (मुख्याध्यापक – सरकारी विद्यालय आगरवाडा पेडणे), नीळू जल्मी (मुख्याध्यापक – सुरश्री केरसबाई केरकर विद्यालय केरी – फोंडा) यांचा शिक्षक पुरस्कार देऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

‘सायबर एज’मध्ये सुधारणा
सरकारने सायबर एज योजनेमध्ये सुधारणा केली असून योजनेखाली पहिल्यांदा सरकारी विद्यालयांना अद्ययावत संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.