‘एसी’मध्ये बसण्याचे दुष्परिणाम…

0
170

दिवसभरातील एकूण वेळापैकी जास्त वेळ ऑफीसमध्ये असणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कामाचा वाढता ताण आणि तो सांभाळताना होणारी तारांबळ नेहमीचीच. आता इतके तास एका ठिकाणी बसायचे म्हणजे त्याठिकाणी योग्य त्या सोयीसुविधाही हव्यात ना. त्यानुसार बहुतांश ऑफीसेसमध्ये एअर कंडिशनर असतोच. मुंबईसारख्या शहरात तर उकाड्यामुळे हा एअर कंडिशनर जणू आवश्यकच असतो. ही गार हवा शरीराला चांगली वाटत असली तरीही आरोग्याच्यादृष्टीने ती अजिबात चांगली नाही. या थंड हवेचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत असल्याचे काही अभ्यासांमधून समोर आले आहे. ‘अलबामा यूनिवर्सिटी’ने केलेल्या पहाणीनुसार एअर कंडीशनरच्या वापरामुळे लठ्ठपणा वाढतो. थंड ठिकाणी आपल्या शरिरातील उर्जा खर्च होत नाही. त्यामुळे शरिरातील चरबी वाढण्यास सुरूवात होते. पाहूया काय तोटे आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय करायला हवे त्याबद्दल
१. थंड वातावरणाचा परिणाम हा शरिरातील सांध्यांवर होत असतो. थंडाव्यामुळे गुडघे, हात, मान यांचे स्नायू आखडले जातात आणि ते दुखतात. त्यामुळे तुमच्या ऑफीसमध्ये सतत एसी चालू असेल आणि तिथे बसण्यावाचून तुमच्याकडे काही पर्याय नसेल तर एकाच जागी जास्त वेळ बसणे टाळा. शरिराच्या दुखत असलेल्या भागाची हालचाल करण्याचा प्रयत्न करा.
२. एसीमुळे डोळे कोरडे पडण्याचीही समस्या उद्भवू शकते. अशाप्रकारे डोळे कोरडे पडल्याने डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे, खाज येणे ही लक्षणे दिसून येतात. असे होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. या समस्येसाठी ओमेगा ३ ऍसिड अतिशय उपयुक्त असते. याशिवाय ठराविक वेळाने डोळ्यांची हालचाल आणि काही व्यायाम करावेत. तसेच डोळे वारंवार पाण्याने धुवावेत.
३. एअरकंडिशनरमुळे श्वसनाशी निगडीत त्रासही मोठ्या प्रमाणात उद्भवतात. एसीच्या फिल्टरमध्ये अडकणार्‍या घाणीमुळे हा त्रास होतो. तसेच याच्यातून येणार्‍या वार्‍याचा झोत जास्त असेल तरीही हा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे एसी कायम स्वच्छ राहील याची काळजी घ्यायला हवी तसेच एकदम एसीच्या खाली बसणे टाळावे. ज्यांना आधीपासून श्वसनाशी निगडीत त्रास आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
४. अधिक काळ एअर कंडीशनमध्ये बसल्यामुळे मांसपेशींवर ताण येतो व त्यामुळे डोके दुखण्याचा त्रास होण्यास सुरूवात होतो. ज्यांचे वारंवार डोके दुखते त्यांनी या कारणाचा अवश्य विचार करावा. आणि थंड वातावरणात अधिक वेळ बसणे टाळावे. याशिवाय ज्यांना हे वारे सहन होत नाही त्यांनी डोक्याला रूमाल बांधावा.