एक अनोखी मैत्री

0
236
  • माधव बोरकार

बोर्‍हेसला शिक्षितपेक्षाही अशिक्षित लोकांकडे बोलायला आवडायचे. भाषेची सूक्ष्म जाण अशाच अशिक्षित लोकांकडून मिळत असते हे त्याचं निरीक्षण अन्य लेखकांना खूप काही सांगून जातं. बोर्‍हेसच्या सहवासाच्या आठवणी लिहून आल्बॅर्त मँग्वेलने साहित्य जगतावर खूप मोठे उपकार केले आहेत.

डोळे अधू असूनही जॉर्ज लुईस बोर्‍हेस वाचन करायचा. वाचन ही त्याची बौद्धिक गरज होती. पुढे पूर्ण अंधत्व आल्यावर दुसर्‍यांकडून वाचून घेण्याची त्याने सवय लावून घेतली. जरी त्याला दिसत नसले तरी तो सिनेमा बघायला जायचा. सिनेमा अतिभावूक असला तरी त्याला तो आवडत असे. ‘अँजल्स विथ डर्टी फेस’सारखा सिनेमा पाहताना त्याला रडूही यायचे. त्याचा आवडता स्पॅनिश कवी रुबेत दारिओ याच्या कवितेतली कडवी तो स्वतःशीच म्हणताना भावना अनावर होत असे. आपण भावनाविवश होतो याची कबुली तो द्यायचा.

बोर्‍हेस एक आगळेवेगळे रसायन होते. त्याच्या साहित्याची कोणी अवास्तव स्तुती केलेली त्याला बिलकूल आवडत नसे. एकदा एक लेखक आपली एक कथा बोर्‍हेसला वाचून दाखवायला आला. बोर्‍हेसच्या एका कथेचं ते अनुकरण होतं. ती कथा ऐकून बोर्‍हेस खूश होईल असा त्याचा अंदाज होता. पण ती कथा ऐकता ऐकता बोर्‍हेसच्या चेहर्‍यावरचे भाव पालटू लागले आणि त्याने त्या लेखकाला बाहेरचा रस्ता दाखवला. पुन्हा कधी तो लेखक दिसला नाही, असं मँग्वेल लिहितो. काही लेखकांना खुशमस्करे आपल्या आजूबाजूला हवे असतात; पण या प्रतिभावंताला त्यांचा मनापासून तिटकारा असायचा.

कधीकधी त्याला विरक्तीचे झटके यायचे. तेव्हा बोर्‍हेसला वाचन किंवा लेखन करावंसं वाटत नसे. इतके की साहित्यविषयीची चर्चाही करणे तो टाळत असे. कारण तो म्हणत असे की, प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक पुस्तक असते. पुढे त्याने या विषयावर ‘युटोपिया ऑफ अ टायर्ड मॅन’ या नावाची एक कथा लिहिली. कला ही प्रत्येक माणसामध्ये अंगभूत असते, त्यामुळे संगीत किंवा कला दालनांची वेगळी गरज नसते, अशी त्याची विक्षिप्त मतं होती. अर्थात ही विरक्ती काही काळापुरती टिकत असे. नंतर बोर्‍हेसचं वाचन व लिखाण मूळ पदावर यायचं. मँग्वेल लिहितो की, त्याच्या शाळा-विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बोर्‍हेसच्या साहित्याचा समावेश होता. त्याच्या शैलीचा अभ्यास हा त्याचा आवडीचा विषय होता. बोर्‍हेसच्या लेखनशैलीची काही वैशिष्ट्यं तो सांगतो. साधंसोपं गद्य कसं लिहावं याचा वस्तुपाठ म्हणजे बोर्‍हेसचं लिखाण असे मानले जात असे. साधी-सोपी व सरळ वाक्यरचना, विशेषणं किंवा क्रियाविशेषणांचा कमीत कमी वापर अशा अनलंकृत शैलीमुळे त्याच्या कथा, कादंबर्‍या वाचनीय झाल्या. सोपी भाषा वापरण्याकडे त्याचा कल होता. त्याने स्पॅनिश भाषेत नवीन प्राण फुंकला व तिचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. याचे एक कारण म्हणजे त्याचं अन्य भाषांतल्या साहित्याचं वाचन. एखादा इंग्रजी वाक्प्रचार आपल्या भाषेत आणताना तो त्या वाक्प्रचाराला अस्सल स्पॅनिश रूप द्यायचा. शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ या नाटकाच्या स्पॅनिश अनुवादाविषयी तो सांगतो-

भाषेच्या वापरासंबंधी किप्लिगं हा त्याचा आदर्श होता. विद्वत्ताप्रचुर व बोजडपणामुळे भाषा मृत पावते, त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत हे त्याचं ठाम मत होतं. गाब्रिअल गार्सिया मार्क्वेज, ज्युलिओ कोर्ताझारसारखे प्रतिभावंत लेखक बोर्‍हेसचं स्पॅनिश भाषेवर असलेलं ऋण मोठ्या नम्रतेनं मान्य करतात.

भाषेचा रियाज करावा लागतो. त्यासाठी स्वभाषेबरोबरच परभाषेच्या साहित्याच्या वाचनाची गरज असते. बोर्‍हेस अन्य भाषा ‘डोळसपणे’ वाचायचा किंवा ऐकायचा. काफे किंवा सार्वजनिक ठिकाणी भाषा आपल्याला ऐकायला मिळते. त्यातून एखादा वेगळा वाक्प्रचार कानावर पडतो आणि संवेदनशील लेखक त्याचा चपखल उपयोग आपल्या साहित्यात करतो. बोर्‍हेसला शिक्षितपेक्षाही अशिक्षित लोकांकडे बोलायला आवडायचे. भाषेची सूक्ष्म जाण अशाच अशिक्षित लोकांकडून मिळत असते हे त्याचं निरीक्षण अन्य लेखकांना खूप काही सांगून जातं.

बोर्‍हेसचं मित्रांचं वर्तुळ अगदी छोटं होतं. त्याच्या अगदी जवळचे जोडपे म्हणजे बिवॉय व त्याची पत्नी सिल्विना. त्यांच्याकडे लेखनाबरोबरच तो स्वप्नाविषयीची चर्चा करायचा. त्या दोघांमध्ये सुमारे तेरा वर्षांचा फरक होता, पण हे वयाचे अंतर त्यांना कधी जाणवले नाही. बोर्‍हेसला वेगवेगळी चित्रविचित्र स्वप्नं पडायची आणि अशा स्वप्नात तो फार रस घ्यायचा.

बोर्‍हेस परंपरा मानायचा ते वेगळ्या अर्थाने. तो लिहितो- र्शींशीू ुीळींशी लीशरींशी हळी ेुप िीशर्लीीीेीी. त्याचे पूर्वसुरी कोण तर प्लेटो, नोव्हालिस, काफ्का, शोपेनहावर, रेमे द गोर्मे, चेस्टरटर्न वगैरे… प्रत्येक लेखकाच्या प्रकृतीप्रमाणे त्यात बदल होत असतो. लेखक हा पूर्वसुरींकडून पुष्कळ काही घेत असतो. त्याच्या आशय आणि अभिव्यक्तीवर ते प्रभाव घालतात. त्याच्या लिखाणाला आकार देतात. म्हणूनच परंपरेपासून तो दूर जाऊ शकत नाही.

बोर्‍हेसच्या सहवासाच्या आठवणी लिहून आल्बॅर्त मँग्वेलने साहित्य जगतावर खूप मोठे उपकार केले आहेत. आपल्याकडे ना. सी. फडके किंवा वि. स. खांडेकर लेखनिकांकडून लिहून घ्यायचे. पण फडकेंसंबंधी कोणी लिहिलेलं माझ्या वाचनात आलेलं नाही. मात्र खांडेकरांचे लेखनिक राम देशपांडे यांनी खांडेकरांच्या हृद्य आठवणीचे पुस्तक लिहिले आहे, त्यातून या प्रतिभावंताचे व्यक्ती व लेखक म्हणून व्यक्तिमत्त्व उलगडते.