ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा व्हाईटवॉश

0
129

तिसर्‍या व शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव करत यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. विजयासाठी ४१६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या १३६ धावांत संपला.
तिसर्‍या दिवसाच्या बिनबाद ४० धावांवरून काल चौथ्या दिवशी पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २ बाद २१७ धावांवर घोषित केला. डेव्हिड वॉर्नरने नाबाद १११ धावा चोपल्या. तर मार्नस लाबुशेनने ५९ धावांचे योगदान दिले. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात भयावह झाली. ४ धावा फलकावर लागेपर्यंत त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. यानंतर त्यांची ५ बाद ३८ अशी केविलवाणी स्थिती झाली. कॉलिन डी ग्रँडहोम व टॉड ऍस्टल यांनी सहाव्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडला शंभरी ओलांडता आली. दुखापतीमुळे मॅट हेन्री फलंदाजीस उतरला नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन याने ५० धावांत ५ गडी बाद करत सामन्यात १० बळी घेण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४५४ धावांना उत्तर देताना न्यूझीलंडचा पहिला डाव २५६ धावांत संपला होता.