एक डाव पत्त्यांचा

0
1524

 – संदीप मणेरीकर

इस्पिक, बदाम, चौकट किलवर
एक्का, गुलाम, अन् राणी-राजा
बावन्न पानांचे धमाल खेळ
बैठ्या खेळांचा हाच खरा राजा!

‘अरे जरा बैठक घाल रेतिनशेचारची’ दादांनीमला सांगितलं आणि नेहमीप्रमाणे आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत बैठक घालण्यासाठी गेलो. तळाला एक जमखान, त्यावर चौरस घड्या केलेल्या दोन चादरी, त्यावर आणखी एक लहान घडी केलेली शक्यतो गुळगुळीत चादर (पत्त्यांचे कोपरे अडकून पत्ते मोडू नयेत म्हणून गुळगुळीत) अशी एकंदरीत बैठक. तिनशेचार हा आमच्याकडे त्या परिसरात ‘मोठ्यांनी’ खेळण्याचा पत्त्यांचा एक खेेळ आहे. आम्ही लहान असताना तो फक्त बघायचा, बैठक घालायची, कोणाला पाणी हवं तर आणून द्यायचं एवढंच करायचं. नवीन करकरीत पत्ते आणून दादा, काका, आमचे चुतलभाऊ वगैरे तो खेळ खेळायचे. ते पत्ते जुने झाले की आम्हांला मिळायचे. मग आम्ही मेंढीकोट, सातकी, असले कसले तरी खेळ खेळायचो. बैठक घातल्यानंतर आमच्या घरी शेजारच्या घरातील आमचे चुलतभाऊ यायचे. काका घरी असायचे. दादांना तर मोठी हौस. त्यामुळे बहुतेक तिनशेचार हा खेळ व्हायचा. तिनशेचार या खेळाची मजा काही वेगळीच आहे. खरं तर इतर खेळात हुकमी एक्का हा मोठा असतो. त्यामुळे हुकमी एक्का हा शब्दप्रयोग मराठी भाषेत रुढ झालाय, पण तिनशेचार हा खेळ त्याला अपवाद आहे. कारण या खेळात एक्का हा तब्बल तिसर्‍या स्थानी जातो. या खेळात फक्त चोवीस पानं असतात. नववीपासून पुढची. यात गुलाम सगळ्यात मोठा. त्यानंतर नववी, मग एक्का, दश्शी, राजा व राणी अशी एका प्रकारची सहा अशी चार प्रकारची मिळून चोवीस पानं असतात. प्रत्येकाला गुण (मार्क्स) असतात. गुलामाचे ३०, नवव्वीचे २०, एक्क्याचे ११, दश्शीचे १०, राजा ३ व राणी २ असे मिळून एकूण ७६ एकाचे असे चौघांचे मिळून होतात ३०४. म्हणून या खेळाला तिनशेचार असं म्हणतात. या खेळात प्रत्येकाला संधी असते प्रत्येक वेळी. त्यामुळे खरं तर मजा येते हा खेळ खेळताना. तुम्हाला एवढे मार्क्स आपण मागतो म्हणून मागायची संधी असते. व तेवढे तुमच्या भिडूंनी व तुम्ही ते करायचे असतात. ते नाही झाले तर तुम्हांला काळी पानं आणि जर तेवढे झाले तर तांबडी पानं अशी दिली जातात.
याला खेळाडू सम संख्येने लागतात. पण किमान चार आणि जास्तीत जास्त आठजण असावेत. त्यापेक्षा जास्त असले तर मजा येत नाही. आठ किंवा सहा जणांच्या खेळातच खरी रंगत असते.
हळूहळू आम्हीही मोठे होऊ लागलो आणि एक-दोन डाव काका, दादांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत खेळायला बसू लागलो. कधीतरी एखादा भिडू कमी पडू लागला तर भाई (मोठा भाऊ) किंवा मी खेळायला बसू लागलो. त्यातही भाई माझ्यापेक्षा खूप लवकर खेळायला बसू लागला. माझ्यापेक्षा तो मोठा असल्याने त्याला लवकर ही संधी मिळाली होती. परंतु आम्ही दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत खरं तर सावंतवाडीहून वर्षा, पराग, चतुरा, मनोज ही मंडळी आली की मी, भाई, माझी बहीण संध्या आणि माझे काका अशी सगळी मंडळी मिळून आम्ही मस्तपैकी बहुतेक आमच्या घरी मेंढीकोट हा खेळ खेळत असू. आठ किंवा सहा जणांचा गट जमून आम्ही कितीही वेळ खेळत बसू. वर्षा-परागच्या घराकडून हाका सुरू झाल्या जेवणासाठी की आम्ही मग आवरतं घेत असू. दुपारनंतर खेळायला बसायचं, त्यानंतर संध्याकाळ झाली की रस्त्यावर फिरायला जाणं, त्यावेळी अंताक्षरी खेळणे किंवा गप्पा मारणे, किंवा लपाछपी खेळणं हे आमचे खेळ असायचे. प्रत्येक दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत आमचा हा ठरलेला नियम होता.
मेंढीकोट हा तसा प्रचलीत खेळ आहे. पण सातकी नावाचा अत्यंत सोपा खेळ आहे. त्या खेळात चार, सहा किंवा आठ खेळाडू, दोन, तीन किंवा चार भिडू आणि सात हात करायचे एवढचं. त्यात ज्याचे पहिल्यांदा सात हात होतील तो जिंकला. पण सलग सात हात झाले तर प्रतिस्पर्ध्यावर कोट होतो. तसं पाहिलं तर पत्त्याच्या या खेळात एकट्यानेही खेळता येतं. तसंच दोघांनी, तिघांनी, चौघांनी असं खेळता येतं. त्यामुळे अगदीच एकट्याला कंटाळा आला तर पत्त्यांचा डाव मांडायलाही हरकत नाही. एकट्यानं खेळायचा डाव म्हणजे त्याला जजमेंट म्हणतात. पिसल्यानंतर तीन तीन पत्ते हातात काढून घेऊन त्यातील शेवटचा पत्ता जुळवत जायचं. सध्या तो संगणकावर स्पायडर म्हणून प्रसिद्ध आहे. पण पत्ते हातात घेऊन खेळण्याचा आनंद या संगणकावरील पत्त्यांत येत नाही. सात-आठ हा दोघांनी खेळण्याचा खेळ आहे तर पाच तीन दोन हा तिघांनी खेळण्याचा खेळ आहे. चौघांनी खेळण्यासारखे खूप खेळ आहेत त्यात मेंढीकोट, लॅडीज, सातकी किंवा अगदी वर सांगितलेला तिनशेचार हा खेळही चालतो. त्यानंतर सहा जणांचा मेंढीकोट, सातकी किंवा तिनशे चार, हेच खेळ आठजणांतही चालतात. तसंच इतर खेळ आहेत म्हणजे गाढवपिशी, झब्बू गाढव किंवा गुलाम चोर, नॉड ऍट होम, किंवा तसंच अगदी आपली बुद्धिमत्ता किती आहे किंवा स्मरणशक्ती किती आहे हे दाखवणारा मेमरी हा खेळ. खरं तर बर्‍याच लोकांचं असं म्हणणं आहे की, पत्ते खेळून काहीच साध्य होत नाही. पत्ते हा केवळ वजाबाकीचा खेळ आहे. यात केवळ गमावणं असतं. कमावणं काहीच नाही. मात्र मेमरी हा पत्त्यांचा खेळ याला अपवाद आहे. कारण या खेळाद्वारे बुद्धिमत्तेचा, स्मरणशक्तीचा कस लागतो. तसं पाहिलं तर सर्वच खेळांत बुद्धिमत्तेचा कस लागत असतो. त्याला पत्त्यांचा डावही अपवाद नाही. पत्ते म्हणजे केवळ जुगार असा कित्येकांचा समज आहे. मात्र या वरील खेळांत कुठेच जुगाराचा मागमूसही नाही. केवळ मानसिक समाधान किंवा एक टाइमपास म्हणून खेळले जाणारे कितीतरी डाव यात असतात.
आम्ही कितीतरी दिवस असे खेळ खेळत आलेलो आहोत. आज मात्र संगणक युगात हे खेळ लुप्त होताहेत असं वाटू लागलय. आमच्या गावी कोणाकडेही मंगळागौर असली की रात्री महिला मंडळ फुगडी किंवा अंताक्षरी खेळून जागवत असत. आणि आम्ही पुरुष मंडळींनी पत्त्यांचे डाव मांडून रात्र जागवायची असं ठरलेलं समीकरण होतं. आमच्या आसपासच्या घरांत किंवा अगदी घोटगेवाडीवरही दोन किमी चालत जाऊन तिथे आम्ही अशा ह्या तिनशेचार खेळाची मजा लुटलेली आहे. केवळ मंगळागौरच नव्हे तर आमचे खापर पणजोबांनी संन्यास घेतलेला होता. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी आमच्याकडे साजरी केली जाते. त्यामुळे त्या दिवशी रात्रभर विविध कार्यक्रम होतात. त्यात पूजा, भजन, कीर्तन, संगीत जलसा आणि यांच्यासोबतच पत्त्यांचे डाव यातही तिनशेचार. घोटगेवाडी येथे आमच्या मूळ घरी लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमातही आम्ही संध्याकाळी पूजा, कीर्तन, भजन झाल्यानंतर तिनशे चारचे डाव होत यात आम्ही तर बर्‍याच वेळा रात्रभर जागून पहाटे आम्ही घरी येण्यासाठी निघत होतो.
बोरीलाही माझ्या मामाच्या घरीही असेच तिनशे चारचे डाव रंगतात. तिथेही मामासोबत आम्ही मयुरेश, परेश, दत्तप्रसाद, श्रद्धा, कीर्ती यांच्यासह तिनशेचारचा खेळ खेळत होतो. मेंढीकोट व सातकी या दोन खेळाचे धडे मी इथेच गिरविले आहेत. तिथे तर गणेश चतुर्थीच हवी किंवा कुठला सण हवा असं काही नाही. कोणीही पाहुणे आले व त्यांना त्यात रस असला की तिनशे चारचा डाव खेळणं सुरू होतं. अर्थात आमच्या घरीही असे कोणी पाहुणे आले व त्यांना पत्ते खेळण्यात रस, आवड आहे असं झालं की दादा, ‘बैठक घाल रे’ अशी ऑर्डर सोडायचे व इतर कुठल्याच बाबतीत पटकन न ऐकणारा मी या बाबतीत मात्र चटकन जाऊन बैठक घालत असे. बोरीला तर एकदा गणेश चतुर्थीत पाचव्या दिवशी विसर्जन झाल्यानंतर जेवण करून आम्ही चौघजण (मी, प्रार्थना, कीर्ती व मंदार) तिनशेचार खेळायला बसलो ते सकाळी सहा वाजेपर्यंत खेळत होतो.
आज मात्र हे पत्ते किंवा असा ग्रुप होणं कठीण होऊन बसलं आहे. प्रत्येकजण आपापल्या युगात वावरत आहे. पत्त्यांनी एकत्र येऊन सुखदुःखं वाटून घेतली जात होती. मुख्य म्हणजे माणूस माणसाला मिळत होता. आज संगणक युगात कोणीच कोणाच्या घरी जात नाही. एकलकोंडेपणा वाढत आहे. संगणकावर सगळे गेम्स मिळतात; पण माणूस मिळत नाही. सुखदुःख वाटून घेण्याचाही त्यामुळे प्रश्‍न येत नाही. एकमेकांच्या घरी येणं-जाणं होत होतं. आज आमच्याकडे सगळे सण होतात पण पत्ते मात्र कुटले जात नाहीत. कारण प्रत्येकाला उद्याची चिंता लागलेली असते. मुळात त्या खेळातील इंटरेस्ट गेलेला आहे. बैठ्या खेळांच्या प्रकारातील हा सर्वोत्तम खेळ प्रकार आहे. मात्र तरीही त्याकडे आजच्या पिढीचेही दुर्लक्ष होत आहे. केवळ याच नव्हे तर कबड्डी, विटी दांडू, लगोरी, लपाछपी असले खेळ आज खेळले जात नाहीत. त्यासाठी मुलं एकत्र यायला हवीत पण तीही येत नाहीत.
खरं तर जीवन हा सुद्धा पत्त्यांचा एक खेळ आहे. हातात येतील ते पत्ते घेऊनच तुम्हां-आम्हां सगळ्यांनाच खेळावं लागतं. पत्ते हे जीवनाच्या खेळाचं खरं प्रतिक आहे. उद्याच नव्हे तर पुढच्या क्षणी काय होणार हे माहित नसतं. पत्त्यांचं तसंच असतं. हातात काय येणार हे माहीत नसतं. पण खेळायचं तर असतं. आता चांगले नाही आले पत्ते तर पुढच्यावेळी तरी येतील हीच आशा असते. तसंच आज नाही पण उद्या तरी चांगला दिवस येईल याच आशेवर आपण जगत असतो.
पण आज मात्र हा पत्त्यांचा खेळही हळूहळू लोप पावत आहे. संगणक युगात संगणक गेम्सचं पेव फुटलं आहे. आणि माणूस माणसापासून दूर जाऊ लागला आहे.