उसगावातील वीज समस्या सोडवण्याची मागणी

0
110
उसगाव वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुनील वाडेकर यांना निवेदन देताना उसगाव युवा मोर्चाचे सदस्य.

फोंडा (न. वा.)
उसगाव भागात गेल्या काही महिन्यापासून वीजेची समस्या सोडविण्यात खात्याच्या अधिकार्‍यांना अपयश आल्याने उसगाव युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी काल बुधवारी सकाळी वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून निवेदन दिले. उसगावातील विजेची समस्या कायमची सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. कार्यकारी अभियंता सुनील वाडेकर यांनी समस्या सोडविण्याचे व कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
उसगाव युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत नाईक, लक्ष्मीकांत नाईक, सत्यविजय नाईक व अन्य ग्रामस्थनी वीज खात्याचे साहाय्यक अभियंते सुरेश नाईक, कनिष्ठ अभियंते राजेश नाईक व कार्यकारी अभियंते सुनील वाडेकर यांच्याशी विजेची समस्या सोडविण्यासंबंधी चर्चा केली.
उसगाव भागात गेल्या कित्येक महिन्यापासून विजेची समस्या सतावत आहे. यासंबंधी उसगाव कार्यालयात माहिती दिल्यास कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. कार्यालयात तक्रार करण्यासाठी फोन केल्यास कर्मचारी फोन उचलत नाहीत. मात्र कार्यालयाचे कर्मचारी स्थानिक पंचांच्या आदेशानंतर पाहिजे त्या ठिकाणी एलइडी दिवे बसवितात अशा तक्रारी युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित केल्या.
लक्ष्मीकांत नाईक यांनी उसगाव भागात आवश्यक ठिकाणी एलइडी दिवे लावण्यात आलेले नाहीत असे सांगून गेली कित्येक वर्षे या भागात नोकरी करणार्‍या कर्मचार्‍यांची बदली करण्याची गरज असल्याचे लक्ष्मीकांत नाईक यांनी सांगितले.
चंद्रकांत नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना वीजेची समस्या दररोज सतावत आहे. यासंबंधी तक्रारी यापूर्वी खात्याच्या अधिकार्‍याकडे केल्या असल्याचे सांगितले.