ओडिशा एफसी-एटीके यांच्यात गोलशून्य बरोबरी

0
116

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी ओडिशा एफसीने नव्या होमग्राऊंडवर आघाडीवरील एटीकेला गोलशून्य बरोबरीत रोखले. येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील लढतीत दोन्ही संघांना दमदार चाली रचता आल्या नाहीत. बरोबरीच्या एका गुणासह एटीकेची आघाडी मात्र वाढली.

एटीकेची पाच सामन्यांत पहिलीच बरोबरी झाली असून तीन विजय व एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांनी दहा गुणांसह निर्विवाद आघाडी घेतली. बंगळुरू एफसी ५ सामन्यांतून ९ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. ओडिशाची ५ सामन्यांतील ही दुसरी बरोबरी असून एक विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले.

एटीकेकडून खेळणारा फिजीचा खेळाडू रॉय कृष्णा याच्यासह फॉर्मातील संघाला भेदक चाली रचता आल्या नाहीत. त्यामुळे स्पेनचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांच्यासाठी निकाल निराशाजनक ठरला. दुसरीकडे फिल ब्राऊन यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिशाने खडतर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एका गुणाची कमाई केली.
पूर्वार्धात ३६व्या मिनिटाला ओडिशा एफसीच्या शुभम सारंगीने उजवीकडून पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारली. चेडू मिळताच तो आगेकूच करण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी मायकेल सुसैराजने त्याला मागून रोखले. खाली पडत शुभमने पेनल्टीचे अपील केले, पण त्यात सोंग जास्त असल्याचे वाटल्यावरून पंच क्रीस्टल जॉन यांनी ते फेटाळून लावले.

भरपाई वेळेत एटीकेला मिळालेला कॉर्नर एदू गार्सियाने घेतला. त्यावर प्रीतम कोटल याने आक्रमकतेने हालचाल करीत हेडींग केले. नेटच्या दिशेने जाणार्‍या चेंडूच्या मार्गात ओडिशाचा मध्यरक्षक मार्कोस टेबार होता. चेंडू त्याच्या हाताला लागल्याचे अपील एटीकेच्या खेळाडूंनी केले, पण पंचांनी ते फेटाळून लावले. त्यामुळे थोडे नाट्य घडले.
एटीकेने पहिला प्रयत्न केला. डावीकडून मायकेलने क्रॉस शॉट मारला, पण चेंडू बाहेर गेला. चौथ्या मिनिटाला ओडिशाच्या नारायण दासने डावीकडून अरीडेन सँटाना याला पास दिला, पण २५ यार्डा अंतरावरून झालेला हा प्रयत्न फोल ठरला. एटीकेला दहाव्या मिनिटाला डावीकडे मिळालेला कॉर्नर जेव्हियर हर्नांडेझ याने घेतला. त्याचा फटका हेडिंग सँटाना याने अडविला, मग आपल्यापाशी आलेला चेंडू त्याचा सहकारी डॅनिएल लाल्हीम्पुईया याने थ्रो-इन साठी रोखला. ओडिशाला १६व्या मिनिटाला चांगली संधी मिळाली होती. मार्टिन ग्युएडेसने डावीकडे मिळालेल्या कॉर्नरवर फटका मारला. तो रोखण्यासाठी एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य पुढे सरसावला, पण त्याचा अंदाज चुकला. त्यावेळी नंदकुमार शेखर याला केवळ हेडिंग करायचे होते, पण अचूकतेअभावी चेंडू त्याच्या डोक्याला लागून बारवरून बाहेर गेला. २४व्या मिनिटाला ओदीशाला पुन्हा फिनिशिंग करता आले नाही. डावीकडून त्याला मोकळीक मिळाली होती. त्याने पेनल्टी क्षेत्रात अप्रतिम क्रॉस पास दिला, पण मार्टिन चेंडूपर्यंत जाऊच शकला नाही.

पाच मिनिटांनी शेखरने पुन्हा चाल रचली, पण डावीकडून त्याला एटीकेच्या कार्ल मॅक्‌ह्युजने मैदानावर घसरत रोखले. एटीकेला ३९व्या मिनिटाला संधी होती. डेव्हिड विल्यम्सने डावीकडून चेंडू मिळताच मुसंडी मारली. त्याने संघातील फिजीचा सहकारी रॉय कृष्णा याला पास दिला. कृष्णा मात्र पुरेशी ताकद लावून चेंडू मारू शकला नाही.
एटीकेला ४३व्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. त्यावरील फटका ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगने थोपविला. चेंडू मायकेलपाशी येताच त्याने विल्यम्सला पास दिला. विल्यम्सने नेटच्या दिशेने फटका मारला, पण अर्शदीपने खाली वाकत बचाव केला. दुसर्‍या सत्रात ओडिशाच्या जेरी माहमिंगथांगाला उजवीकडे चेंडू मिळाला. त्याचा पहिला प्रयत्न चुकला, पण चेंडू त्याच्यापाशीच होता. त्याने पेनल्टी क्षेत्रात पास देताच मार्कोस टेबारने मारलेला फटका एटीकेचा बचावपटू प्रबीर दासने रोखला. ६३व्या मिनिटाला हर्नांडेझचा फटका रोखताना ओडिशाकडून चेंडू बाहेर केल्यामुळे एटीकेला कॉर्नर मिळाला. तो हर्नांडेझनेच घेतला. त्यानंतर चुरस होऊन आगुस्टीन इनीग्युएझने मारलेला चेंडू ओडिशाने बाहेर घालविला. एटीकेला लगेच आणखी एक कॉर्नर मिळाला. त्यावर बदली खेळाडू जॉबी जस्टीनने ताकदवान हेडिंग केले, पण अर्शदीपने चपळाईने बचाव केला.ओडिशाचा बदली खेळाडू बिक्रमजीत सिंगने ७५व्या मिनिटाला चेंडू मिळताच कौशल्य दाखवित फटका मारला, पण एटीकेचा गोलरक्षक अरींदमने तो सहज रोखला.