उ. प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव

0
233

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ व केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या दोन प्रतिष्ठेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत केंद्र व राज्यातही सत्तेवर असलेल्या भाजपला दारूण पराभव पत्करावा लागला आहे.

विद्यमान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाचे प्रविण निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१ हजार मतांनी, तर उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या फुलपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे नरेंद्र प्रतापसिंह पटेल यांनी भाजपचे कौशलेंद्रसिंह पटेल यांना ५९ हजारहून अधिक मतांनी धूळ चारली. पोटनिवडणुकीसाठी सपा व बसपा यांनी युती केली होती.

उत्तर प्रदेशप्रमाणेच बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपच्या वाट्याला पराभव आला आहे. तेथे राष्ट्रीय जनता दलाचे सरफराज आलम यांनी भाजपचे प्रदिपकुमार सिंह यांचा तब्बल ६१,७८८ मतांनी पराभव केला. आलम यांना ५ लाख ९ हजार ३३४ मते तर सिंह यांना ४ लाख ४७ हजार मते मिळाली. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सपा व बसपा यांनी केलेल्या सौदेबाजीमुळे तसेच भाजपच्या अती आत्मविश्‍वासामुळे आपल्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागल्याचे म्हटले आहे.

लोकसभेत भाजपचे
संख्याबळ घसरले
उत्तर प्रदेशमधील लोकसभा पोटनिवडणुकीतील दोन्ही जागा गमावल्याने आता भाजपचे लोकसभेतील संख्याबळ २८२ वरून २७२ असे साध्या काठावरील बहुमतावर घसरले आहे. या उलट अजमेर व अलवार या राजस्थानमधील लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयांमुळे विरोधी कॉंग्रेसचे संख्याबळ ४४ वरून ४२ गेले आहे. या दोन्ही जागा २०१४ मध्ये भाजपने जिंकल्या होत्या. २०१७ साली विनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेली पंजाबच्या गुरूदासपूरची जागाही भाजपकडून कॉंग्रेसने हिसकावली होती. २०१४ नंतर आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या एकूण २० पोटनिवडणुकांपैकी भाजपने तीनच जागा जिंकल्या आहेत.