कदंबला सातवा वेतन आयोग लागू करण्यास सरकारने सहकार्य करावे

0
106

पणजी (प्रतिनिधी)
सरकारने कदंब महामंडळाच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तसेच मडगाव, म्हापसा, वास्को येथील बसस्थानकांची कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी कदंबाच्या ३८ व्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना येथे काल केले.
या कार्यक्रमाला वाहतूक सचिव एस. पी. सिंग (आयएएस), महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक परेरा नेटो, संचालक मंडळाचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
कदंब वाहतूक महामंडळातर्फे कॅशलेस पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. कदंब पासधारकांना रेडिओ फ्रिक्वेंसी ओळखपत्रे दिली जाणार असून स्वाइप मशीनच्या माध्यमातून तिकीट वितरण केले जाणार आहे. सध्याच्या कागदी पद्धतीच्या कदंब पास पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. तसेच पास न घेतलेल्या प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी एटीएमचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती कदंबाच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.
महामंडळाकडून प्रीपेड ट्रॅव्हल्स कार्ड लॉन्चिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ट्रॅव्हल्स कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या कार्डाचा कदंबाच्या बसगाड्यांमध्ये वापर केला जाऊ शकतो.
मोबाईल ऍप्लीकेशनच्या माध्यमातून कदंबाच्या बसगाड्या व इतर माहिती दिली जाणार आहे. त्यात जवळचा बसस्टॉप, बसगाड्यांची माहिती, बसगाड्यांची वेळ तसेच वॉट्‌सऍप आणि एसएमएसच्या माध्यमातून प्रवास तपशिलाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. आजारी कर्मचार्‍यांसाठी व्हीआरएस योजना कार्यान्वित केली जाणार आहे. इतर कर्मचारीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. डेपो व्यवस्थापन प्रणाली लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.