एटीएम ग्राहकांच्या हितरक्षणासाठी पोलीस खात्याची कडक नियमावली

0
150

पोलीस खात्याने एटीएमच्याद्वारे पैसे काढण्यात येत असल्याच्या ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन एटीएमचा वापर करणार्‍या ग्राहकांच्या हितरक्षणासाठी सुरक्षा उपाय आणखीन कडक करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. एटीएम ग्राहकांच्या कार्डांची माहिती स्किमर किंवा कॅमेर्‍याद्वारे चोरून परस्पर पैसे काढण्याची अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एका विदेशी नागरिकाला सुध्दा अटक केली होती. त्यामुळे बँकांना सूचनांचे कडक पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बँकेने एका जबाबदार अधिकार्‍यांची दररोज सकाळी आणि संध्याकाळी एटीएम तपासणीसाठी नियुक्ती करावी. एटीएम केंद्रात स्किमर किंवा ‘किपेड’ च्या वरच्या बाजूला छुपा कॅमेर्‍याबाबत नित्य पाहणी करावी. बँकेचे एटीएम ऑपरेशनची जबाबदार घेतलेल्या एजन्सीने एटीएममध्ये पैशांचा भरणा करताना तपासणी करून एटीएममध्ये स्किमर किंवा छुपा कॅमेरा नसल्याची खात्री करून घ्यावी, एटीएममध्ये चोवीस तास सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी. तसेच एटीएममध्ये गस्तीवरील पोलिसांना स्वाक्षरी करण्यासाठी एक नोंदणी बुक ठेवावा. नोंदणीकृत सुरक्षा कंपनीच्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, सुरक्षा रक्षकाकडे स्थानिक बँक व्यवस्थापक, पोलीस व पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आले आहे.