एफसी गोवाची आज जमशेदपूरविरूद्ध लढत

0
141

>> अग्रस्थान पक्के करण्यासाठी हवी केवळ बरोबरी

इंडियन सुपर लीगमध्ये येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलात बुधवारी जमशेदपूर एफसी आणि एफसी गोवा यांच्यात लढत होत आहे. गोव्याला एक गुण मिळाला तर त्यांचे अग्रस्थान नक्की होईल. त्यामुळे एएफसी चॅम्पियन्स लीग मधील त्यांचे स्थान सर्वप्रथम नक्की होईल. गोवा हरला तर मात्र एटीके संघाला संधी मिळेल. त्यासाठी एटीके संघाला अखेरच्या सामन्यात बंगळुरु एफसीला हरवावे लागेल.
हंगामी प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांच्या गोवा संघाने अग्रस्थानाला साजेसा खेळ केला आहे. १७ सामन्यांत त्यांनी तब्बल ४१ गोल नोंदवले आहेत. आणखी दोन गोल केले तर ते स्वतःचाउंच्चाक मोडतील. २०१७-१८ मोसमात त्यांनी ४२ गोल केले होते. मिरांडा यांनी सांगितले की, सुरवातीपासून क्लबने काही उद्दिष्टे ठेवली होती. ह्यात एक अग्रस्थानाचे ध्येय होते. उद्याच्या सामन्यात अपेक्षित निकाल लागला तर आम्ही एक उद्दिष्ट साध्य केलेले असेल. सर्जिओ लॉबेरा यांना क्लबने अचानक निरोप दिल्यानंतरही गोवा संघाने एकाग्रता ढळू दिलेली नाही. त्यानंतर गोव्याने दोन्ही सामने जिंकले आहेत. जमशेदपूर संघ फॉर्म साठी झगडत असल्यामुळे गोव्याला आणखी एका विजयाचा आत्मविश्वास असेल.

गोव्याचे आघाडीकडे केलेल्या वाटचालीत फेरान कोरोमिनास आणि ह्युगो बूमुस यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. कोरोमिनास याने १३ गोल केले आहेत. ह्यात आणखी भर घालण्यासाठी तो प्रयत्नशील राहील. दुसरीकडे बुमुस याने कल्पक खेळ केला आहे. फ्रान्सच्या बूमुस याने सात गोलांच्या चाली रचल्या आहेत. याशिवाय नऊ गोल नोंदवित त्याने लीग दणाणून सोडली आहे. या जोडीला रोखणे जमशेदपूर संघाला अटळ असेल, पण जमशेदपूर संघाने क्लीन शिट राखून १२ सामने उलटले आहेत. त्यांचे प्रशिक्षक अँटोनिओ इरीओंदो यांनी सांगितले की, हा मोसम सर्वात खराब ठरला.

आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. फुटबॉल खेळात वेगवान निर्णय आणि स्वरूप पक्के करणे आवश्यक असते. ह्या मोसमात मिळालेले धडे क्लब साठी पुढील मोसमात सरस तयारीसाठी मार्गदर्शक ठरतील अशी आशा आहे. प्रत्येकाने जबाबदारी उचलून क्लबच्या हिताचा विचार केला पाहिजे. जमशेदपूर संघाला मागील पाच सामन्यांत विजय मिळेल नाही. १७ सामन्यांत १८ गुणांसह हा संघ आठव्या स्थानावर आहे. मोसमाची सांगता विजयाने व्हावी म्हणून ते कसोशीने प्रयत्न करतील.

सेरिटन फर्नांडिस मुकणार
एफसी गोवाकडून सलग ४६ सामने खेळलेला सेरिटन फर्नांडिस निलंबनामुळे आजचा सामना खेळू शकणार नाही. ४ फेब्रुवारी २०१८ रोजी सेरिटन शेवटचा सामना मुकला होता. यंदा चार यलो कार्डमुळे त्याला एका सामन्याचे निलंबन सोसावे लागणार आहे.

सलग पाचव्या विजयाची संधी
एफसी गोवाने यंदाच्या मोसमातील मागील चारही सामने जिंकली आहे. क्लबच्या इतिहासात सलग चार सामने जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. सर्वप्रथम २०१४ मोसमात गोव्याने लागोपाठ चार सामने जिंकले होते. यंदाच्या मोसमात हैदराबाद (अवे), ओडिशा (होम), एटीके (होम), चेन्नईन (अवे) यांच्याविरुद्ध गोव्याने सलग लढतींत विजय मिळविले आहेत.

जमशेदपूरविरुद्ध संघर्ष
एफसी गोवा संघाला सलग तीन लढतीत जमशेदपूरविरुद्ध विजय मिळविता आलेला नाही. मागील मोसमात आपल्या घरच्या मैदानावर जमशेदपूरने गोवा संघाचा ४-१ असा फडशा पाडला होता यानंतर फातोर्डा मैदानावरील लढत गोलशून्य बरोबरीत सोडवली होती. या मोसमात त्यांनी सर्जियो कॅस्टेलच्या गोलच्या जोरावर एफसी गोवावर १-० असा निसटता विजय संपादन केला होता.