एलईटीचा खतरनाक दहशतवादी अबू दुजान चकमकीत ठार

0
102

>> भारतीय जवानांची काश्मीरात कारवाई

जम्मू – काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथे काल भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्करे तैयबाच्या (एलईटी) सर्वात खतरनाक पाकिस्तानी दहशतवादी अबू दुजान याच्यासह दोन दहशतवाद्यांना ठार केले. या परिसरातील एका घरात हे दहशतवादी दडून राहिल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अबू दुजान याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. त्यामुळे त्याला पकडून देण्यासाठी १५ लाखांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी सदर भागाला वेढा घातला व दोन्ही दहशतवादी दडून राहिलेले घर स्फोटकांनी उडवून दिले. त्यात दोन दहशतवादी मृत्यूमुखी पडले. आणखी एका दहशवाद्याचा शोध चालू असल्याचे सांगण्यात आले. सदर घर उडवून लावण्याआधी दहशतवाद्यांकडून जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू होता. मात्र नंतर तो बंद झाला. ठार झालेला दुसरा दहशतवादी आरिफ लाहिरी हा भारतीय आहे. दोघांचेही मृतदेह मिळाले आहेत. या कारवाईआधी सदर घरातील महिलांना घराबाहेर जाण्यास सांगण्यात आले व नंतर घर उध्वस्त करण्यात आले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लष्कराने पुरेपूर काळजी घेतली होती. कारवाईआधी आजूबाजूच्या घरांमधील लोकांना अन्यत्र हलविण्यात आले. तसेच दहशतवादी लपलेल्या घरातील महिलांनाही बाहेर काढण्यात आले. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. तरीही जवानांनी लोकांना सुखरूप बाहेर काढले. रात्री सुरू झालेली ही मोहीम सकाळी ६.३० वा. संपली.
याआधी दुजान १२ पेक्षा अधिक वेळा लष्कराच्या हातातून निसटण्यात यशस्वी झाला होता.

जवानांवर लोकांची दगडफेक
भारतीय जवानांची दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू असताना सुमारे १०० निदर्शक जवानांवर दगडफेक करीत होते, अशी धक्कादायक माहिती लष्करी सूत्रांनी दिली. जवानांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला, तसेच गोळीबारही केला. त्यात दोघे जखमी झाले. दोघांनाही इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दक्षिण काश्मीरात इंटरनेट सुविधा खंडीत करण्यात आली आहे.