एका समृद्ध, सुगंधी जीवनाचे स्मरण

0
188

– डॉ. द. ता. भोसले
देहाचा आकार व माणसाची जन्मजात क्षुधा या गोष्टी कोणत्याही माणसाच्या ठायी एकच असल्या तरी, त्याची वृत्ती-प्रवृत्ती, वागणे-बोलणे यामध्ये मात्र अनेक प्रकार आपणास पाहावयास मिळतात. काही माणसे केवळ स्वतःवर प्रेम करणारी असतात. काही आपल्या कुटुंबावर प्रेम करतात, तर काही माणसे जगावर प्रेम करणारी असतात. काही माणसे पैशांना जपतात. काही माणसे देहाला जपतात- जोजवतात, तर काही माणसे निर्मळ मैत्रीला जपत असतात. काही माणसे दुसर्‍याच्या ताटातले हिसकावून घेऊन खातात. काही आपल्याच ताटातले मिष्टान्न लपवून खात असतात, तर काही माणसे आपल्या ताटातले दुसर्‍याला खाऊ घालतात. काही माणसे मरत नाहीत म्हणून जगतात, तर काही मरणाला घाबरून जगतात, काही मरणाचा पराभव करीत जगत असतात. माझ्याही आयुष्यात असली नाना प्रकारची माणसे आलेली आहेत, पण जगावर निरपेक्ष प्रेम करणारी, निकोप मैत्रीला जपणारी, आपल्या ताटातला घास दुसर्‍याला भरवणारी आणि जीवनाला सुंदर करीत असतानाच मरणाला सौंदर्य बहाल करणारी जी काही मनाने श्रीमंत असलेली माणसे जीवनात आली, त्यामध्ये ज्योतिबा पाटील या माझ्या मित्राचा मी अवश्य समावेश करायला हवा. त्यांच्या नावातच असलेला ‘प्रकाश’ आम्हालाही प्राप्त झालेला आहे आणि प्रकाशाचा स्पर्श झालेली कोणतीही गोष्ट अधिक उजळते हे आपण जाणतोच. माणूसही त्याला अपवाद नाही. मीही त्याला अपवाद नाही.या ‘ज्योती’चा प्रकाश मला प्राप्त झाला, तोही योगायोगानेच. माझे मित्र आणि मान्यवर समीक्षक प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांचा मडगावहून फोन आला. श्री. पाटील यांच्या ‘चरणस्पर्श’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन मी करावे, अशी त्यांनी विनंती केली होती. प्रा. अडसुळांची विनंती म्हणजे माझ्या-सारख्याला तो आदेश असतो. साल होते २००३. मातीने माखलेल्या खोबर्‍याच्या तुकड्यावर कुस्ती करणार्‍या गल्लीतल्या पहिलवानाला राष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायला मिळावे, तशी माझी गत झाली. चेहरा टाकून बसलेले चार विद्यार्थी नि जन्मजात कर्णबधीर असलेल्या चार म्हातार्‍यांसमोर वक्ता म्हणून मान्यता मिळालेल्या मला फार मोठी संधी वाटली. त्यात पुन्हा गोव्याचे आकर्षण होतेच. गोव्याचा निसर्ग सुकलेल्या माणसालाही पालवी धरायला लावणारा. तिथली माणसेही मनाने तिथल्या श्रीमंत निसर्गासारखीच. शहाळ्यासारखी गोड नि फणसासारखी रुचकर. फलटणच्या माळरानावर उगवलेला श्रीकृष्ण अडसुळांसारखा माणूस गोव्याला गेल्याने गोव्याच्या निसर्गासारखा श्रीमंत झाला, जगण्याने समृद्ध झाला. मग तो मूळचा गोवेकर कसा असेल? या सार्‍या गोष्टींचा विचार करून मी आमंत्रण स्वीकारले. बहारदार कार्यक्रम झाला आणि आमच्या मैत्रीला तेव्हापासून बहर आला. वेगवेगळ्या निमित्ताने पुन्हा दोन-तीनदा गोव्याला जाण्याचा प्रसंग आला आणि आमची मैत्री अधिक सुगंधी होत गेली. पिकत जाणार्‍या हापूस आंब्यासारखी सुगंधी आणि चवदार होत गेली.
एका तपाहूनही अधिक काळ आमची मैत्री टिकण्याची काही मूलभूत कारणे आहेत, ती त्यांच्या स्वभावातच सापडली. त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसली. त्यातील एक कारण म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी घेतलेले शिक्षण आणि पुढे केलेली प्रगती हे सांगता येईल. दुःख, दैन्य, दारिद्य्र, उपेक्षा ही माणसाला खच्ची करून टाकतात, नामोहरम करीत असतात. माणसाची जगण्याची उर्मीच नष्ट करून टाकतात. पण या सार्‍या गोष्टींना धैर्याने तोंड देत, त्यांचा पराभव करीत, त्यांनाच संधी मानून जे जिद्दीने उभे राहतात, तेच यशस्वी ठरतात. ज्योतिबा पाटलांनी नेमके हेच करून दाखवले आहे. दुःख आणि दारिद्य्र माणसाला मिळालेला शाप नसून वरदान आहे, हे त्यांनी मनोमन स्वीकारले व त्यातून त्यांनी आपला विकास साधला. दुःखाला वरदान मानल्यामुळेच खर्‍या अर्थाने जीवनाचा अर्थ आणि अन्वयार्थ त्यांना समजला. जगणे समंजस करता आले. जीवनातील श्रेयस आणि प्रेयस काय, तत्कालिक कोणते नि चिरकालिक कोणते, याचा विवेक प्राप्त झाला. जीवनाची कृतार्थता कशात सामावली आहे याचा त्यांना साक्षात्कार झाला. पोटाची वितभर कातडी पिशवी भरणे म्हणजे जगणे नव्हे. त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या जीवनाती काही मूल्ये, काही तत्त्वे, काही सेवाभाव, काही समर्पण आणि कारुण्यभाव लाभला, तरच ते जीवन पूर्णत्वाला जाते, हा विचार त्यांना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीने शिकविला, त्यातल्या दुःखाने शिकविला आणि त्यामुळेच त्यांचे जीवन समृद्ध झाले, उजळून निघाले. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा सद्गुणांची श्रीमंतीच मोठी असते, हे त्यांना मनोमन पटले. नानाविध क्षेत्रांतील माणसांचा गोतावळा व त्यांची मैत्री त्यांना लाभली, हे या सार्‍या श्रीमंतीमुळेच!
जीवनावर प्रेम असल्याखेरीज जीवनाला आयाम लाभत नसतात आणि आयाम लाभल्याशिवाय जीवनावर प्रेम करता येत नसते. या आमच्या मित्राच्या व्यक्तिमत्वाला अपवादात्मक आयाम प्राप्त झालेले आहेत. अर्धशतकाच्या सेवाकार्यात ते हिंदी विषयाचे शिक्षक होते. चित्रकला शिक्षक होते. चिनी मातीवर कलाकुसर करणारे शिक्षक होते. वृत्तपत्रसृष्टीत पत्रकार म्हणून वावरले होते. खो-खो, कबड्डी, वॉलीबॉल खेळाचे शिक्षक आणि परीक्षक होते. आर्टस् अँड क्राफ्टचे शिक्षक होते. एक साधा कामगार म्हणूनही तीन एक वर्षांचा अनुभव गाठी बांधलेला होता. एकाच आयुष्यात पाच-पाच विषयांचे शिक्षक म्हणून वावरणे, केवढी भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल आणि केवढी अवघड गोष्ट म्हणावी लागेल. हे सारे विषय परस्पर भिन्न प्रकृतीचे असे असलेले. माझ्यासारख्या शिक्षकाला मराठीसारखा तसा सोपा मानलेला विषयही पेलवताना मानेचा काटा ढिला होतो. झेपता झेपत नाही. श्री पाटील मात्र पाच विषय हाताच्या पाची बोटांप्रमाणे सर्व बाजूंनी घुमवतात. ते विषयाचा काटा काढतात, पण मानेचा काटा ढिला होऊ देत नाहीत. या पाचही विषयांना माझ्या दृष्टीने खास वैशिष्ट्य आहे. आम्ही शिक्षक म्हणून मुलांच्या ओठांवर शब्द पेरतो. पाटील चित्रकला शिक्षक म्हणून बोटावर कला पेरतात. आमचे अध्यापन खांद्यावरती असते, तर ज्योतिबा पाटलांचे अध्यापन सर्व शरीराला साधन म्हणून केलेले असते. ते आपल्या प्रत्येक इंद्रियाला सजग आणि निर्मितीक्षम करीत असतात.