एलईडीद्वारे मासेमारी बंदीस केंद्राची तयारी : पालयेकर

0
109

मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी केंद्रीय मच्छीमारी मंत्री राधा मोहन सिंग यांची दिल्ली येथे काल भेट घेऊन एलईडी पद्धतीच्या मासेमारीवर बंदीची मागणी केली. केंद्रीय मंत्री सिंग यांनी एलईडी पद्धतीच्या मासेमारीवर बंदी घालण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच राज्यातील मच्छीमारी साधनसुविधांसाठी ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती मच्छीमारी मंत्री पालयेकर यांनी दिली.

मंत्री पालयेकर यांनी एलईडी, बुल ट्रॉलिंग या पद्धतीच्या मासेमारीचा विषय केंद्रीय मंत्री सिंग यांच्याकडे सविस्तरपणे मांडला. या पद्धतीच्या मासेमारीवर बंदी न घातल्यास मत्स्य उत्पादनात लवकरच घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयाकडे गांर्भियाने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. एलईडी, बुल ट्रॉलिंगवर बंदी लादण्यासाठी केंद्र सरकारला धोरण तयार करावे लागणार आहे.

राज्यातील मच्छीमारांकडून गेल्या दोन – तीन वर्षांपासून एलईडी पद्धतीच्या मासेमारीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारने एलईडी पद्धतीच्या मासेमारीवर बंदी लागू केली आहे. परंतु, शेजारील राज्यांनी अशा प्रकारच्या मच्छीमारीवर बंदी लागू केलेली नाही. केंद्र सरकारने बंदी घातल्यास ती सर्वत्र लागू होणार आहे.

केंद्र सरकारच्या नील क्रांती योजनेखाली मिळणार्‍या आर्थिक साहाय्यावर विचार विनिमय करण्यात आला आहे. राज्यातील मालीम, चोपडे, कुठ्ठाळी, कुटबण या चार मच्छीमारी जेटींचा विकास केला जाणार आहे.
दरम्यान, मच्छीमारी खात्यातर्फे ७ ते १० डिसेंबर दरम्यान ऍक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आले आहे.