उसगावात घरमालकानेच केला भाडेकरुचा पैशांवरून खून

0
104

तिस्क-उसगाव येथील पोलीस आऊट पोस्टसमोर भाड्याच्या खोलीत राहणार्‍या विजय हरिजन (३५, उत्तर प्रदेश) याचा बुधवारी रात्री घरमालकाने खून केला. याप्रकरणी विनय रत्नाकर रायकर (२८, तिस्क उसगाव) याला फोंडा पोलीसांनी अटक केली. दोन महिन्यांचे भाडे न दिल्याने घरमालकाने हरीजनला लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी संशयिताने दोन महिन्यांचे थकीत असलेले ३ हजार रुपये भाडे देण्याचा आग्रह विजय हरिजन यांच्याकडे केला. गेल्या ५ महिन्यांपासून विजय हरिजन, पत्नी व मुलांसह मासिक दीड हजार रुपये भाडे या दराने राहत होती. विजय हरिजन यांच्या पत्नीने संशयिताला आपल्याकडील १ हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने सर्व ३ हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर रात्री ८ वा. सुमारास विजय हरिजन व त्यांची पत्नी खोलीबाहेर बसले असताना संशयिताने विजय हरिजन याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. विजयच्या पत्नीने त्याला सोडवून खोलीत नेले. त्यानंतर विजयला प्रचंड वेदना जाणवू लागल्याने तो तिथेच जमीनीवर झोपला. रात्री १० वा. सुमारास विजय हरिजन हालचाल करीत नसल्याचे दिसताच संशयिताच्या भावाने १०८ रुग्णवाहीकाला बोलावून त्याला पिळये आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.