ऐतिहासिक निकाल

0
231

नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांद्वारे ईशान्य भारतामध्ये जोरदार मुसंडी मारून भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे. त्रिपुरामधील डाव्यांचा लाल किल्ला उद्ध्वस्त करून तेथे अक्षरशः शून्यातून दोन तृतीयांश बहुमतापर्यंत भाजपाने मारलेली मजल ही अभूतपूर्व म्हणावी लागेल. फुटिरतावादाने ग्रासलेल्या नागालँडसारख्या राज्यामध्येदेखील भाजपाने दमदारपणे पाय रोवले आणि मेघालयमध्ये विशेष कामगिरी दाखवता आली नसली तरी तेथील सत्तेपासून कॉंग्रेसला दूर ठेवण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना यश आलेले दिसते आहे. यापूर्वी आसाममध्ये तेथील बांगलादेशी निर्वासितांनी मूळ आसामी संस्कृतीवर केलेल्या अतिक्रमणाविरुद्धचे जनमत आपल्या मतांमध्ये परिवर्तीत करून भाजपाने तेथे सरकार स्थापन केले. त्यानंतर ईशान्य भारताकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात झाली होती. त्रिपुरामध्ये गेल्या पाव शतकाची डाव्यांची सत्ता, त्यातून तेथे माजलेली मुजोरी, जनतेची त्यापासून मुक्तीची आस याचा चतुरपणे राजकीय लाभ उठवत भाजपाने स्वतःला पर्याय म्हणून प्रस्तुत केले आणि सध्याचे घवघवीत यश मिळवले आहे. भाजपच्या या यशाला पक्षातील शिस्त, मनुष्यबळ आणि आर्थिक बळ जेवढे कारणीभूत आहे, त्याहून अधिक ईशान्य भारतातील जनतेची विकासाची आस, आजवरची उपेक्षा कारणीभूत आहे. ईशान्येच्या राज्यांच्या आर्थिक नाड्या केंद्र सरकारच्या हाती असतात. त्यामुळे नरेंद्र मोदींसारख्या विकासाची बात करणार्‍या नेत्याला पर्याय म्हणून जनतेने पाहिले तर नवल नाही. त्रिपुराप्रमाणेच नागालँडमध्येही भाजपाने केलेली चांगली कामगिरी याच आकांक्षांची निदर्शक आहे. मेघालयमध्ये मात्र भाजपाला मुसंडी मारता आली नाही कारण तेथील परिस्थिती उर्वरित दोन राज्यांपेक्षा वेगळी आहे. मेघालय हे ख्रिस्तीबहुल राज्य आहे व तेथील ७४ टक्के लोकसंख्या ख्रिस्ती आहे हे तर खरेच, परंतु तेथे भाजपचे संघटनही मजबूत नव्हते आणि मुख्य म्हणजे नागालँड आणि त्रिपुरापेक्षा तेथील परिस्थिती वेगळी आहे. पुरेशा जागा मिळालेल्या नसल्या तरीही निवडणुकांचे निकाल येऊ लागताच भाजपाची यंत्रणा गोव्याप्रमाणेच तेथेही छोट्या कॉंग्रेसेतर पक्षांची मोट बांधून सरकार घडवण्यामागे लागली. कॉंग्रेसचे युवराज मात्र दुय्यम नेत्यांवर पुढील भार टाकून स्वतः इटलीमध्ये आजीच्या भेटीला निघून गेले. भाजपच्या यशोयात्रेमध्ये मुख्य योगदान असते ते कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या परिश्रमांचे. त्रिपुरामध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले काम वाढवले होते. हेमंत विश्‍वशर्मांसारखा रणनीतीकार, सुनील देवधरांसारखा समर्पित कार्यकर्ता जातीने तेथे तैनात होता. स्वतः अमित शहा ठिय्या देऊन राहिले. तेथील छोट्या छोट्या आदिवासी गटांशी भाजपाने संधान जुळवले. स्वतःला लाभदायक ठरतील अशा गटांना जवळ केले, त्यातून पक्षाला स्वीकारार्हता मिळत गेली. अशा परिश्रमांमधूनच यशाचा मंगल कलश हाती येत असतो. निवडणुकीतील विजयश्री म्हणजे काही ध्यानीमनी नसताना आयती लागणारी लॉटरी नव्हे. ईशान्येतील राज्यांमधील भाजपाचे दमदार पाऊल हे देशहिताच्या दृष्टीने, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही. तेथे वर्षानुवर्षे मूळ धरलेल्या फुटिरतावादाला हा जोरदार झटका आहे. नागालँडमध्ये तेथील फुटिरांशी केंद्र सरकारने केलेला करार गुलदस्त्यात आहे, परंतु त्या राज्याला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या दिशेने सत्तासुकाणू हाती असणे उपकारक ठरणार आहे. जनतेने भाजपाच्या हाती सोपवलेली सत्ता वा व्यक्त केलेला विश्वास ही खरे तर पक्षासाठी मोठी जबाबदारी आहे. वर्षानुवर्षांची आपली उपेक्षा संपेल, विकासाचा ओघ आपल्या प्रदेशाकडे वळेल या अपेक्षेने जनतेने हे मतदान केलेले आहे. त्या विश्वासाला पात्र ठरत आणि स्थानिक गटा – तटांना एकत्र ठेवत या अपेक्षांना उतरायचे आहे. एक नवा राजकीय अध्याय या निवडणूक निकालांनी देशाच्या इतिहासात लिहिला गेला आहे. म्हणूनच ईशान्यातील या छोट्या छोट्या राज्यांच्या या विधानसभा निवडणुका असूनही संपूर्ण देशभरातील प्रसारमाध्यमांनी या निकालांची एवढ्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली, जी आजवर कधीही घेतली जात नव्हती. भाजपाच्या कॉंग्रेसमुक्त भारताच्या घोडदौडीत कॉंग्रेसची मदार आता कर्नाटकच्या आगामी निवडणुकीवर आहे. एकेकाळी देशावर अधिराज्य गाजविणारी कॉंग्रेस आज तीन राज्यांपुरती सीमित उरलेली आहे. येथे एक बाब लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे ईशान्य भारताचे हे निकाल म्हणजे काही भाजपाच्या भावी यशाचा परवाना नव्हे. गुजरातमधील झटका, राजस्थान, मध्य प्रदेश पोटनिवडणुकांतील हादरा पाहिल्यास उर्वरित देशातील परिस्थिती पूर्ण भाजपानुकुल आहे असे मानणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे ईशान्येच्या या निकालांना वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहिले गेले पाहिजे. ईशान्येच्या जनतेच्या राष्ट्रीय आकांक्षांचे प्रतिबिंब या निकालातून उमटलेले आहे. त्या आकांक्षांची पूर्तताच भाजपाला ईशान्येच्या अष्टलक्ष्मीची प्राप्ती करून देईल.