एम. करुणानिधी यांचे निधन

0
117

>> आज चेन्नईत अंत्यसंस्कार

>> मोदींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार

द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) सर्वेसर्वा आणि पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे एम. करुणानिधी यांचे काल वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. कावेरी रुग्णालयात त्यांनी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी अखेरचा श्‍वास घेतला. द्रविडी नेता म्हणून ओळखले जाणारे करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणातील एक मातब्बर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. दरम्यान, तामिळनाडूत ७ दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार असून आज राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार व स्मारकासाठी चेन्नईतील मरिना बीचवर जागा देण्यास राज्य सरकारने नकार दिला असल्याने वाद निर्माण झाला आहे.

करुणानिधी यांना मूत्रमार्गातील संसर्गामुळे कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वय अधिक असल्याने त्यांच्या तब्येतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत होता. त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. नंतर रक्तदाब नियंत्रणात आणण्यात डॉक्टरांना यश आले होते, तरी त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. सोमवारी त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. उपचारांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. काल त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आणि सायंकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. याबाबत काहीवेळातच कावेरी रुग्णालयाने अधिकृत बुलेटिन जारी करून करुणानिधी यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.

लेखक ते राजकारणी
पटकथा लेखक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. तामीळ भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळे ते चित्रपटांसाठी पटकथा लिहीत असत. त्यानंतर त्यांनी द्रविड आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून ६ दशके तामिळनाडूतील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यामुळे ‘द्रविड योद्धा’ अशी त्यांची ओळख होती. पेरियार व अण्णा दुराई यांच्याकडून त्यांना राजकारणातील धडे मिळाले. गेले काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. विशेष म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा असलेले करुणानिधी ५० वर्षे (तहहयात) पक्षाचे अध्यक्ष राहिले. गेल्या २७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी ठरलेल्या करुणानिधी यांनी तामीळ संस्कृती आणि द्रविडी अभियान यावर द्रमुकची पायाभरणी केली. पण हिंदीविरोधी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात ओळख दिली. १९७६ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर आला आणि दोन वर्षातच ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकच्या सरकारने कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजनाची योजना भक्कम करणे असे काही महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात पाऊल ठेवणार्‍या करुणानिधी यांनी ६ दशकांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच पराभव पाहिला नाही. करुणानिधी यांचे समर्थक त्यांना आदराने ‘कलाईनार’ (कलाक्षेत्रातील विद्वान) म्हणायचे.

चाहते बुडाले शोकसागरात
करुणानिधी यांची तब्येत चिंताजनक असल्याचे कळतात काल सकाळपासूनच कावेरी रुग्णालयाबाहेर द्रमुक कार्यकर्ते आणि करुणानिधी यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी करुणानिधी यांच्या निधनाचे वृत्त येताच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. करुणानिधी यांच्या निधनाने संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाले आहे.

राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा
करुणानिधी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. आज दिल्ली आणि देशातील सर्व राज्यांतील राजधानीतील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. चेन्नईमध्ये राजकीय सन्मानासह करुणानिधींवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय नेते अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार रजनीकांत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, भाजपाध्यक्ष अमित शहा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी करुणानिधी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

दिग्गज राजकारणी देशाने गमावला : मोदी
करुणानिधी यांच्या निधनामुळे मला अत्यंत दु:ख होत असून ते देशातील सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी होते. तळागाळातील लोकांशी जोडले गेलेले ते जनसामान्यांचे नेते होते. तामिळनाडू जनतेसाठी त्यांचे योगदान मोलाचे होते. देशाने एक ज्येष्ठ नेता गमावला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक संदेशात म्हटले आहे.