ऐतिहासिक भूमिकांना मी अग्रक्रम देते

0
143

>> मृणाल कुलकर्णी यांचे मत : इफ्फीच्या कट्ट्यावर रंगली चर्चा

ऐतिहासिक भूमिका वठविणे कठीण असते. खूप मेहनत, अभ्यास करावा लागतो व त्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांकडून आदराचे स्थान मिळवावे लागते. पण मी ऐतिहासिक भूमिकांना अग्रक्रम देते. ऐतिहासिक भूमिका मी विश्‍वासार्हततेने केल्या याचा मला अभिमान आहे, असे स्पष्ट करून लोकप्रिय अभिनेत्री तथा दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी भारतीय इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्व चित्रपटाच्या माध्यमातून पुढे यायला हव्यात, नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहचविण्यासाठी चित्रपट हे उत्कृष्ट माध्यम आहे असे मत इफ्फीच्या कट्ट्यावर काल व्यक्त केले.

गोमंतकीय रंगकर्मी प्रसिद्ध मुलाखतकार डॉ. अजय वैद्य यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कोणत्याही क्षेत्रात पुढे यायचे असेल तर आवडीने, मनापासून काम करावे लागते. कलाकाराने स्वत:ला मर्यादा घालून घेऊ नयेत, असे सांगून मृणाल कुलकर्णी यानी अभिनय हे एकाचे काम असते मात्र दिग्दर्शकाला शंभर जणांचे काम करावे लागते. कधी कधी दिग्दर्शन करताना एवढे थकायला होते, की मग अभिनयच बरा असे वाटते. हा अनुभव बोलून दाखवला.

हजारो, लाखो प्रेक्षक तुम्हाला चित्रपटातून बघत असतात. त्यासाठी अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. इतरांच्या चित्रपटातून घेण्यासारखे असते ते घ्यावे लागते. मी इफ्फीत दरवर्षी येते, इतरांचे चांगले चित्रपट बघायला मिळतात, नवीन काही शिकायला मिळते. असे प्रांजळपणे मृणाल यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मी गेली पंचवीस वर्षे अभिनय करते. ऑडिशन न देता मला त्यावेळचे नामवंत दिग्दर्शक गजानन जहागिरदार यांच्या ‘स्वामी’ मालिकेत प्रमुख भूमिका योगायोगाने मिळाली आणि त्यापासून मग एका मागून एक चांगल्या भूमिका वाट्याला आल्या. आजोबा इतिहासकार, साहित्यिक त्यामुळे दोन्ही गोष्टींकडे जवळचा संबंध होता.
माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्यांकडे दिग्दर्शक म्हणून काम करताना सुरूवातीला थोडं दडपण येते, असे संबंधीत प्रश्‍नावर त्यांनी उत्तर दिले. अलीकडे दूरदर्शन मालिकांत आई वडीलांचे अनैतिक अफेअर्स जास्त दाखवले जातात व मुलांना मांडीवर बसवून पालक ते दूरदर्शनवर पाहत असतात, याचे कुठेतरी भान ठेवायला हवे, त्यातून मुलांवर नको ते बिंबवले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ‘सोल करी’तील परींच्या संदर्भात त्यांनी किस्सा सांगून रसिकांना हसवले. येत्या दोन महिन्यांत येरे येरे पैसा हा धम्माल चित्रपट व सुमित्रा भावेंचा, स्त्री घर उभं करते पण ते घर तिचं असतं का याची चिकित्सा करणारा असे आपले दोन चित्रपट येणार असल्याचे मृणाल यांनी जाहीर केले.

संघर्ष करण्यात मी आनंद घेतला : सतिश कौशिक
दरम्यान हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता सतिश कौशिक यांनी कट्ट्यावर सचिन चाटेंशी संवाद साधताना चित्रपट क्षेत्रात उतरण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला परंतु त्यात ही मी आनंद घेतला असे स्पष्ट केले. दिग्दर्शन अभिनय, थिएटर, निर्माता, पटकथालेखन असे सर्वच मी केले असले तरी अमुक एक करताना आनंद वाटतो असे माझ्याबाबतीत सांगू शकत नाही. कारण प्रत्येक काम करणे हा माझ्यासाठी आनंदाचा भाग असतो असे कौशिक यानी सांगितले. ते म्हणाले मी स्वप्नवादी होतो. मला ‘कौशिक’ हे नाव लोकप्रिय करायचे होते. राष्ट्रीय नाट्य विद्यालय, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकलो. पण सुरवातीला चारशे रुपये पगारावर टेक्ट्रायल मिलमध्ये सुद्धा काम केले. ‘जाने पे तो यारो ’ चित्रपट साडेसात लाखात केला. त्यात नासरुद्दिन शहा, ओमपुरी, मीना गुप्ता इतर तंत्रज्ञ सगळेच टॉपचे कलाकार होते. मी आयुष्यात क्षुल्लक कामही नाकारले नाही. छोट्या छोट्या कामातही जीव ओतला. एखाद्या छोट्याशा भूमिकेतुनही प्रभाव पाडून लोकप्रियता मिळते याची कौशिक यानी जाणीव दिली.
गोव्याबद्दल ते म्हणाले, मी आता आसगावला छोटा बंगला घेतलाय. गोवेकर व्हायला मला आवडेल. मेरा नाम है कॅलेंडर मधील गीताची झलक गाऊन त्यांनी रंगत आणली व रसिकांनी त्याना उत्स्फूर्त दाद दिली. किस्से सांगूनही त्यांनी मुलाखतीची लज्जत वाढविली.