ऑस्ट्रेलियाचे पहिल्या दिवशी वर्चस्व; १ बाद ३०२ धावा

0
145

>> वॉर्नरचे नाबाद दीडशतक; लबुशेनचे शतक

डावखुरा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे तडफदार नाबाद दीडशतक आणि मार्नस लबुशेनच्या नाबाद शानदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ओव्हल मैदानावर सुरु झालेल्या पाकिस्ताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर ७३ षट्‌कांच्या खेळात १ गडी गमावत ३०२ अशी अशी धावसंख्या उभारली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या सुरुवात खराब झाली. सलामीवीर जो बर्न्सला जास्तवेळ खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही व तो केवळ ४ धावा जोडून शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर मोहम्मद रिजवानकडे झेल देऊन तंबूत परतला.

बर्न्स बाद झाल्यानंतर मैदानावर डेव्हिड वॉर्नरने मार्नस लबुशेनच्या साथीत संघाचा डाव सावरताना दिवसअखेरपर्यंत आणखी गडी बाद होऊ न देता पाकिस्तानी गोलंदाजावर वर्चस्व गाजवले. या दोघांनी २९४ धावांची अविभक्त भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा वॉर्नर १९ चौकारांसह १६६ तर लबुशेन १७ चौकारांनिशी १२६ धावांवर नाबाद खेळत होता.