एका शिक्षिकेची शिदोरी : आनंददायी अध्यापनक्रियेची अनुभूती

0
758

– डॉ. सोमनाथ कोमरपंत 

आपल्या जीवनप्रवाहातील शिक्षण ही निरंतर प्रक्रिया होय. भविष्यकालीन जीवनाची ती प्रयोगशाळा होय. शिक्षक हा नव्या पिढीचा शिल्पकार. संस्कारक्षम वयात आपल्या विद्यार्थ्यांना तो योग्य प्रकारचे वळण लावून त्यांना घडवितो. कार्यक्षम बनवितो. अध्ययनप्रक्रिया आणि अध्यापनप्रक्रिया या एकमेकांना पूरक असतात. अध्यापन हे अध्ययनाचे प्रयोजक रूप. ‘आधी केले व मग सांगितले’ असा तो अनुक्रम आहे. शिक्षक आणि शिक्षिका अध्ययनशील असतील तरच त्यांनी निगुतीने वाढविलेली मुले ज्ञानमय वारसा पुढे नेऊ शकतील. नाहीतर सारा शिक्षणव्यवहार रुटुखुटू चालेल. केवळ पाट्या टाकणे ही कृती शिल्लक राहील. आपण अंतर्मुख होऊन पाहिले तर कोणते चित्र आढळते? स्वातंत्र्योत्तर भारतात मुलांची अभ्यासाविषयीची उमेद वाढली की कमी झाली? घरोघरी आणि दारोदारी आज इंग्रजीचे साम्राज्य आहे. ‘प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतले तर पुढे इंग्रजीतून व्यक्त व्हायला अडचण येते हो!’ असे सांगून इंग्रजीचे प्रस्थ वाढविले जात आहे. मग या पिढीला सृजनात्मक शिक्षणाचे धडे कोण देईल? भाषाभिवृद्धीबरोबर समांतरप्रक्रियेने होणारे सांस्कृतिक मूल्यांचे जतन, त्यातून येणारा मूल्यविवेक आणि नव्या युगातील राष्ट्रनिर्मितीसाठी व्रतनिष्ठ होण्याची अंतःप्रेरणा या मुलांना कोण देणार? प्राथमिक स्तरावर विद्यादान करणारा शिक्षक (यात शिक्षिकाही अभिप्रेत आहेत) कोणत्याही दृष्टीने कमी प्रतीचा नसतो. पायाभूत कार्य तोच करत असतो. बाईचे हृदय तर आईचे असल्यामुळे या वयात त्यांचे भावविश्‍व घडविण्यात ती महत्त्वपूर्ण कार्य करू शकते. माध्यमिक शाळेत कुमारवयातील विद्यार्थ्यांना घडविणे हा मधला आणि महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात त्यांची मने संवेदनक्षम असतात. नव्या ज्ञानाला आसुसलेली असतात. येथील भाषाशिक्षकाचे दायित्व महत्त्वाचे असते. तो केवळ भाषा शिकवीत नाही; सार्‍या संचिताची ओळख करून देतो. आपल्या इतिहासाकडे दृष्टी वळवितो. अशा वेळी शिक्षकाची मर्मदृष्टी सखोल हवी. तिला तशीींळलरश्र र्ींळशु म्हणता येईल. भूगोलाचेही ज्ञान हवे. मातृभूमीविषयी ममत्व हवे. देशबांधवांविषयी जिव्हाळा हवा. म्हणजेच विशालतेचा दृष्टिकोन हवा. त्याला केीळूेपींरश्र र्ींळशु म्हणता येईल. यासाठी शिक्षकाला मधुकरवृत्तीने ज्ञानाचा संचय करावा लागतो.
– अशा शिक्षकाचे ऋण आजच्या गतिमान काळातील विद्यार्थीही कधी विसरणार नाही.
************
हे विचारतरंग मनात आले ते सौ. सुधा देसाई यांच्या ‘एका शिक्षिकेची शिदोरी’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या वाचनामुळे. हे सलग आत्मचरित्र नव्हे. आठवणींच्या अंगाने ते लिहिले आहे. सुरुवातीला गृहिणी म्हणून वावरलेल्या सुधाताईंनी शिक्षकी व्यवसायात प्रवेश केला. चेंबूरच्या ‘जनरल एज्युकेशन ऍकॅडेमी’ या शाळेत त्यांनी १९६८ पासून १९९७ पर्यंत तीस वर्षे अध्यापनाचे कार्य निष्ठापूर्वक केले. मुलांच्या भावविश्‍वाशी त्या एकरूप झाल्या. विद्यार्थिप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. त्यामागे त्यांचे अध्यापनकौशल्य होते. तपश्‍चर्या होती. उपक्रमशीलता त्यांनी अंगी बाणवलेली होती. अध्यापनक्षेत्राशी त्या दीर्घकाळ निगडित होत्याच; शिवाय मुलांच्या निबंधस्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांनी तन्मयतेने भाग घेतला. स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी आपले आनंदविश्‍व निर्माण केले. हा पट मोठा आहे. पण काही प्रातिनिधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या व्यक्तिरेखांच्या दर्शनाद्वारे त्यांनी कलात्मक रीतीने तो गुंफलेला आहे. हे सारे वाचताना आपली चित्तवृत्ती प्रसन्न होते. याचे मुख्य कारण म्हणजे, या पुस्तकाची आशयसमृद्धी. ही अनुभवांची शिदोरी आहे. अनेक तपशील या पुस्तकात आहेत; पण ही जंत्री नव्हे. अशा प्रकारच्या अनुभवधनातून आणि चिंतनातून ‘अध्यापनशास्त्र आणि त्याचे कौशल्य’ याविषयीच्या संज्ञा व संकल्पना साकार होतात. पण सैद्धांतिक विवेचन आणि शिक्षणप्रणाली यांच्या आहारी न जाता शैक्षणिक अनुभव ‘स्व’विषयक मुशीतून त्यांनी प्रकट केले आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी वाचलेल्या राधाबाई आपटे यांच्या ‘उमटलेली पावले’ आणि अलीकडच्या प्राचार्य भिकू पै आंगले यांच्या ‘स्पर्श होता परिसाचा’ या शैक्षणिक आत्मकथनांची आठवण झाली. आत्मचरित्रातून ‘स्व’ प्रकट व्हायला हवा आणि ‘आत्मा’ही दिसला पाहिजे. ‘एका शिक्षिकेची शिदोरी’मधून प्रगल्भ जीवनदृष्टी असलेल्या स्त्रीमनाचे उत्कट दर्शन घडते. यातील अनुभूती प्रांजळ आणि पारदर्शी निवेदनातून प्रकट झालेली आहे. विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्या हृदयसंवादाचे अंतःसूर येथे व्यक्त झालेले आहेत. शब्दकळेचे माधुर्य येथे प्रत्ययास येते. छोटी छोटी वाक्ये, साधे-सुलभ निवेदन आणि स्वभावोक्ती यांचा गुणसमुच्चय येथे आढळतो. एरव्ही आत्मचरित्र हा ललितेतर वाङ्‌मयात मोडणारा प्रकार. पण येथे मात्र त्याला एका उत्कृष्ट साहित्यकृतीची मनोहारी रूपकळा प्राप्त झालेली आहे.
सुधा देसाई या पूर्वाश्रमीच्या सुधा कामत. गोव्यातील मडकईच्या. संस्कारशील वातावरणात त्या वाढल्या. कुळागराच्या हिरव्यागार प्रदेशात आणि शीतल छायेत त्यांचे भावविश्‍व समृद्ध झाले. निसर्गाची ओळख झाली. ती पुढे त्यांच्या शिक्षकी पेशात उपयुक्त ठरली. रात्रीच्या भोजनानंतर त्यांचे वडील दीड तास मोरोपंती आर्यांचे महाभारत वाचत. या श्रवणभक्तीतून एकीकडे महाभारताचे आणि दुसरीकडे मोरोपंती आर्यांचे आकलन होत गेले. तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे चित्रमयशैलीत त्यांनी वर्णन केलेले आहे. त्यांतील अनेक तपशील मुळातून वाचण्यासारखे आहेत. अल्पाक्षररमणीयत्व हा त्यांचा शैली गुणविशेष. त्या लिहितात- ‘आम्ही सारी मुले एक आईच्या पोटात, एक पाळण्यात, बाकी अंथरुणात अशी महाभारत ऐकत मोठे झालो. यात खंड नसायचा.’ धाकटा भाऊ वडिलांविषयी म्हणायचा, ‘लोक तुकाराम वाचतात, पण माझे वडील तुकाराम जगले.’ असे सच्छील आणि सात्त्विक वृत्तीचे वडील लेखिकेला लाभले अन् ‘शुद्ध बीजापोटीं फळें रसाळ गोमटीं’ या शुभाषिताचा प्रत्यय आणून देण्याची भविष्यकाळात अपूर्व संधी मिळाली. एवढेच नव्हे तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक गुणवान विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडल्या. जीवनाच्या विविध क्षेत्रांत त्यांनी नाम कमावले. त्यामुळे शांताराम आठवले यांच्या ः ‘एका बीजापोटीं तरु कोटी कोटी| जन्म घेती सुमनें फळे॥ या उद्गारांचाही प्रत्यय येतो.
सुधाताई देसाई श्रवणसंस्कृतीमधून वाचनसंस्कृतीत कशा आल्या याचे संक्षिप्त चित्र त्यांनी उभे केलेले आहे. त्यातून त्यांच्या अभिरूचिसंपन्न मनाचे दर्शन घडते. त्यांच्या जीवननिष्ठेचे आणि जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब त्यांच्या पुढील उद्गारांत दिसून येते ः ‘आता सत्तरी ओलांडली तरी वाचनात आलेली सुंदर, अर्थपूर्ण वाक्ये लिहून ठेवणे, टिपणे काढणे चालूच असते; व असे करताना मी हसत स्वतःशीच म्हणते ः ‘माझ्यातली शिक्षिका अजून तरुण आहे. शिकवणारा तो शिक्षक हे जरी खरे असले तरी सतत शिकणारा तोच खरा शिक्षक असे मला म्हणावेसे वाटते.’
अक्षर सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या साधनेविषयी त्यांनी लिहिले आहे. पुढे हाच प्रयोग त्या मुलांवर करू शकल्या. त्यांची शाळा जरी इंग्रजी माध्यमाची असली तरी वातावरण पूर्णपणे मराठी वळणाचे होते. उपक्रमशीलता हे त्या संस्थेचे ब्रीद होते. प्रिन्सिपल व्ही. एल. शानभाग यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे शाळेच्या स्थापनेपासून लाभलेले नेतृत्व हा संस्थेच्या उभारणीमधला मानबिंदू ठरला. २०१४-१५ साली ही संस्था सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे असे निवेदन लेखिकेने केले आहे. ‘माझी शाळा’ या प्रकरणात शाळेविषयी अपार जिव्हाळा तिने व्यक्त केलेला आहे. शिक्षिका झाल्याचा सार्थ अभिमान आणि तोही जी.ई.ए.सारख्या शाळेत हे सांगताना त्यांच्या रसवंतीला बहर आलेला आहे. आज जरी ही शिक्षणसंस्था परमोच्च बिंदूवर असली तरी तिनेही एकेकाळी प्रतिकूलतेची वाट चोखाळलेली आहे याविषयीचा इतिहास त्यांनी थोडक्यात कथन केलेला आहे.
आपल्या पुढे आलेल्या आणि जीवनाच्या या टप्प्यापर्यंत कृतज्ञताभाव प्रकट करणार्‍या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींविषयी त्यांनी गौरवाने लिहिलेली छोटी-छोटी प्रकरणे पुनः पुन्हा वाचणे हा आनंदानुभव आहे. आपल्या गुरूवर लिहिणारे विद्यार्थी अनेक आहेत; पण विद्यार्थ्यांविषयी लिहिणारे शिक्षक फार थोडे. अशा दुर्मीळ व्यक्तींमध्येेेेेे सुधाताई देसाई यांची आता गणना करावी लागेल. यादृष्टीने ‘आदित्य’, ‘कृष्णकुमार’, ‘लक्ष्मी’, ‘बाई, तुमच्याबाबतीत असं का झालं?’, ‘आनंद घेण्याची तर्‍हा’, ‘विद्यार्थिदर्शन’, ‘निमित्त दहावीत पहिला’, ‘संजीव पाटील’, ‘राजीव- पालेकरवाडी,’ ‘छोटी निशा’, ‘वीणा विवेक’, ‘आईची माया’, ‘बंगाली कणिका’, ‘अमित गायकवाड’, ‘विनय पाटील’, ‘मुकुल’, ‘देवांग शहा’, ‘अजय मेहता’, ‘प्लेझंट सरप्राईज’, ‘अत्याधिक समाधान’ या लेखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची ताज्या-टवटवीत शैलीत रेखाटलेली हृद्य स्वभावचित्रे वाचत असताना अपूर्व आनंदाची लहर तुमच्या-आमच्या मनामध्ये तरळून जाईल. ‘आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात रूची राहिलेली नाही. शिकविण्यात काही राम राहिला नाही,’ असे नकारात्मक बोलणार्‍या शिक्षकांमध्ये सकारात्मक अनुभूती निर्माण करणारे अनुभव सुधाताई देसाई यांनी या लेखांच्या अनुषंगाने मांडलेले आहेत. त्यांतील मौलिक आशय अधोरेखित करता येईल. सुभाषितांसारखी आलेली वचने उद्धृत करता येतील. खरे पाहता शिक्षकी पेशात दीर्घकाळ परिक्रमा केल्यामुळे चिंतनातून आलेली ती ‘सुधा-भाषिते’ आहेत. हे विद्यार्थी म्हणजे व्यक्तिविशेष आहेत; पण दुसरीकडे आदर्श विद्यार्थ्यांचा ‘लघुत्तम साधारण विभाजक’ म्हणूनही त्यांच्याकडे बोट दाखविता येईल. विस्मय वाटतो तो बाबीचा. आजच्या काळातही अशा प्रकारच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी निर्माण होतात? आणि तेही मुंबईसारख्या महानगरात? पुन्हा चेंबूरसारख्या पूर्णत्वाने उद्योगधंद्यांनी व्यापलेल्या उपनगरात? शेवटी उत्तर उमगते ः ‘तत्र योजकः दुर्लभः|’
नवनिर्माणाच्या ध्यासाने झपाटलेल्या सुधाताई देसाईंसारखे शिक्षक अन् शिक्षिका लाभल्यानंतर हे का बरे घडू शकणार नाही? हे पुस्तक एकीकडे आनंद देऊन जाते आणि दुसरीकडे बर्‍याच प्रमाणात अंतर्मुखही करते. ‘आमची जी.ई.ए.ची मुले’ हा लेख एका दृष्टीने र्डीााळपस र्ीि सारखा वाटला.
‘खरे म्हणजे शिक्षकांपेक्षा तुम्हीच खूप मोठे झालात मुलांनो!’ असे सुधाताईंसारखे कृतकृत्यतेचे उद्गार शिक्षकांना काढता आले पाहिजेत, तरच या शिक्षणाचा उपयोग. विवेचनाच्या ओघात प्रा. बेलसरे यांची ज्ञानेश्‍वरीची सांख्यायोगावरची प्रवचने वाचताना त्यांच्या मनात असलेले विचार त्यांनी उद्धृत केले आहेत. ‘समाधान ही चित्ताची संपत्ती आहे. ती प्राप्त करणे कठीण असते.’
अशा प्रकारच्या पालकांच्या मनात विलसणार्‍या आनंदाचे स्वरूप काय असू शकते हे ‘आनंद घेण्याची तर्‍हा’ या लेखात पाहायला मिळते. ‘तिच्या संसारात जे काही घडत होतं त्यात तिला आनंदच दिसत होता, कारण तिचे अंतरंगच मुळी आनंदाने भरलेले असावे. फक्त कारणपरत्वे तो आनंद फुलून पंचेंद्रियांवाटे दृग्गोचर होत असावा. अशा मनोवृत्तीच्या माणसांना सुख व समाधान मिळवण्यासाठी बाह्य, कृत्रिम उपायांची गरज भासणार नाही. बहुतेक ते त्यांच्या आत्म्यातून स्रवत असावे.’
-आणि हा आनंद सुधाताईंनी अनुभवला. असा आनंद आजकालच्या शिक्षकांना अनुभवता आला पाहिजे. विस्तारभयास्तव अशी कित्येक उदाहरणे आणि अधोरेखिते येथे उद्धृत करता येत नाहीत. पुस्तक आस्वादणे हीच खरी ‘ग्यानबाची मेख’ आहे.
दामोदर मावजो यांच्या सौजन्याने हे पुस्तक माझ्या हाती आले. सुधाताईंच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ‘एका शिक्षिकेची शिदोरी’ या पुस्तकाद्वारे झाली. जाणवले ते असे- मडकईच्या कुळागरातील ओझराचे पाणी शिक्षणाच्या आत्यंतिक ओढीने मुंबईच्या महासागरापर्यंत गेले. तिथे समरस होऊन मिळवलेले वाग्धन त्यांनी तेथील बालकांनाच अर्पण केले. थोड्याफार फरकाने असे म्हणता येईल- ‘गंगेचे पाणी गंगेलाच मिळाले.’