एफसी गोवाची ब्लास्टर्सवर मात

0
174
Eduardro Bedia Pelaez of FC Goa celebrates a goal during match 54 of the Hero Indian Super League between Kerala Blasters FC and FC Goa held at the Jawaharlal Nehru Stadium,Kochi India on the 21st January 2018 Photo by: Vipin Pawar / ISL / SPORTZPICS

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी एफसी गोवा संघाने केरला ब्लास्टर्सला २-१ असे हरविले. १३ मिनिटे बाकी असताना स्पेनचा मध्यरक्षक एदू बेदिया याने केलेला गोल निर्णायक ठरला.

नेहरू स्टेडियमवर ब्लास्टर्सला जोरदार पाठिंबा देणार्‍या सुमारे तीस हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत गोव्याने हा बहुमोल विजय मिळविला. स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमिनास उर्फ कोरो याने सातव्याच मिनिटाला गोव्याचे खाते उघडले होते. सी. के. विनीतने २९व्या मिनिटाला ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली होती. पूर्वार्धात १-१ अशी बरोबरी होती.गोव्याने दहा सामन्यांत सहावा विजय मिळविला. एक बरोबरी व तीन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांचे १९ गुण झाले. त्यांचा चौथा क्रमांक कायम राहिला. एफसी पुणे सिटी तिसर्‍या क्रमांकावर आहे. पुण्याचे ११ सामन्यांतून १९ गुण आहेत, पण पुण्याचा १० (२१-११) गोलफरक गोव्याच्या ७ (२४-१७) पेक्षा सरस आहे.

७७व्या मिनिटाला गोव्याला डावीकडे कॉर्नर मिळाला. त्यावर ब्रेंडन फर्नांडिसने चेंडू अचूकपणे क्रॉस मारला. मार्किंग नसल्याकारणाने बेदियाला मोकळीक मिळाली होती, याचा फायदा घेत त्याने हेडिंग करीत गोल नोंदविला.

गोव्याने सातव्याच मिनिटाला खाते उघडले. ब्रेंडन फर्नांडिसने डावीकडून अप्रतिम चाल रचत मंदारराव देसाई याला पास दिला. मंदारने कोरोकडे चेंडू सोपविला. बॉक्सच्या मध्यभागी असलेल्या कोरोने चेंडू मिळताच आधी फटका मारण्याची ऍक्शन केली, पण काही सेकंद थांबून किक मारली. त्यामुळे ब्लास्टर्सचा गोलरक्षक पॉल रॅचूब्का चकला.
२९व्या मिनिटाला ब्लास्टर्सने बरोबरी साधली. सियाम हंगलने हेडिंग करीत विनीतच्या दिशेने चेंडू मारला. त्यावर विनीतने उत्तम किकने चेंडू मारत गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याला चकविले.

दोन्ही संघांनी सुरवातीपासून सकारात्मक खेळ केला. चौथ्याच मिनिटाला गोव्याच्या मॅन्युएल लँझारोटेने डाव्या पायाने ताकदवान फटका मारला, पण चेंडू क्रॉसबारला लागून समोर पडला. ब्लास्टर्सच्या संदेश झिंगनने चपळाईने रिबाऊंडचा धोका टाळला. ११व्या मिनिटाला मंदारने डावीकडून आगेकूच करीत मारलेला चेंडू अडविताना रॅचुब्का अडखळला, पण त्याने चेंडू कसाबसा अडविला. १६व्या मिनिटाला झिंगनने ताकदीच्या जोरावर कोरोला रोखले. १८व्या मिनिटाला जॅकीचंद सिंगने क्रॉस पास दिला होता, पण तो चेंडू एका खेळाडूला लागून आल्यामुळे इयन ह्युमला ताकदवान हेडींग करता आले नाही. परिणामी कट्टीमनीला अचूक बचाव करता आला. २५व्या मिनीटाला हंगलने ताकदीने मारलेला चेंडू थोडक्यात क्रॉसबरला लागला. मध्यंतराच्या १-१ अशा बरोबरीनंतर उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडीसाठी जोरदार खेळ करणे अपेक्षित होते. ५०व्या मिनीटाला लालरुथ्थाराने लँझारोटेला धसमुसळ्या पद्धतीने रोखले. त्यामुळे गोव्याला फ्री-किक मिळाली. ती लँझारोटेनेच घेतली, पण त्याने नेटवरून स्वैर फटका मारला. ५२व्या मिनिटाला झिंगनने झेपावत हेडींग करीत विनीतकडे चेंडू मारला. विनीतने डाव्या पायाने फटका मारला, पण त्यात अचूकता आणि ताकद नव्हती. त्यामुळे कट्टीमणी चेंडू सहज अडवू शकला. ५८व्या मिनिटाला मंदारने अशक्यप्राय स्थितीत केलेला प्रयत्न फोल ठरला. ६४व्या मिनीटाला जॅकीचंदने उजवीकडून चार रचत विनीतला क्रॉस पास दिला. विनीतने त्यावर बायसिकल किक मारली, पण त्यात अचूकता नव्हती.

जमशेदपुर एफसीची
पिछाडीवरून मुसंडी
दिवसातील पहिल्या सामन्यात जमशेदपूरने दिल्ली डायनामोजचा ३-२ असा पराभव केला. कालू उचे (२०वे व २२वे मिनिट) याच्यामुळे दिल्लीने २-० अशी आघाडी घेतली होती. यानंतर जमशेदपूरकडून टिरी (२९वे मिनिट), युमनाम राजू (५४वे मिनिट) व त्रिनिदाद गोन्साल्विस (८४वे मिनिट) यांनी गोल केले.