कनेरिया म्हणतोय ‘मी टू’

0
120

कनेरियापासून प्रेरणा घेत भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपण केलेली अक्षम्य चूक जगासमोर मान्य करून त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी दाखवतील का हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे.
—————————
—————————

शात सध्या ‘मी टू’ नावाच्या वादळाने थैमान घातले आहे. अनेकांनी आपल्या भूतकाळातील अत्याचाराला वाचा फोडताना विविध क्षेत्रांतील बड्याबड्या धेंडांना उघडे पाडले आहे. क्रिकेटचे क्षेत्रदेखील याला अपवाद नाही. पाकिस्तानचा सर्वांत यशस्वी कसोटी फिरकीपटू दानिश कनेरियादेखील याला अपवाद नाही. विशेष म्हणजे याबाबतीत कनेरिया हा पीडित नसून स्वतः गुन्हेगार आहे. स्वतः निर्दोष असल्याचे सहा वर्षे सातत्याने छातीठोकपणे सांगणार्‍या कनेरियाने ‘मी टू’ म्हणून फिक्सिंगमध्ये सहभाग घेतल्याचे नुकतेच मान्य केले. फिक्सिंग प्रकरणानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द शिखरावर असताना संपली होती. दीर्घ कालावधीनंतर कनेरियाने स्वतःचा गुन्हा कबूल करण्याचे दाखवलेले धाडस अचंबित करणारे असेच आहे. त्याच्या या कृतीमुळे त्याला पाठिंबा दिलेले अनेकजण तोंडघशी पडले असून अनेकांना त्याचे ‘देर से आये, पर दुरुस्त आये’ म्हणत कौतुक केले आहे. क्रीडाक्षेत्रातील अनेकांनी अजून हे धाडस करण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही. कनेरियापासून प्रेरणा घेत भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपण केलेली अक्षम्य चूक जगासमोर मान्य करून त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी दाखवतील का हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे.
कौंटी क्रिकेटमध्ये इसेक्सचा आपला माजी संघसाथी मर्विन वेस्टफिल्ड याची कनेरियाने भारतीय बुकी अनू भट याच्याशी ओळख करून दिली होती. यानंतर कनेरियाने वेस्टफिल्डला कामगिरी खालवण्यासाठी भट याच्याकडून पैसेदेखील मिळवून दिले होते. २००९ साली डरहॅमविरुद्धच्या ४० षटकांच्या सामन्यात वेस्टफिल्डला आपल्या पहिल्या षटकांत १२ पेक्षा जास्त धावा देण्याचे बुकीतर्फे सांगण्यात आले होते. वेस्टफिल्डने या षटकात केवळ १० धावा दिल्या. परंतु, ६ हजार पाऊंड्‌स मात्र बुकीकडून घेतले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वेस्टफिल्ड याला साऊथ ईस्ट लंडनच्या जेलमध्ये दोन महिने काढावे लागले होते तर ईसीबीने त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. प्रकरणाची चौकशी केलेल्या ईसीबीच्या विशेष पथकाने त्यावेळी कनेरिया क्रिकेटसाठी मोठा धोका असल्याचे आपल्या अहवालात नमूद केले होते.
२००८ साली ईसीबीने भट याचे नाव संशयास्पद व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केले होते. याची कल्पना मंडळातर्फे सर्व खेळाडूंना करून देण्यात आली होती. यानंतरही कनेरियाने याकडे दुर्लक्ष करून फिक्सिंगप्रकरणान वेस्टफिल्डला ओढले. त्यावेळी केवळ २१ वर्षांचा असलेल्या वेस्टफिल्ड याची कारकीर्द संपवण्यात कनेरियाने योगदान दिले. २०१० साली ट्रेंटब्रिज येथे कनेरिया शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ईसीबीच्या बंदीचे कठोर पालन करण्याचे सर्व क्रिकेट मंडळाने ठरविल्यानंतर मार्च २०१२ पासून त्याला एकही प्रथमश्रेणी सामना खेळता आलेला नाही. आपला गुन्हा कबूल केल्यानंतर त्याने आपल्यावरील बंदी उठवण्याची मागणी केली आहे. क्रिकेटची सेवा करण्याची अजून एक संधी द्यावी अशी याचनादेखील त्याने केली. वडिलांच्या आजारपणामुळे गुन्हा मान्य करण्यास वेळ लागल्याचे त्याने जाहीरपणे सांगितले. वडिलांच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद नसल्यामुळे वडिलांच्या निधनानंतर खूप विचार करून जगाला सत्य सांगत असल्याचे त्याने ‘अल जझीरा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. फिक्सिंग प्रकरणात भारत व पाकिस्तानी खेळाडूंची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेचा समावेश होतो. पैशांच्या हव्यासापोटी क्रिकेटची प्रतिमा डागाळतानाच देशाचे नावदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण खराब तर करत नाही ना याचा विचार प्रत्येक खेळाडूने करायला हवा.