ऑस्ट्रेलिया सर्वबाद २१४

0
106

इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाला केवळ २१४ धावांपर्यंत मजल मारता आली. फिरकीपटू व मध्यमगती गोलंदाजांनी प्रत्येकी ५ बळी घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
नूतन कर्णधार टिम पेन याच्या नेतृत्वाखाली पहिलीच एकदिवसीय मालिका खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऍरोन फिंच व ट्रेव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. हेड केवळ चार धावा करून बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूने चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर केले नाही. यामुळे त्यांचा डाव ५ बाद ९० असा कोसळला.

ग्लेन मॅक्सवेल (६२) व ऍश्टन एगार (४०) यांनी सहाव्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी करत संघाचा कोसळता डोलारा सावरला. या दोघांच्या संयमी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित ५० षटके खेळू शकला नाही. १८ चेंडू शिल्लक असताना त्यांचा डाव आटोपला. इंग्लंडकडून मोईन अली व लियाम प्लंकेटने प्रत्येकी ३, आदिल रशीदने २ तर डेव्हिड विली व मार्क वूडने प्रत्येकी १ गडी बाद केला.
इंग्लंडने या सामन्यापूर्वी सॅम बिलिंग्स व जेक बॉल यांना रॉयल लंडन कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात खेळण्यासाठी मुक्त केले. बिलिंग्स केंटकडून तर बॉल नॉटिंघमशायरकडून खेळणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मध्यमगती गोलंदाज मायकल नेसर याला पदार्पणाची संधी दिली.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः फिंच १९, हेड ५, शॉन मार्श २४, स्टोईनिस २२, पेन १२, मॅक्सेवेल ६२, एगार ४०, नेसर ६, टाय १९, रिचर्डसन १, स्टेनलेक नाबाद ०, अवांतर ४, एकूण ४७ षटकांत सर्वबाद २१४, गोलंदाजी ः वूड ३२-१, विली ४१-१, अली ४३-३, रशीद ३६-२, रुट २०-०, प्लंकेट ४२-३ वि. इंग्लंड)