एका वर्षानंतरच मोदी सरकारचे मूल्यमापन : खुर्शीद

0
134

चीनच्या घुसखोरीबाबत टीका
मोदी सरकारमधील त्रुटी किंवा उणिवा यांचा आढावा सद्यस्थितीत योग्य ठरणार नाही. त्यावर भाष्य करण्यासाठी किमान सहा महिने ते एका वर्षाचा अवधी द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी येथे व्यक्त केली.‘मोदी सरकारला सत्तेसाठी जनादेश मिळालेला आहे. मात्र एवढ्या लवकर त्यांच्या कामगिरीवर बोलने बरोबर ठरणार नाही. किमान सहा महिने ते एक वर्षपर्यंतची त्यांची कामगिरी पाहिल्यानंतरच त्याबाबत बोलता येईल’ असे खुर्शीद म्हणाले. कोणत्याही प्रकारचा देशाला धोका असल्यास कॉंग्रेसचा मोदी सरकारला पाठिेंबा असेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रियांका गांधी यांनी राजकारणात सक्रीय व्हावे की नाही याविषयीचा निर्णय हा सर्वस्वी प्रियांका यांचा वैयक्तिक निर्णय आहे. कॉंग्रेसमध्ये नसलेले लोक नेतृत्व बदलाचा मुद्दा रेटत असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांची कामगिरी किंवा त्यांचे अपयश हे मुद्दे पक्ष पातळीवर उपस्थित करावयाचे विषय असल्याचेही ते म्हणाले. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर चीनी सैन्याच्या भारतीय हद्दीत वारंवार होणार्‍या घुसखोरीवरही खुर्शीद यांनी मतप्रदर्शन केले. याआधी कॉंग्रेसचे सरकार असताना असे प्रकार घडायचे त्यावेळी भाजप त्या सरकारला ‘भित्रे’ संबोधीत होते. मात्र तसेच प्रकार आता चीनी राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर असताना घडले असता भाजपची बोलती बंद झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोदींनी म्यानमारला भारतातून लोकांना नेले : खुर्शीद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार दौर्‍यावेळी तेथे गर्दी जमविण्यासाठी भारतातून लोकांना नेण्यात आले होते असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांनी केला आहे. मात्र भाजपने त्यांच्या वक्तव्याला हरकत घेताना खुर्शीद वैफल्यग्रस्त झाल्याची टीका केली आहे.
म्यानमारमधील नाय पी तॉ येथील रस्त्यांवर बहुतेक तुरळक लोक असतात. तेथे मोदींच्या दौर्‍यावेळी त्यांचे भाषण ऐकण्यास २० हजार लोक कसे काय जमले असा सवाल खुर्शीद यांनी केला आहे.
भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खुर्शीद यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ही कॉंग्रेसची वैचारिक दिवाळखोरी असल्याचे म्हटले आहे.