औद्योगिक प्रदर्शने व परिषदा

0
230

– शशांक मो. गुळगुळे
विक्री व खरेदीचे ठिकाण म्हणजे बाजारपेठ! अगदी पूर्वी गावात किंवा शहरांत एका विशिष्ट जागी व विशिष्ट दिवशी बाजार भरत असे व या बाजारात प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री चाले. त्याकाळी खरेदीसाठी पैसे लागत, पण जर पैसे नसतील तर ‘बार्टर’ पद्धती चालत असे. यात वस्तूंची अदलाबदल होत असे. पुण्यात वारांवरून पेठांची नावे पडलेली आहेत- सोमवार पेठ, मंगळवार पेठ वगैरे वगैरे. तर पूर्वीच्या काळी त्या-त्या दिवशी त्या-त्या विभागात बाजार भरत असे म्हणून त्या पेठांना वारांवरून नावे पडली आहेत.त्यानंतर बंदिस्त मार्केट्‌स आली, फेरीवाले आले, मॉल आले. खरेदी-विक्री या संकल्पनेतूनच औद्योगिक प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. ही प्रदर्शने उद्योगनिहाय आयोजित केली जातात. या प्रदर्शनांत करोडो रुपयांचे व्यवहार होतात. ही प्रदर्शने आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असतात. यात कंपन्या आपल्या उत्पादनांचे स्टॉल मांडतात. या स्टॉलचे भाडे लाखो रुपये असते. बहुतेक प्रगत देशांतील कंपन्या येथे स्टॉल भाड्याने घेऊन त्यात आपली उत्पादने/सेवा प्रदर्शित करतात. जागतिक पातळीवर अशी औद्योगिक प्रदर्शने आयोजित करण्यात जर्मनीचा पहिला क्रमांक लागतो. भारतात ही प्रदर्शने मुख्यतः दिल्ली, मुंबई व बेंगळुरू येथे आयोजित केली जातात. दिल्लीचे प्रगतिमैदान तर यासाठीच आहे. येथे वर्षभर कसले ना कसले तरी प्रदर्शन आयोजित केलेले असते. मुंबईत गोरेगाव (पूर्व) येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, वरळी येथील नेहरू सेंटर येथेही प्रदर्शने आयोजित केली जातात. बेंगळुरू येथे प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञान उद्योगाशी संबंधित प्रदर्शने आयोजित केली जातात. परदेशी कंपन्यांना या प्रदर्शनात मांडण्यात येणारी उत्पादने आणण्यासाठी शासनातर्फे सीमाशुल्कात सवलतही देण्यात येते.
ही प्रदर्शने आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असल्यामुळे खरेदीदारांना एकाच ठिकाणी सर्व तर्‍हेची व अत्याधुनिक उत्पादने मिळू शकतात. स्टॉलवर थेट विक्री होते तसेच ऑर्डर बुकिंगही केले जाते. जागतिक पातळीवर त्या संबंधित उद्योगातील कोणती उत्पादने आज वापरात आहेत ते एका ठिकाणी समजू शकते. येथे बर्‍याच देशांचे उत्पादक येत असल्यामुळे त्यांच्यात माहितीचे, विचारांचे आदान-प्रदानही होते. या प्रदर्शनाचा कालावधी एक दिवसापासून तीन दिवसांपर्यंत असतो. या प्रदर्शनाच्या कालावधीत समजा तयार कपड्यांच्या उद्योगाचे प्रदर्शन आहे तर ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात येते. परिणामी जागतिक पातळीवरच्या सर्व कपडे उत्पादकांना अद्ययावत फॅशन ट्रेंड काय आहे याची माहिती मिळते.
या प्रदर्शनांच्या कालावधीत परिषदांचेही आयोजन करण्यात येते. या परिषदांत त्या-त्या उद्योगातील तज्ज्ञ व्यक्तींची भाषणे आयोजित करण्यात येतात. यातून तेथे सहभागी झालेल्या सर्व देशांतील उत्पादकांस प्रत्येक देशातील औद्योगिक प्रक्रियेत वापरले जाणारे तंत्रज्ञान व तांत्रिक माहिती यांची ओळख होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कित्येक कंपन्यांचे करारमदारही होतात, जे दोन्ही कंपन्यांना वृद्धीसाठी उपयोगी पडतात.
कोणत्याही उत्पादकास बाजारपेठ मिळविण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. बरीच मेहनत घ्यावी लागते. मार्केटिंग करावे लागते. या तुलनेत या प्रदर्शनात जर सहभागी झाले तर बर्‍याच वेळा बाजारपेठ म्हणा किंवा विक्रीच्या संधी म्हणा, चालून येतात.
ही औद्योगिक प्रदर्शने प्रामुख्याने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत भरतात. सध्या यांचा जोरदार हंगाम चालू आहे. आता आपण दोन होऊन गेलेल्या व दोन पुढे होणार्‍या प्रदर्शनांबाबतची माहिती पाहू-
इंटरसोलर इंडिया २०१४
ऊर्जा उद्योगाचे ‘इंटरसोलर इंडिया २०१४’ हे प्रदर्शन नुकतेच मुंबईत आयोजित करण्यात आले होते. हे ऊर्जा उद्योगातील आशियातील सर्वात मोठे प्रदर्शन तीन दिवस आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात २०० स्टॉल्स मांडण्यात आले होते. भारतीय उद्योजकांशिवाय यू.के., जर्मनी, चीन, जपान, सिंगापूर, यू.एस.ए., नेदरलँड, स्पेन, बेल्जियम, कोरिया इत्यादी देशांतील उद्योजकांचे स्टॉलही या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. कोळसा व पाणी ही पारंपरिक ऊर्जा उत्पादनाची साधने सद्यपरिस्थितीत दुर्लक्षित करून सौर व औष्णिक, विशेषतः सौरऊर्जेच्या उत्पादनांचा वापर यांच्यात वाढ व्हावी हा विचार या प्रदर्शनात प्रामुख्याने मांडण्यात आला. सौरऊर्जेतील भारतीय उद्योजकांना या प्रदर्शनामुळे या उद्योगातील नवी उत्पादने व नवे तंत्रज्ञान यांची माहिती झाली.
भारतात मध्य प्रदेश हे राज्य सौरऊर्जा उत्पादनात विशेष स्वारस्य दाखविते. परिणामी या राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने या प्रदर्शनात आपला एक स्टॉल मांडला होता. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास दि एनर्जी ऍण्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटचे महासंचालक डॉ. राजेंद्र के. पचौरी, परदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच मध्य प्रदेशच्या ऊर्जा खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनाच्या कालावधीत या उद्योगात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा पारितोषिके देऊन गौरवही करण्यात आला. भारतात बर्‍याच ठिकाणी सूर्य प्रखरतेने तळपतो, त्यामुळे भारतात फार मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा उत्पादित होऊ शकते. ईशान्येकडील ७ राज्यांत जर संपूर्ण विद्युतीकरण करावयाचे असेल तर सौरऊर्जा हाच चांगला पर्याय आहे. या प्रदर्शनाने या उद्योगातील उत्पादक, पुरवठादार, वितरक, सेवा पुरविणारे व भागीदार या सर्वांना त्यांच्या व्यवसायात फायदा झाला.
ओएसएच इंडिया २०१४
‘ओएसएच इंडिया २०१४’ हे दोन दिवसांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईत आयोजित करण्यात आले होते. नोकरीधंद्याच्या ठिकाणी आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणार्‍या उत्पादनांच्या जागतिक पातळीवरील उद्योजकांचे हे प्रदर्शन होते. या प्रदर्शनामुळे या उद्योगातील उत्पादक, सल्लागार, व्यवसायतज्ज्ञ विचारांचे आदानप्रदान करू शकले. भारतात औद्योगिक अपघातांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अशा तर्‍हेचे प्रदर्शन भारतात आयोजित होणे हे भारताला पर्वणीच ठरू शकते. ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलचे केविन माएर्स व नॅशनल सेफ्टी कौन्सिलचे महासंचालक व्ही. बी. संत या प्रदर्शनाच्या उद्घाटनास उपस्थित होते. भारत सरकारचा ‘मेक इन इंडिया’ उपक्रम या उद्योगास पुरक ठरणारा आहे. या प्रदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत या विषयातील बर्‍याच तज्ज्ञांनी आपली मते मांडून या उद्योगाचे महत्त्व व गरज पटवून दिली. या उद्योगातील जागतिक पातळीवरच्या संस्थांचेही प्रतिनिधी या प्रदर्शनात सहभागी होते. त्यांनी त्यांच्या देशात औद्योगिक सुरक्षिततेच्या संकल्पनेचा कसा विचार केला जातो, यासाठी काय केले जाते वगैरेची इत्थंभूत माहिती दिली.
भारतात औद्योगिक अपघात हे निष्काळजीपणामुळे व कामगारांच्या अशिक्षिततेमुळे होतात. त्यामुळे भारतीय उद्योजकांनी जर सुरक्षिततेची अद्ययावत उपकरणे भारतात आणली तर ती कशी वापरावीत यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. दुर्दैवाने भारतात औद्योगिक अपघातग्रस्तांना किंवा अन्य अपघातग्रस्तांनाही योग्य नुकसानभरपाई मिळत नाही.
१२ वे चायना प्रॉडक्ट्‌स प्रदर्शन
१२ वे दि चायना प्रॉडक्ट्‌स प्रदर्शन येत्या १८ तारखेपासून २० तारखेपर्यंत मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. चीनची तकलादू उत्पादने भारतात फार मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतात व त्यांच्या किमती कमी असल्यामुळे त्यांची विक्रीही फार मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे भारतीय उत्पादकांच्या विक्रीवर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे चीनच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविणे योग्य की अयोग्य? हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. तरीही या प्रदर्शनात चीन उत्पादित इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी उपकरणे, फर्निचर, विद्युत उपकरणे, फॅशन ज्युवेअरी, गिफ्ट्‌स, कपडा, तयार कपडे, यंत्रसामग्री, औद्योगिक उत्पादने, बांधकाम उद्योगास लागणारी उपकरणे इत्यादी मांडण्यात येणार आहेत. या उद्योगातील १० ते १२ हजार खरेदीदार या प्रदर्शनास भेट देणार आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने औद्योगिक परिषदेचेही आयोजित करण्यात येणार आहे. चीन, हॉंगकॉंग व मकाव येथील उद्योजक या प्रदर्शनात सहभागी होणार असून ते भारतीय उद्योजकांत कमी किमतीत व कमी वाहतूक खर्चात दर्जेदार उत्पादने कशी उत्पादित करावीत याचा मंत्र देणार आहेत. यातून भारतीय उद्योजकांना चीनच्या तंत्रज्ञानाची माहिती मिळेल.
पूर्वी जपान हा देश ‘ओव्हर प्रॉडक्शन’मध्ये प्रसिद्ध होता. आता ते स्थान चीनने मिळविले आहे. इंडियन मर्चंट्‌स चेंबर, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, इंडिया-चायना चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री व एसएमई चेंबर ऑफ इंडिया या औद्योगिक संघटनांनी या प्रदर्शनास साहाय्य करण्याचे ठरविले आहे. चायना कौन्सिल फॉर द प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड व वर्ल्ड इंडिया एक्झिबिशन ऍण्ड प्रमोशन प्रा. लि. यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
तिसरे बीसी इंडिया २०१४ प्रदर्शन
बांधकाम क्षेत्रात लागणार्‍या यंत्रसामग्री उद्योगाचे ‘बीसी इंडिया २०१४’ हे प्रदर्शन येत्या १५ डिसेंबरपासून दिल्ली एनसीआर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ६२५ स्टॉल्स मांडण्यात येणार असून यांपैकी ६० टक्के स्टॉल्स भारतीय उद्योजकांचे व ४० टक्के स्टॉल्स परदेशी उद्योजकांचे असणार आहेत. या प्रदर्शनात जगभरातील या उद्योगातील उद्योजक अद्ययावत उपकरणे, उत्पादने, तंत्रज्ञान व सेवा तसेच बांधकाम यंत्रसामग्री, इमारत बांधणी यंत्रसामग्री, खाण उद्योगाला लागणारी यंत्रसामग्री व बांधकाम वाहने प्रदर्शित केली जाणार आहेत. चीन, जर्मनी, ग्रेटब्रिटन, इटली, कोरिया, स्पेन व यू.एस.ए. या देशांतील उद्योजकांचा या प्रदर्शनात फार मोठा सहभाग असणार आहे. हे या प्रदर्शनाचे तिसरे वर्ष आहे. या प्रदर्शनात २५ देशांतील ७०० उद्योजक आपले स्टॉल्स मांडणार आहेत. बीसी इंडिया हे प्रदर्शन भारतात पहिल्यांदाच आयोजित होत आहे. हे प्रदर्शन १८ डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात परदेशातील व्यक्ती फार मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात ऑडिओ व्हिज्यूअल प्रेझेंटेशन सादर करण्यात येणार असून पहिल्या दिवशी उपकरणांवर माहिती देण्यात येणार आहे. दुसर्‍या दिवशी पायाभूत गरजा उभारण्यासाठी लागणार्‍या उपकरणांवर माहिती देण्यात येणार आहे. दुसर्‍या दिवशीचे प्रेझेंटेशन इंडियन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ही संस्था करणार आहे.
ही आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शने व्यवसाय वृद्धीस साहाय्य करतात. भारताच्या आयात-निर्यातीत वाढ करतात. उद्योजकांना जागतिक बाजारपेठ मिळवून देतात. उद्योजकांना उद्योगातील आधुनिक ट्रेंड, आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती मिळते. जसे परदेशी उद्योजक भारतात स्टॉल्स मांडतात तसेच परदेशात होणार्‍या अशा प्रदर्शनांत भारतीय उद्योजक सहभागी होऊन आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवतात.