करमळीत कचरा टाकल्याने ग्रामस्थांचा पणजी महापौर मडकईकरांना घेराव

0
138

>> पोलीस तक्रारीनंतर चार कचरावाहू
ट्रक ताब्यात

पणजी महापालिकेच्या पाटो येथील कचरा प्रकल्पाला आग लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी रात्रौ महापालिकेने करमळी येथे ट्रक भरून कचरा टाकणे सुरू केल्याने करमळी येथील ग्रामस्थांनी महापौर उदय मडकईकर यांना घेराव घालून जेरीस आणले. याप्रकरणी करमळी पंचायत तसेच करमळी येथील ग्रामस्थ यांनी पणजी महापालिकेविरुद्ध जुने गोवे पोलिसात दोन वेगवेगळ्या तक्रारी नोंदवल्या असल्याची माहिती करमळीचे सरपंच उत्तम मुरगावकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
पणजी महापालिकेने करमळी येथे कचरा नेऊन टाकण्यासाठी वापरलेले सहा ट्रक आमच्या तक्रारीनंतर ताब्यात घेतले असल्याचे यावेळी सरपंच मुरगावकर व करमळी येथील एक ग्रामस्थ डॉ. अरविंद कुमार सरेन यांनी सांगितले.

कचरावाहू चार ट्रक
पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी जीए ०३ टी ५१६३, जीए ०९ यू ३१८०, जीए ०३ एफ ६१४६, जीए ०४ टी १८६१, जीए ०३ टी ८२६७ हे ट्रक ताब्यात घेतले असून महापालिकेने हे कचरा वाहून नेण्यासाठी भाडेपट्टीवर घेतलेले ट्रक असल्याचे सरपंच मुरगावकर यांनी सांगितले.

महापालिकेकडून बर्‍याच
काळापासून करमळीत कचरा
पणजी महापालिका बर्‍याच काळापासून करमळी येथे कचरा टाकत आहे. रात्रीच्या वेळी हा कचरा टाकण्यात येत असून तो पणजी महापालिका टाकत असल्याचे सोमवारी आम्हाला दिसून आल्याचे ते म्हणाले. सोमवारी करमळी येथे हा कचरा टाकण्यात येत असताना महापौर उदय मडकईकर हे तेथे होते. यावेळी लोकांनी त्यांना घेराव घालून जाब विचारल्याचे मुरगावकर यांनी सांगितले.

करमळी परिसरात दुर्गंधी
करमळी येथे कचरा टाकण्यात येत असल्याने करमळी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा टाकणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी भारतीय दंडसंहितेत शिक्षेचीही तरतूद असल्याचे डॉ. सरेन यांनी सांगितले. या कचर्‍यामुळे करमळी परिसरात दुर्गंधी बरोबरच रोगराईही पसरण्याची भीती असल्याचे ते म्हणाले. महापालिकेने करमळी येथे टाकलेला कचरा न हलवल्यास ग्रामस्थ स्वस्थ बसणार नसल्याची ताकीदही त्यांनी दिली.
आम्ही तक्रार केल्यानंतर महापौर जुने गोवे पोलीस स्थानकावर आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. महापौरानी कचरा टाकल्याची कबुलीही दिली असल्याचे ते म्हणाले.