कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस

0
149

वाहतूक खात्याने राज्यातील वाहनांवरील उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (एचएसआरपी) बसविण्याबाबत गोंधळाच्या तक्रारीमुळे कंत्राटदार मेसर्स रियल मॅझोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राज्यात वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्‌स बसविण्याचे गेली कित्येक वर्षे रखडलेले काम अखेर ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आले. नवीन वाहन नोंदणी प्लेट्‌स बसविण्याचे काम रियल मॅझोन इंडिया कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या नवीन प्लेट्‌स बसविण्याच्या कामाबाबत अनेक जणांकडून तक्रारी केल्या जात आहेत.

या कंपनीकडून योग्य सेवा मिळत नसल्याच्या जास्त तक्रारी आहेत. यामुळे वाहन चालकांना नवीन उच्च सुरक्षित वाहन क्रमांक पट्टी बसविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मडगाव येथील सेवेबाबत तक्रार केलेली आहे. राज्यभरात उच्च सुरक्षा पट्टी बसविण्याबाबत गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. कंत्राटदाराकडून योग्य सेवा दिली जात नसल्याने वाहतूक खात्यालासुध्दा नवीन क्रमांक प्लेट्‌स बसविण्याच्या नियोजित आराखड्यात दुरुस्ती करावी लागलेली आहे. वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. येत्या ५ नोव्हेंबरला कंपनीच्या प्रतिनिधीला सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.