ओकारी येते…. थांबा..!

0
990

डॉ. राजेंद्र साखरदांडेसाखळी
सर्वसामान्यांना केव्हा ना केव्हा कुठल्यातरी नैसर्गिक कारणामुळे ओकारी वा उलटी येऊ शकते. केव्हा केव्हा काहींना तर हा त्रास होतोच. उलटी येत नसेल तर तोंडात बोटे घालून उलटी करणारे महाभागही सापडतात. डोके जड झाले वा चक्कर यायला लागली तर घरची माणसे सांगतात, ‘उलटी करून ये म्हणजे पित्त निघून गेल्यावर बरे वाटेल. नाहीतर डोक्यावर लिंबाचा शेक घ्यावा. लिंबुसरबत घ्यावे.. वगैरे उपचार सांगितले जातात. हे सगळे उपाय साधे व सरळ आहेत. ते करा पण त्यात जास्त वेळ घालवायचा नाही.आजचा आमचा विषय आहे ‘उलटी’ किंवा ‘वमन’. उलटी येणे हे सामान्य रोगाचे लक्षण असू शकते व मोठ्या रोगाचेही! तेव्हा त्याची दखल घेेणे जरुरीचे ठरते.
कोणत्या रोगांमध्ये उलटी होऊ शकते? त्याची कारणे कोणती?
१) पोटाचे (जठराचे) विकार
२) सर्व प्रकारचे ताप
३) लहान आतड्यांचे विकार
४) यकृताचे (लिव्हर) विकार
५) रक्तदाब
६) मेंदूचे विकार
७) कानाचे विकार
८) मानेचे विकार व इतर.
आजवर आपण फक्त लक्षणांवर लेख लिहितोय. कारण माहिती आहे का? या व इतर पेपरवरच्या पुरवणीत रोगाविषयी माहिती नेटवरून सरळ घेतलेली दिसते. वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर वर्ग सतत त्यावर लिहीत असतो. तेव्हा विचार केला- लक्षणांवर लिहावे म्हणजे ते वाचून वाचक स्वतःची काळजी घेण्याचा प्रपंच करील. याचा काही फायदा झालाय का?
१) पोटाचे विकार – गोव्यात मागे म्हटल्याप्रमाणे पोटाचे विकार पुष्कळ आहेत व त्यात उदराचे (स्टमक) विकार भयंकर! कारण गोवेकर मसालेदार खाणारे. मासे, चिकनशिवाय जेवण नाही. हे खमंग, रुचकर पदार्थ वरचेवर खाऊन पोट अगदी भाजून निघते व मग ते बोंबलते. पोटात पहिल्यांदा ऍसिडिटी वाढते. पोटाला जाळणारे फक्त खाणेच नव्हे तर त्यात दारू ही आलीच. पित्ताचे विकार ख्रिश्‍चन लोकांत जास्त आढळून येत नाहीत व ते रस्त्यावर झिंगत किंवा पडलेले दिसत नाहीत. कारण ते माफक प्रमाणात दारू पितात. पुढे पित्त जास्त वाढले तर अल्सर होतो… कँसर होऊ शकतो. तेव्हा दारू पिणार्‍यांनो व जास्त मसालेदार खाणार्‍यांनो सावधान..!
२) सर्व प्रकारचे ताप – तापात जेवढ्या प्रमाणात शरीरावरची कातडी तापते तेवढ्याच प्रमाणात शरीरातले इतर अवयव ही तापतात. साहजिकच मेंदू-पोट हे तेवढेच तापले जातात. व त्याची परिणती उलटीत होते. तेव्हा ताप असला तर त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.
३) लहान आतड्यांचे विकार-
* लहान आतड्यास पडणारे पिळ.
* जंतामुळे आतड्याला पडलेला पिळ.
* आतड्यात ट्यूमर, आतड्याचा कँसर
* ऍपेंडिक्सचा आजार.
केव्हा केव्हा विविध कारणांमुळे लहान आतड्याला पिळ पडतो. पोटात दुखत राहते व उलटी होत राहते. पहिल्यांदा पिवळे पित्त बाहेर निघते… उलटी चालू राहिली तर मग उलटीतून हिरवे पित्त निघते.. ते म्हणजे बाईल. तेव्हा खरेच काहीतरी भयंकर घडतेच. सावध रहा. पण आजकाल हे प्रमाण कमी झालेले दिसते. कारण जंताबाबत सगळे लोक दर सहा महिन्यांनी मुलांना किंवा मोठ्यांना जंताच्या गोळ्या देतात. गोव्यात हे करणे जरुरी आहे.
आतडे लहान असू देत किंवा मोठे .. ट्यूमर किंवा कँसर झाला तर ओकारी हे त्यात एक लक्षण असतेच. ऍपेंडिक्सचा आजारही लोकांमध्ये कमी प्रमाणात दिसतो. वैज्ञानिक क्षेत्रात झालेली प्रगती, निरनिराळे अँटीबायोटिक्स हा रोग वाढू देत नाहीत.
४) यकृताचे (लिव्हर) विकार – यकृत म्हणजे लिव्हरचे विविध विकार लोकांमध्ये दिसून येतात. त्याचे प्रमुख कारण दारू व इतर व्यसने. जेवणात जे विविध प्रकार आपण घेतो किंवा जे काही आपण पितो ते सगळे पचन झाल्यावर ते रक्तातून यकृतात म्हणजे लिव्हरमध्ये जाते. तिथे वाईट प्रकार काढून टाकले जातात. जेवण फिल्टर केले जाते. व मग त्याचा पुरवठा शरीरातल्या विविध अंगांना केला जातो. जर तुम्ही पुष्कळ खात असाल, भरपूर दारू पीत असाल किंवा विविध व्हायरसने जर यकृत ग्रस्त झाले असेल तर ते रागावते, रुसते.. व आजारी पडते. त्याला हिपॅटायटीस म्हणतात. त्यात यकृत वाढते व तो रुग्ण उलट्या करतो. त्याला जेवण पचत नाही व अशा प्रकारचे लिव्हरचे विकार गोव्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. मी नेहमी अशा माझ्या रुग्णांना हसून म्हणतो, ‘अरे, गोव्यात दारू मिळते अन् मिळत राहणार. ती संपविण्याचा प्रयत्न करू नका. ती संपणार नाहीच. तुम्हीच संपून जाल! तेव्हा याबाबत तरी सावध व्हा… स्वतःला जपा. काळजी घ्या! तुमच्या लोकांना तुम्ही हवे आहात!!
५) उच्च रक्तदाब –
रक्तदाब वाढल्यावर चक्कर व उलटी येते. पहिल्यांदा डोके जड होते. अशा प्रकारचे पेशंट येतच राहतात. तेव्हा स्वतःचा रक्तदाब तपासून घ्या. त्यावर दिलेल्या गोळ्या डॉक्टरी सल्ल्यानुसार घ्या.
६) मेंदूचे विकार –
मेंदूच्या विविध विकारातही वमन हे लक्षण दिसून येते. कुठल्या ना कुठल्या कारणाने जर मेंदूतील दाब वाढला तरी उलटी ही ठरलेली असते. कित्येकदा माणूस घरी काम करत असताना घसरून पडतो… डोक्याला खोक पडते. टेंगुळ येते. सगळे वरचेवर झालेय असे समजून तो त्यावर पावडर लावतो, बर्फ लावतो. घरीच पडून राहतो. थोड्याच वेळात त्याचे डोके जड होते, उलटी, चक्कर यायला लागते. या पेशंटला हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन जाणे गरजेचे आहे. त्याच्या मेंदूला इजा झालेली आहे. अशा वेळी पेशंटला घरी ठेवणे धोक्याचे ठरू शकते.
७) कानाचे विकार – कानाच्या विविध विकारात रुग्णाला चक्कर येते व त्याच्याबरोबर उलटी येणे ही लक्षणे बरोबरीने दिसतात. तेव्हा हे साधे आहे असे समजू नका.
८) मानेचे विकार – आजकाल मानेचे व कंबरेचे विविध प्रकारचे विकार लोकांमध्ये आपल्याला दिसून येतात. मानेच्या स्पॉंडिलायटीसचे प्रमाण वाढतेय. मानेचे व कंबरेचे व्यायाम लोकांमध्ये कमी झालेत. या दोघांमध्ये गरजेची असलेली लवचिकता चालू राहण्यासाठी व्यायाम ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. हे विकार झाल्यावर मग योगा करणे किंवा व्यायाम करणे हे योग्य नाही. तेव्हा वय झाल्यावर किंवा तरुणपणापासून व्यायाम करण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. स्वतःचे शरीर ताजेतवाने व आरोग्यसंपन्न ठेवणे महत्त्वाचे आहे.
हा सल्ला कितीही दिला तर लोक म्हणतात ‘आम्हाला फार कमी वेळ मिळतो. काम केल्यावर घरी येऊन केव्हा एकदा बिछान्यावर किंवा सोफ्यावर पडतो असे होते.’ हेही खरे आहे. आजकाल जीवनात एवढे ताप वाढलेले दिसतात की माणसाने त्यातनं बाहेर निघायचा कितीही प्रयत्न केला तरी बाहेर पडू शकत नाही. हे सगळे कितीही सत्य असले तरी ही स्वतःची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
तुमच्या कुटुंबाला, वॉट्‌सअपच्या ग्रुपला तुमची गरज आहे. स्वतःला सांभाळा. काळजी घ्या. तुमचा मंगळवारचा दिवस व पुढे येणारे दिवस सुखाचे जावोत!