एटीएम मशीन पळवून १८ लाख लुटले

0
142

>> आगरवाडा, पेडणे येथे धाडसी चोरी
>> एटीएम जंगलात दगडांनी फोडले

आगरवाडा, पेडणे येथे मुख्य रस्त्यापासून जवळ लोकवस्तीच्या ठिकाणी असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी जंगलात नेऊन फोडून त्यातील १८ लाख ३० हजार रुपये लुटण्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. या धाडसी चोरीमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. दरम्यान, या चोरीची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरटे दुचाकीने आल्याचा संशय व्यक्त केला आहे. पार्से येथे दुचाकी ठेवून चोरट्यांनी तेथे रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेली जीए – ११ – टी – १४४८ क्रमांकाची रिक्षा चावी नसताना सुरू करून मशीनकडे आले. त्यानंतर त्यांनी केवळ दोन लोखंडी हुकच्या आधारावर बसवण्यात आलेले एटीएम मशीन लोखंडी सळीच्या मदतीने हटवले आणि रिक्षात घातले. यानंतर चोरट्यांनी रिक्षातून एटीएम बोडकोधेनू डोंगरावर चिरेखाणी असलेल्या ठिकाणी नेले. तिथे भले मोठे दगड मशीनवर घालून ते फोडले व त्यातील पैसे लुटले. पैसे मिळाल्यानंतर त्यांनी रिक्षा मुख्य रस्त्यावर आणून टाकली व आपल्या दुचाकीवरून धूम ठोकली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंगरावर सापडले एटीएम
पार्से येथील ज्या रिक्षा मालकाची रिक्षा चोरण्यात आली होती त्याने सकाळी उठून पाहिले असता रिक्षा जाग्यावर नसल्याचे लक्षात आले. त्याने सैरभैर होऊन रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलीस आगरवाडा दिशेने जात असल्याचे पाहून त्याने पाठलाग करून रिक्षा आपली रिक्षा चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी कुणीतरी त्याची रिक्षा बोडकोधेनु रस्त्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस तिथे धावले. पोलिसांनी अंदाजानुसार एटीएम मशीनचा शोध घेतला असता फोडलेले एटीएम डोंगरावर सापडले.
या एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. त्यामुळे अज्ञात चोरट्यांना बिनधास्तपणे चोरी करणे शक्य झाले. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालेली असून त्यामुळे चोरटे सापडण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर, पोलीस अधीक्षक महेश गावकर, पेडणे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अनंत गावकर, सागर धाडकर यांनी धाव घेऊन पाहणी केली. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती स्थानिक बँक शाखेच्या अधिकार्‍यांना दिली. मात्र, बँकेचे अधिकारी घटनास्थळी वेळेवर पोचले नाहीत. एटीएम बसवणार्‍या एजन्सीचे अभियंता मणेरीकर आले. त्यांनी गोव्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्व एटीएम बसवण्याचा ठेका आपल्या कंपनीला दिलेला असल्याचे सांगितले. एटीएममध्ये धोक्याची सूचना देणारी व्यवस्था नसून सुरक्षा रक्षकही घटनास्थळी नव्हता. त्यामुळे चोरीला गेलेल्या सर्व पैशांची जबाबदारी एजन्सीची असेल. त्यामुळे बँकेला कोणतेही नुकसान होणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, हल्ली पेडणे तालुक्यात रात्रीच्या वेळी गस्त घालणे बंद झाले आहे. पूर्वी चोपडे जंक्शनकडे पोलीस तैनात असायचे. रात्री बारानंतर ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी केली जायची.