कंबरदुखी 

0
241
–   वैद्य सुरज सदाशिव पाटलेकर
श्री व्यंकटेश आयुर्वेद, मडगांव
एकाच जागी तासन्‌तास बसून काम करणे शक्यतो टाळावे… विशेषतः जे ऑफिसमध्ये वातानुकुलीत कक्षामध्ये बसून काम करतात; विश्राम न करता! एखाद्यावेळेस जर विचित्र स्थितीमध्ये झोपावे लागले, नेहमीप्रमाणे मऊ व आरामदायी बिछाना न मिळाल्यामुळे, जमिनीवर झोपावे लागल्याने, इतर कारणांमुळे ही पाठ आणि कंबर दुखू शकते.
 कंबरदुखीलाच आयुर्वेदामध्ये ‘कटीशूल’ असेही म्हणतात व त्याची कारणेही भरपूर आहेत. खूप वेळ एकाच जागी बसल्यामुळेही कंबर दुखू शकते किंवा कंबर जखडल्यामुळे कुठलीही हालचाल करण्यास त्रास होणे… यांसारख्या तक्रारी असू शकतात. हे कंबरेचे दुखणे नंतर पाठीचे दुखणे बनून अजूनही जास्त त्रास देऊ व वाढवू शकते. म्हणूनच एकाच जागी तासन्‌तास बसून काम करणे शक्यतो टाळावे… विशेषतः जे ऑफिसमध्ये काम करतात व तेदेखील वातानुकुलीत कक्षामध्ये बसून; विश्राम न करता! तसेच कुठलीही गाडी सतत चालवणार्‍या माणसांना, लांब पल्ल्याच्या मार्गावरून मोठ्या गाड्या चालविणे जसे कि ट्रक, पर्यटक वाहन विशेषकरुन ज्या एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवास करतात व खडबडीत रस्त्यांवरून (गावातले रस्तेसुद्धा यात येतात) भरधाव वेगाने गाड्या चालवणार्‍या चालकानां हे त्रास नेहमीच होत असतात. व वेळेत काळजी जर घेतली नाही तर हे दुखणे जुनाट होऊन भयंकर त्रासांना जन्म देते. मणके सटकू शकतात. दोन मणक्यांमधील झीज अतिप्रमाणात होऊन असह्य वेदना होऊ शकतात. अश्या वेळेस काही काळासाठी ते काम थांबवून त्या जागेवरुन उठावे आणि शरीराची थोडी हालचाल करून त्यानंतर पुनः ते काम करावे.
आता हे फक्त बसून काम करणार्‍या व्यक्तींपुरतेच मर्यादित नसून सतत उभे राहणार्‍या व्यक्तींनासुद्धा लागू होते… जसे कि बस कण्डक्टर, सेल्समेन, डोक्यावर विकायच्या वस्तूंचा भार घेऊन दारोदारी जाऊन फिरणार्‍याना, अगदी भाजीवालेसुद्धा व इतर. जास्त भाराचे वजन उचलल्यामुळेपण कंबर दुखू शकते. ह्यात कन्स्ट्रक्शन साईटवरचे कामगारसुद्धा आले व व्यायामशाळेत बॉडीबिल्डिंग व वेटलिफ्टींगचे डोक्यावर नसते भूत असणारे. एथ्लीट्स व इतर खेळाडुसुद्धा ह्याच लिस्टमध्ये आले जे फिटनेसच्या नावावर विश्राम न करता, काळजी न घेता मर्यादेपेक्षा जास्त सराव व व्यायाम करतात. एवढेच नव्हे तर सर्वात महत्वाचे म्हणजे गृहिणीना हा त्रास होतच असतो कारण घर व परिवार यांना सांभाळण्यासाठी सतत उठबस करता करता त्यांचा पूर्ण दिवस घरची कामे करण्यातच निघून जातो व आराम तर भेटतच नाही. एखाद्यावेळेस जर विचित्र स्थितीमध्ये झोपावे लागले, नेहमीप्रमाणे मऊ व आरामदायी बिछाना न मिळाल्यामुळे (छोट्या जागेत झोपल्यामुळे, रेल्वे-बसच्या प्रवासात शक्यतो हे त्रास होतात जेव्हा आपण सिटिंग/सेमी स्लिपरमध्ये रात्रीचा प्रवास करतो विशेषतः ज्यांना असल्या प्रवासाची सवय नसते त्यांना), जमिनीवर झोपावे लागल्याने इतर कारणांमुळे ही पाठ आणि कंबर दुखू शकते.
ज्यांची प्रकृती वाताची आहे किंवा वाताचा त्रास असेल म्हणजेच सांधे (घोटा, गुडघा, कंबर, पाठ, मान, खांदा, कोपर, मनगट यांसारखे इतर सांधे) दुखणे, कुठचेही कार्य करण्यात असमर्थता व कष्ट होणे, हातापायात मुंग्या येणे यांसारख्या तक्रारी असतील तर आहाराच्या (खाणे, पिणे) व विहाराच्या (कार्य करणे जसे कि प्रवास, पोहणे इतर) दृष्टीने आपल्या शरीराला काय पथ्य (हितकर) व अपथ्य (अहितकर) आहे हे कळले पाहिजे. औषधी चिकित्सा नंतर. अगोदर आपण जे दिनचर्येत (दिवसभरात जे काही उपक्रम होतात, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्वच) करतो त्यावरच आपल्या रोगांची स्थिती अवलंबून असते. म्हणजेच एखादा आजार होणे किंवा न होणे.
ह्या सर्व तक्रारींसाठी मग आपण पेनकिलर्स/वेदनाशामक घेतो.. कोणत्याही वैद्याच्या सल्ल्याशिवाय. थोड्या तासांपुरता त्रास कमी होईलही, पण त्या गोळ्यांचा परिणाम संपल्यावर परत काय? आपण अशीच वेदनाशामक औषधे मग घेतच राहतो. काय उपयोग त्यांचा? त्यांच्या अतिसेवनामुळे भलतेच त्रास चालू होतात. त्यापेक्षा ज्या गोष्टींमुळे हा त्रास होतोय, त्या कमी किंवा बंद करणे महत्वाचे असे नाही का वाटत? शिवाय आहार व विहारसुद्धा व्यवस्थित असले पाहिजेत. शरीरात वातदोष वाढवणारे पदार्थ खाणे, त्या गोष्टींच्या/पदार्थांच्या संपर्कात राहणे, शक्यतो टाळावे किंवा कमी करावेत. चिकित्सेच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास आयुर्वेदीय औषधांचा लाभ होतोच पण तीसुद्धा व्याधीचे व्यवस्थित निदान करूनच. एकच औषध सगळ्याच प्रकारच्या व्याधींमध्ये उपयोगी होईलच असे नसते. व्याधीच्या अवस्थेनुसार औषधे व चिकित्साही बदलतात. पंचकर्म उपचारांचा विशिष्ठ लाभ होतो. बस्ति चिकित्सा तर ह्या तक्रारींवर सर्वोत्तम. शिवाय स्नेहन (शरीराला किंवा शरीराच्या एखाद्या विशिष्ठ अंगाना तैल लावणे)- स्वेदन (वाफ देणे), कटी बस्ति सारख्या इतर पंचकर्मांचा ही उत्तम फायदा होतो. काही योगासने ह्या दुखण्यांसाठी फायदेशीर ठरतात. फिजिओथेरेपीची पण गरज लागु शकते.
* वात प्रकृतीच्या लोकांनी आहारात तेल किंवा तूप वापरावे ते सुद्धा कच्चा स्वरूपातच. तळून वा परतून नव्हे. पोळी, भाकरी, दुध, साखर, गूळ, ताक, लिंबू, चिंच, सुकामेवा, सरबते, नारळाचे पाणी, मुरंबा, मिठाई, खवा, मटन, अंडी ह्यांचा आहारात उपयोग करावा. गरम/कोमट करूनच खावे व प्यावे.
* वाटाणे, बटाटा, बेसन, मिरच्या, मसाल्याचे (तिखट, कडू पदार्थ), चटण्या, कोरडे पदार्थ हे अतिप्रमाणात खाणे टाळावेत. थंड पदार्थ, गार जेवण, शीतपेये, अवेळी जेवण, उपाशी राहणे, भुकेपेक्षा कमी खाणे हे करू नये.
* विहारात व्यायाम करावा पण तोही झेपेल तेवढाच. कानात, नाकात, डोक्यावर किंचित कोमट तेल लावणे, अंगाला- तळपायाला तेल लावणे(अभ्यंग), गरम पाण्याने आंघोळ करणे इतर.
* अति श्रम करू नये, गार वारा (Aएसी, पंखा, प्रवासामध्ये), गार पाणी यांचा अतिवापर टाळावा. रात्रीचे जागरण, खूप चालणे व धावणे, दगदग करणे, प्राण्यांच्या वर बसून प्रवास हे शक्यतो टाळावे किंवा कमीच करावे.
ह्याचा अर्थ असा नव्हे कि वाताचा त्रास फक्त वात प्रकृतीच्या व्यक्तींनाच होतो. इतरही प्रकृतींच्या (पित्त, कफ सारख्या) व्यक्तींना वाताचे त्रास होतात. म्हणूनच काळजी घेणे उत्तम. उपरोल्लेखित पथ्यापथ्य फक्त आपल्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी आहे, कारण वाताचे भरपूर प्रकार आहेत आणि प्रत्येकाची औषधी चिकित्सा ही निरनिराळी, जी वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी.
म्हणूनच वैद्यांकडूनच तपासणी करून योग्य वेळेस योग्य उपचार घ्यावा. इंटरनेट वरून स्वतःच्या त्रासांचे निदान करणे थांबवावे. तिथे सगळ्याच गोष्टी सापडू शकत नाहीत.