एमसीए, स्पोटर्‌‌सवीकचे विजय

0
119

केरळ दौर्‍यावर असलेल्या एमसीए, स्पोटर्‌‌सवीकने काल शुक्रवारी त्रिवेंद्रम येथील मंगलापुरम मैदानावर आपापले सामने जिंकत विजयाची नोंद केली. स्पोटर्‌‌सवीक अंडर १४ संघाने केसीए अंडर १४ संघाचा ४४ धावांनी पराभव केला तर अंडर १७ एमसीए संघाने केसीएला चार गड्यांनी हरविले. स्पोटर्‌‌सवीकने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १३१ धावा केल्या. त्यांच्याकडून रौनक सिंग (१३), शंतनू नेवगी (३०) व जार्विस फालेरो (नाबाद ४०) यांनी उपयुक्त धावा केल्या. यानंतर स्पोटर्‌‌सवीकने केसीएचा डाव २० षटकांत ८७ धावांत रोखला. केसीएकडून सिद्धार्थ शिवरामन (३४) व ऋषिकेश (१५) यांचा अपवाद वगळता एकालाही प्रभाव पाडता आला नाही. स्पोटर्‌‌सवीकतर्फे सोहम नाईकने १० धावांत २ गडी बाद केले. दुसर्‍या सामन्यात एमसीने केसीएचा डाव १७.४ षटकांत ५८ धावांत संपवला. एमसीएतर्फे शौनक चोडणकरने १४ धावांत ४ गडी बाद करत आघाडी फळी कापून काढली. यानंतर तुषार कुडणेकरने शेपटाला गुंडाळण्याचे काम करताना ४ धावांत ४ गडी टिपले. केसीएने यानंतर एमसीएची स्थिती ५ बाद १० अशी केविलवाणी केली. सुभव बोरकर (१९) व तुषार पटेल (११) यांनी डाव सावरताना १४.२ षटकांत संघाला विजय मिळवून दिला.