ऍथलेटिक प्रशिक्षक बहादूर सिंगना हटवले

0
195

भारताचे प्रमुख ऍथलेटिक प्रशिक्षक बहादूर सिंग यांची प्रशिक्षक म्हणून २५ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वयाच्या बंधनाचे कारण देत त्यांचा करार वाढवला नाही. १९७८ व १९८२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बहादूर यांनी गोळाफेक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. ७४ वर्षीय बहादूर यांचा करार ३० जून रोजी संपला.

क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकासाठीची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे केल्याने बहादूर यांना हटवण्यात आले आहे. भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वांत दीर्घ कालावधीसाठी मुख्य प्रशिक्षक राहिलेल्यांमध्ये बहादूर यांचा अग्रक्रम लागतो. फेब्रुवारी १९९५ मध्ये त्यांनी मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले होते. ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने बहादूर यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राला खेळाडू म्हणून तसेच प्रशिक्षक म्हणून दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे. बहादूर हे निवृत्त झाले असले तरी त्यांच्या अनुभवाचा उपयोग ‘टोकियो २०२१’ ऑलिंपिक स्पर्धेसाठी केला जाणार असल्याचे ऍथलेटिक महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमरीवाला यांनी सांगितले आहे. गृहमंत्रालयाने मात्र बहादूर यांना हटविण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणूंमुळे ज्येष्ठांवर आलेल्या निर्बंधामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

सिंग यांनी १९७८ साली बँकॉंक व १९८२ साली दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. तेहरान येथील १९७४ साली झालेल्या स्पर्धेतही त्यांनी रौप्य कमाई केली होती. त्यांनी एशियन ट्रॅक अँड फिल्ट मिट्‌समध्ये (१९७३, कांस्य), (१९७५, सुवर्ण), (१९७९, कांस्य), (१९८१, रौप्य) पदकाची कमाई केली होती. १९७६ साली त्यांना अर्जुन, १९९८ साली द्रोणाचार्य तर १९८३ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.