एक बोट दुसर्‍याकडे… चार बोटं आपल्याकडे…

0
1380

– श्रेयस गावडे, मडगाव

एकदा बाबू आपल्या बाबांना विचारतो, ‘‘बाबा, अंगठ्याजवळच्या बोटानं देवाला गंध लावायचं नाही असं आजोबा का म्हणतात? आणि जपमाळ ओढतांनाही ते कधी त्या बोटाने मणी ओढत नाहीत, मी पाहिलंय.. असं का?’’
नऊ वर्षाच्या बाबूचं हे अचूक निरीक्षण पाहून बाबा मनात प्रसन्न झाले अन् म्हणाले, ‘‘अरे त्या बोटानं श्राद्ध वगैरे करताना गंध लावतात. कारण ते बोट पूर्वजांचं मानलं जातं. मधलं बोट आपल्यासाठी तर करंगळीजवळचं बोट, ज्याला ‘अनामिका’ म्हणतात ते देवासाठी वापरण्याची पद्धत आहे. हे तुला सहज गंमत म्हणून सांगितलं. पण हे अंगठ्याकडचं बोट, ज्याला ‘तर्जनी’ म्हणतात ते बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीला उद्देशून दाखवलं जातं. कधी गुण दाखवण्यासाठी तर कधी दोष दाखवण्यासाठी. पण आज काळ इतका बदललाय की दोषच जास्त दाखवले जातात. उदा…. ‘तो माणूस कंजूस आहे’, ‘त्या मुलानं परिक्षेत कॉपी केली’, ‘ती बाई दिसते ना तिनं ती काम करते त्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला!’ अशाप्रकारे हे बोट म्हणजे तर्जनी शक्यतो दोष दाखवण्यासाठीच वापरतात. म्हणून देवाच्या पूजेत ते न वापरण्याची पद्धत पडली असेल असं मला वाटतं!’’बाबूला दोन गोष्टींचं आश्चर्य! पहिली गोष्ट म्हणजेच बाबांनी पहिल्यांदा आपल्या प्रश्‍नाचं इतकं मोठं उत्तर दिलं. दुसरी म्हणजे बोटाविषयी नवीनच माहिती त्याला मिळाली. दुसर्‍या दिवशी शाळेत त्यानं मोठ्या रुबाबात बाबांना विचारलेला प्रश्‍न आपल्या मित्रांना विचारला. कोणालाही उत्तर देता आलं नाही म्हणून मोठ्या गर्वानं त्यानं बाबांनी सांगितलेली सर्व माहिती शब्दन् शब्द त्याच्या मित्रांना सांगितली. त्यावर मधू म्हणाला, ‘‘माझे बाबा तर नेहमी एक चिनी भाषेतली म्हण सांगतात… ‘‘दुसर्‍याकडे त्याचे दोष सांगण्यासाठी एक बोट पुढे कराल तर लक्षात ठेवा, इतर चार बोटं ही आपल्याकडेच वळलेली असतात!’’
म्हणजे, ‘इतरांचा जो दोष दाखवाल, तसला दोष चार पटीनं आपल्यातच असतो!’ किती खरंय ना हे! उदा. आजकाल सगळीकडे ऐकू येणारी तक्रार आहे. मुलांकडे बोट दाखवून म्हटलं जातं, ‘यांच्यावर संस्कार नाहीत’. मोठ्यांना समजलं पाहिजे की चार बोटं तर आपल्याकडेच वळलेली आहेत. म्हणजे आपल्यावरील संस्कार कुठे टिकलेले आहेत? मुलं जन्मतात तेव्हा एका कोर्‍या कागदाप्रमाणे असतात. घरातील अन् समाजातील मोठ्या मंडळींच्या हातात असतं, त्या कागदावर कोणते रंग भरायचे?… मोठ्यांचं किंवा आईवडिलांचं वर्तन पाहूनच मुलं शिकतात. त्यात मुलांचा काय दोष? आपण नको का नीट वागायला? समाजातील सारा भ्रष्टाचार काय मुलांनी केला आहे?
तसेच अनेकदा ऐकू येणारी वाक्ये…
तरुणांना शिस्त नाही… वडील मंडळींना आहे का?
लोक स्वच्छता पाळत नाहीत… मी पाळतो का?…
सून खूप आळशी आहे… सासुबाई उद्योगी?…
कोणीही माझं ऐकत नाही… मी इतरांचं किती ऐकतो?…
मुलं उलट उत्तरं देतात… मी त्यांच्याशी नीट बोलतो का?…
तू माझ्याशी नीट वागत नाहीस… मी इतरांशी कसा वागतो?…
वरील विचारच आपल्याला स्वतःतील दोष सुधारण्यास उपयोगी पडतील. या बाबतीत ही मराठीतली म्हण अगदी फिट्ट बसते!! – ‘दुसर्‍यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही!’ अर्थ हाच!
हं, आपण एक मात्र लक्षात ठेवू या… या अंगठ्याजवळच्या बोटाचा, तर्जनीचा मात्र एक व्यावहारिक उपयोग आहे ना… दिशा दाखवण्यासाठी!
आपण बघतोच ना- अनेक सार्वजनिक ठिकाणी ते बोट चित्रात दाखवून लिहिलेलं असतं- ‘प्रसाधनालयाकडे-’. हा या बोटाचा व्यावहारिक उपयोग. ‘इन्डेक्स फिंगर – दिशादर्शक बोट’ म्हणून आहेच की. एकूण काय तर पूर्ण निरुपयोगी, नकारात्मक, निषेधात्मक असं काहीच नसतं. त्यात गुणही असतात. काळ्या ढगाला रुपेरी किनार असतेच ना?
पुरुषप्रधान समाजात नेहमी स्त्रियांना नावं ठेवली जातात. ‘स्त्री अशी अन् स्त्री तशी… आता स्त्रिया विचारायला लागल्याहेत… तुम्ही पुरुष काय कमी… असे अन् तसे असता?’ अशा एकमेकांना दोष देण्यानं काय साधणार? चिनी म्हणीची शिकवण ही की…
‘आपल्यातील’ दोष सुधारू या. ते सुधारले की मग दुसर्‍यांचे दोष दाखवावेसे वाटणारच नाहीत. उगीच कशाला दोष दाखवणारं बोट (ऍक्युझिंग फिंगर) दुसर्‍याकडे रोखायचं? त्यापेक्षा त्याला दोष सुधारायला मदत करू या. बोटं एकमेकांकडे दाखवण्यापेक्षा एकमेकाच्या हातात हात धरून पुढे जात राहू या… प्रगती करत राहू या. ‘‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ!’’ हेच खरे, हो ना?