ऑस्ट्रेलिया सुस्साट; लाबुशेनचे शतक

0
120

नवोदित मार्नस लाबुशेन याने ठोकलेले चौथे कसोटी शतक व स्टीव स्मिथच्या २८व्या कसोटी अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३ बाद २८३ अशी भक्कम स्थिती गाठली आहे. दिवसअखेर लाबुशेन १३० धावांवर खेळत असून २२ धावा करून मॅथ्यू वेड त्याला साथ देत आहे.
सामन्यातील पहिली धाव घेण्यासाठी ३९ चेंडू खेळलेल्या स्मिथने लाबुशेनसह १५६ धावांची भागीदारी रचली.

शतकापासून मात्र तो दूर राहिला. १८२ चेंडूंत ६३ धावा करून कॉलिन डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये झेल देऊन त्याने तंबूची वाट धरली. तत्पूर्वी, स्थिरावलेला डेव्हिड वॉर्नर ‘लेग गली’मध्ये नील वॅगनरच्या गोलंदाजीवर ग्रँडहोमकडे वैयक्तिक ४५ धावांवर झेल देत परतला. प्रगतीपथावर असलेल्या या मालिकेत वॉर्नरला बाद करण्याची वॅगनरची ही चौथी वेळ आहे. पाकिस्तानविरुद्ध ३३५ व १५४ धावांची खेळी केलेल्या वॅगनरला न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत अजूनही अर्धशतकी वेस ओलांडता आलेली नाही. दुसरा सलामीवीर ज्यो बर्न्स केवळ १८ धावा करून बाद झाला.

आजारी न्यूझीलंड
कर्णधार केन विल्यमसन, मधल्या फळीतील फलंदाज हेन्री निकोल्स, अष्टपैलू मिचेल सेंटनर हे त्रिकूट आजारी आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट दुखापतग्रस्त असून टीम साऊथीला आश्‍चर्यकारकरित्या डच्चू देण्यात आला आहे. या प्रमुख खेळाडूंविना न्यूझीलंडचा संघ या कसोटीत उतरला आहे.
किवी संघाकडून ग्लेन फिलिप्स याने कसोटी पदार्पण केले आहे. दुसर्‍या कसोटीसाठी डच्च्चू देण्यात आलेला जीत रावल संघात परतला आहे. मॅट हेन्री, विल सॉमरविल व टॉड ऍस्टल यांना संघात स्थान मिळाले आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लेथम संघाचे नेतृत्व करत आहे.