एक अविस्मरणीय दिवस.. अरुणाताईंसोबत

0
407
  •  तन्मयी देवीदास सहकारी
    (बिंबल, कुळे)

ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा मराठी अकादमीची लेखन कार्यशाळा नुकतीच पणजीत झाली. त्यात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने अरुणाताईंच्या मार्गदर्शनपर विचारांचे वेचलेले हे सुवर्णकण..

गोवा मराठी अकादमीच्या लेखन कार्यशाळेविषयी समजले आणि काहीही झाले तरी या दिवशी इतरत्र कुठेही न जाता ह्या कार्यशाळेत सहभागी व्हायचे हे ठरवले. रम्य वातावरणात एक डिसेंबरचा तो रविवारचा दिवस उजाडला आणि उत्साहाच्या भरात माझ्यासारख्याच इतर मित्र मैत्रिणींनी पणजी गाठली. सकाळी साडेनऊच्या दरम्यान कार्यशाळेच्या मार्गदर्शक आणि यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व सुविख्यात कवयित्री डॉ. अरुणाताई ढेरे सभागृहात आल्या. एक प्रसन्न, हसरा चेहरा. इतक्यात माझेच अहोभाग्य की, सौ. दीपाताई मिरींगकरांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. तो अमूल्य क्षण मी आयुष्यात विसरायचे नाही.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आम्ही सर्वजण अरुणाताईंचे शब्द कानात साठविण्यासाठी स्थानापन्न झालो होतो. अरुणाताई आपल्या भावमधुर शब्दांत बोलत्या झाल्या.

‘पुण्यातील मोठ्ठा दिंडीदरवाजा असलेला नदीकाठचा लोककल्याणवाडा. मागे विष्णूचे मंदिर, त्याच्या बाजूलाच औदुंबराचे झाड, त्या वाड्याच्या चौथ्या मजल्यावर राहणारे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आणि अशा ह्या निसर्गसंपन्न साहित्य वाचन लेखन ह्या सर्वच गोष्टींना पोषक असलेल्या त्या १८ बिर्‍हाडांच्या वाड्यात अरुणाताईंचे बालपण गेले. मराठीतील ज्येष्ठ संशोधक व लेखक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्यासारखे वडील व आई ह्यांच्या सुसंस्कारांमुळे अरुणाताई यशोशिखर गाठू शकल्या. त्यांची आई अतिशय हुशार. काम करता करता मोरोपंतांच्या केकावली, संस्कृत श्‍लोक, स्तोत्रे म्हणणारी, तर वडील संस्कृतीप्रेमी, ग्रंथप्रेमी. ह्यामुळेच अरुणाताईंना लेखनाचा, वाचनाचा वारसा लाभला आणि त्या विपुल साहित्यनिर्मिती करू शकल्या. ‘लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य भेटे’ ह्या उक्तीनुसार आमचे वडील आपल्याला ‘चल उठ, अभ्यासाला बैस म्हणत कधीच उठवत नसत. याउलट ‘‘आकाशात शुक्राचा तारा किती सुंदर दिसतोय! तुला बघायचाय? तर चल, आपण दूध आणायला जाऊ’ असे म्हणत ते आम्हाला उठवायला यायचे.’’ अरुणाताई भावमधुर वाणीत एक एक अनुभव शब्दबद्ध करीत होत्या. त्यांचे ते शब्द आमच्या आत आत झिरपत होते. डोळ्यांवाटे पाझरत होते.

नावीन्याचा ध्यास घ्या

नावीन्याचा ध्यास घेत आपण संशोधनपर वृत्तीतून एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला की, ती गोष्ट उत्तमरीत्या घडून येते व यश हे मिळतेच असा विश्वास अरुणाताईंनी यावेळी व्यक्त केला. लहानपणापासून आपण जे ऐकतो, पाहतो, वाचतो, तेच आपल्या लेखनामधून पुनःनिर्मित होत जाते, त्यामुळे जितके आपण वेगवेगळे वाचू आणि त्यातून आपापल्या पिंड – प्रकृतीनुसार आपण जे उचलू, तेच आपल्या लेखणीद्वारे कागदावर उतरत असते, हे त्यांनी आरंभीच स्पष्ट केले. लेखन करताना आपल्या मागे आपला भूतकाळ असतो. पूर्वसंचिताचे देणेही असते. पण त्याचबरोबर आपल्यामधील लेखकामागे असलेला संवेदनशील सह्रदयी माणूसही असतो, हे त्यांनी अतिशय सुंदररित्या सांगितले.

लेखकाचे असामान्यत्व

प्रत्येक लेखक इतर माणसांसारखे सामान्य जीवनच जगत असतो, पण त्याला लाभलेल्या प्रतिभाशक्तीमुळे त्याच सामान्य जीवनातील अथवा सामान्य गोष्टीमधील नावीन्य त्याला दिसून येते आणि तेच तो कल्पनेच्या आधारे शब्दांत मांडत असतो, जे इतरांना भावते हे स्पष्ट करताना त्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘उठा उठा चिऊताई’ ह्या कवितेचे उदाहरण दिले.

कवितेचा विषय आणि आशय निवडताना साध्या सोप्या शब्दांचेच उपयोजन करणे योग्य असते, असे त्यांनी इथे नमूद केले. कविता लिहिण्याआधी अभ्यास आणि कारागिरी ह्या दोन्ही गोष्टींना महत्त्व देणे अत्यंत जरुरी असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या काळात कविता लिहिताना गण, मात्रा, वृत्त ह्यांचा सखोल अभ्यास केलाच पाहिजे असे नाही, पण त्याउलट तुम्ही मुक्तछंद, बांधीव कविता करत असाल, तर ती सुद्धा नियमबद्ध असेल ह्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पुनरावलोकन गरजेचे

पुढे कुसुमाग्रजांच्या ‘आगगाडी व जमीन’ ह्या कवितेचे उदाहरण देत त्यांनी कवितेतील अर्थाचे, आशयाचे तिच्या आकृतिबंधाशी, रचनेशी कसे नाते असते हे अतिशय सोप्या पद्धतीने वर्णन करून सांगितले. आपणच आपली कविता पुन्हा पुन्हा वाचून पाहिली की त्यातील गुण – दोष आपल्याला कळतात हे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, गदिमा असोत वा शांता शेळके, ह्या दिग्गज कवींच्या कवितांमागे त्यांचा जीवनानुभव, त्यांचे चिंतन, त्यांच्या भावनांची समृद्धी, त्यांना त्यांनी पाडलेले पैलू ह्या सगळ्या गोष्टी असतात हे सर्वच नवोदित लेखकांनी लक्षात घेतले पाहिजे.

मोजक्याच शब्दांमध्ये एखादी गोष्ट सांगणे ह्यामध्येच कवीची हातोटी असते हे सांगताना त्यांनी पु. शि. रेगे यांच्या ‘त्रिधा राधा’ कवितेचे उदाहरण दिले. कल्पनाशक्ती आणि शब्द या दोहोंच्या संगमातून कविता जन्माला येत असते, त्यामुळे कवितेतील कल्पनाशक्तीचे स्थान अधोरेखित करताना त्यांनी कवितेमधील उपमा, प्रतीके यांचा वापरही योग्य तर्‍हेने करा हे सांगण्यावर भर दिला. काव्यलेखनाबरोबरच त्यांनी नाट्याविषयीही मार्गदर्शन केले.

अरुणाताईंनी लहानपणापासून पाहिलेले सण – उत्सव, गायलेली हादग्याची, पंचमीची गाणी, तिथल्या मारुती मंदिरात होणारी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची ऐकलेली कीर्तने, दारात येणार्‍या पिंगळा, वासुदेव, भिक्षेकरी यांच्या तोंडून ऐकलेल्या ओव्या, गीतांमुळे फार मोठे अनुभवांचे गाठोडे त्यांना मिळाले हे सविनय सांगत त्यांनी जास्तीत जास्त अनुभव घेण्यासाठी उद्युक्त व्हा असे सांगितले. अनुभवाच्या जातकुळीवरून लेखनाचा कुठला घाट आपण निवडावा हे त्या त्या लेखकाने निश्‍चित करणे फार महत्त्वाचे आहे हेही त्यांनी पुढे नमूद केले.

वाचनाची कास धरा

प्रत्येक लेखकाच्या बरोबर त्याची वाचक म्हणूनही भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे विपुल वाचनातूनच विपुल लेखन घडत असते, ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली.
थोडक्यात, साहित्य लेखन म्हणजे निराळे असे काही नाही, तर एखाद्या दैनंदिन अनुभवातील सूचित केलेला वेगळेपणा होय. अरुणाताई न थांबता बोलत होत्या आणि आम्ही सारेच गुंग होऊन गेलो होतो.

मराठी भाषेतून लेखन करताना शब्दांकडे आपण काळजीपूर्वक पाहिले पाहिजे ह्या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. छोटीशी व्याकरणातील, शुद्धलेखनातील चूक मोठा अनर्थ घडवू शकते, त्यामुळे शब्दांचा उपयोग योग्य तर्‍हेने करण्यावर भर दिला पाहिजे हे त्यांचे म्हणणे त्यांनी विविध अनुभवकथन करत रंजकपणे पटवून दिले. पुढे दासबोध, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आपण डोळसपणे वाचले तर आजच्या धकाधकीच्या जीवनात ते लाइफ मॅनेजमेंटचे उत्कृष्ट ग्रंथ होऊ शकतात हे त्यांनी सूचित केले.

भाषेकडे डोळसपणे पाहा

कोणतेही ग्रंथ वाचताना भाषेकडे डोळसपणे पाहत त्यातील अर्थच्छटा जाणून घेऊन लेखन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सदोदित कौतुक, मान-सन्मान याची अपेक्षा न ठेवता भाषेत वेगवेगळे प्रयोग आपण केले, तर ते हितकारक ठरतात हे सांगत असताना त्यांनी नुकत्याच मॅक्समुलर भवनच्या आधारे केलेल्या प्रकल्पातील कामाविषयी माहिती दिली. ‘आपला आवडता लेखक’ असे आपण सांगत असताना त्या लेखकाविषयी आपल्याला संपूर्ण माहिती असायला हवी. झोपेतून उठवून जरी विचारले, तरीही आपल्याला आपल्या आवडत्या साहित्यकृतीविषयी, लेखकाविषयी सांगता आले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आम्हाला जागरूक बनविले. आपण जसे आपल्या शरीराचे बाह्य सौंदर्य खुलविण्यासाठी प्रयत्नरत असतो, तद्वत आपले लिखाणही सुंदर व्हावे म्हणून योग्य ते कष्ट आपण घेतले पाहिजेत ह्यावर त्यांनी जोर दिला.

पुढे ललित लेखनाविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी ललित लेख म्हणजे भेळ असते असे सांगत त्याचा आवाका जरी छोटा असला, तरी त्यामध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या असतात ही गोष्ट स्पष्ट केली. ललित लेखन करण्याची प्रत्येक लेखकाची शैली असते व लिहिता लिहिता ती प्रगल्भ होत जाते हे सांगत असतानाच त्यांनी वैचारिक लेखांविषयीही मार्गदर्शन केले. वैचारिक लेखांमधून आपण वाचकाचे मन घडवत असतो, त्यामुळे असे लेख लिहिण्याआधी लेखकाने आपले मत सगळ्या कंगोर्‍यांवर घासून घेणे अभिप्रेत असल्याचे त्या म्हणाल्या. शेवटी आपल्या आजूबाजूला असलेल्या वास्तवामधूनच आपले लिखाण समृद्ध होत जाते, त्यामुळे समाजातील कोणत्याही गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे लेखकाला जमले पाहिजे, ह्या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला.

विचार जाज्वल्य हवेत

न्यायमूर्ती रानडे यांनी गोपाळकृष्ण गोखले यांना एकदा केलेला उपदेश – ‘गोखले, लक्षात ठेवा. तुमचे विचार जाज्वल्य हवेत! भाषा जाज्वल्य असो किंवा नसो’ हे सांगत त्यांनी पहिल्या सत्राचा समारोप केला.
भोजनोत्तर सत्रात अरुणाताईंनी कविता, ललित लेख ह्यासंदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्यकृती सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले व त्यांच्यासंबंधी मार्गदर्शन केले.

आपल्यावर आपल्या वाङ्‌मयीन परंपरेचे ऋण आहे, त्यामुळे उपस्थित सर्वांनाच अरुणाताईंनी गोमंतकीय वाङ्‌मयीन परंपरा जाणून घेण्याचे आवाहन केले. माणूस जेवढे वाचन करतो, तेवढा तो समृद्ध होतो, समंजस होतो हे सांगत असतानाच त्यांनी लेखकानेही आपल्या लेखनाच्या कक्षा रुंदावत राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले. अशा प्रकारे कक्षा रुंदावल्याने प्रगल्भता येते ह्यावर त्यांनी प्रकाश टाकला. आपला अनुभव जितका मोठा, आपली आयुष्याविषयीची समजूत जितकी मोठी, आपले विचार जेवढे विस्तारलेले, आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी जेवढी समंजस, तेवढेच आपल्या शब्दांचे किंबहुना लेखनाचे मोल वाढत जाते, असे सांगत त्यांनी समारोप सत्रातील छोटेखानी भाषण आवरते घेतले.
असा हा संपूर्ण दिवस चिरकाल स्मरणात राहण्याजोगा व्यतीत झाला. उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनरूपी लेखणीत अरुणाताईंनी चैतन्यरुपी शाई सोडली ह्यात दुमत नाही!